Ajit Pawar-Harshvardhan Patil-Dattatray Bharane Sarkarnama
विशेष

Indapur NCP Melava : हर्षवर्धन पाटलांशी जुळवून घेण्याचा अजितदादांचा राष्ट्रवादी नेत्यांना सल्ला; ‘भूतकाळात काय घडलं, ते आता विसरा’

Ajit Pawar Advice to NCP Leaders : आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला भाजप नेत्याची मदत घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे लोक आमच्यावर नेहमी टीकाच करतात, असं त्यांच्याकडून येता कामा नये.

Vijaykumar Dudhale

Indapur News : आपल्या सहकारी पक्षाबरोबर मतभेद होतील, यासाठी अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसले आहेत. पण, आपले मतभेद होणार नाहीत, मनं दुखवणार नाहीत, याची काळजी घ्या. घटक पक्षासोबत संवाद ठेवा. त्यांना चहापानाला बोलावा. त्यांना आपल्या कार्यालयात बोलवा, त्यांच्या पक्ष कार्यालयात आपण जायला हरकत नाही. भूतकाळात काय घडलं, हा विषय आता सोडून द्या, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत जुळवून घेण्याचा अप्रत्यक्ष सल्ला आमदार दत्तात्रेय भरणे आणि इंदापूरच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. (Loksabha election)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इंदापूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात अजित पवार काय बोलणार याकडे संपूर्ण इंदापूरचे लक्ष लागले होते. कारण, भाजपचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील यांनी विधानसभेला आमचे काम करणाऱ्यांचेच आम्ही लोकसभेला काम करू. आमचा त्यांनी तीनवेळा विश्वासघात केला आहे, असा आरोप अजित पवार गटावर केले होता. त्यामुळे अजितदादा त्याला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, पाटील गटाबरोबर जुळवून घेण्याचा सल्ला त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. (Harshvardhan Patil Vs Dattatray Bharane )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बोलताना जपून बोला. आपल्या बोलण्यामुळे कोणाची मने दुखवणार नाहीत, याची काळजी घ्या, अशी विनंती मी कार्यकर्त्यांना करतो. आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला भाजप नेत्याची मदत घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे लोक आमच्यावर नेहमी टीकाच करतात, असं त्यांच्याकडून येता कामा नये. (BJP News)

सहकारी पक्षाबरोबर आपले मतभेद होतील, यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले आहेत. पण, मतभेद होणार नाहीत, मनं दुखावली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. विकासाचे काम आपण करणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपली अनेक काम करून घ्यायाची आहेत. त्यामुळे घटक पक्षासोबत संवाद ठेवा. त्यांना चहापानाला बोलावा. त्यांना आपल्या कार्यालयात त्यांना बोलवा आणि त्यांच्या पक्ष कार्यालयात आपण जायला काही हरकत नाही, असा सल्ला अजितदादांनी राष्ट्रवादीचे इंदापूरचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिला.

अजित पवार म्हणाले, एकमेकांचा मानसन्मान ठेवा. लोकसभेला आपल्याला चारशेचा आकडा गाठायचा आहे. कुणी तुम्हाला फोन करतील. मागील गोष्टीला उजाळा देतील. कोणी तुम्हाला आपल्याकडे वळवून घेण्यासाठी येतील. पण, तुम्ही कुणालाही बधू नका. तुमच्यावर विरोधी पक्ष टीका करतील. पण, तुम्ही आपल्यात फूट पडू देऊ नका.

पक्षीय मतभेद बाजूला ठेवून इंदापूरच्या विकासासाठी आगामी काळात मी प्रयत्न करेन. याबाबत संबंधित प्रमुखांशी चर्चा करून त्यांचा दृष्टीकोन समजून घेईन आणि इंदापूरच्या विकासात्मक वाटचालीसाठी माझा प्रयत्न राहील. भूतकाळात काय घडलं, हा विषय आता सोडून द्या. कारण त्यावर कितीही चर्चा केली तर काही फायदा नसतो. विकासाभिमुख वाटचाल करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT