विशेष

CM Eknath Shinde Birthday : 'काय झाडी...' नंतर शहाजीबापूंना आलेलं टेन्शन मुख्यमंत्री शिंदेंनी एका वाक्यात दूर केलं...

Maharashtra CM Eknath Shinde Birthday : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा एक फोन कॉल रेकॉर्डिंग रातोरात झालं व्हायरल..

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

“काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, एकदम ओके…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांच्या साथीने यशस्वी करून दाखवलेल्या बंडावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा एक फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने रातोरात हे वाक्य सुपरहिट ठरलं होतं. खरं तर ही क्लिप व्हायरल झाल्यामुळं आणि प्रत्येक चॅनलवर तीच वाजत असल्यानं इकडं गुवाहाटीला आलेले शहाजीबापू प्रचंड टेन्शनमध्ये होते. आपल्या या कृत्यामुळे एकनाथ शिंदे आपल्यावर नाराज होतील म्हणून ते खोलीतून बाहेर यायला तयार नव्हते, अखेर शिंदे यांनी त्यांना पुढच्या दिवशी सकाळी हॉटेलच्या लॉबीत बोलावलं आणि विचारलं, काय बापू, टेन्शनमध्ये आहात काय..? तसं बापू नाय नाय म्हणत हसले! सगळे आमदारदेखील हसले आणि पुढचा प्रवास सुरू झाला...काळाच्या ओघात बंड यशस्वी झालं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले..आणि राज्यात आधी युतीचं आणि नंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं.

एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या आमदारांशी संबंध ताणले गेले आहेत, काही आमदार दुरावले आहेत, कोणत्याही क्षणी स्वगृही परततील, अशा एक ना अनेक वावड्या गेल्या दीड वर्षात त्यांच्या विरोधकांनी उठवल्या; पण कितीही कटू प्रसंग आला तरीही हे नातं बिघडलं तर नाहीच, उलट एकमेकांवरील विश्वास अधिकच दृढ होत गेला, असे दिसते. (CM Eknath Shinde Birthday)

आता पुन्हा पुन्हा हेच सांगून चालणार नाही. झाला तो इतिहास होता; पण मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर शिंदे यांनी आपल्या 40 शिलेदारांसाठी जिवाचं रान करायला सुरुवात केली. त्यांच्या त्यांच्या विभागातील प्रलंबित असलेली विकासकामे तातडीने मार्गी लावली. वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन ते मार्गी लावले. त्या त्या भागातील धार्मिक, सामाजिक महत्त्व असलेली तीर्थक्षेत्रं, स्मारकं, रस्ते, चौक, सुशोभीकरण या कामांना प्राथमिकता देऊन त्यांना तातडीने निधी देऊन ती कामे वेगाने पूर्ण होतील याकडे लक्ष दिलं. त्यामुळेच कायम दुष्काळी भाग असलेल्या सांगोला सिंचन योजनेसाठी राज्य सरकारने 883 कोटी रुपये दिले. दुष्काळी खानापूर आटपाडी मतदारसंघासाठी वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. त्या त्या विभागातील नागरिकांना दिलासा मिळेल आणि तिथे पक्ष भक्कम होईल, आमदारांवरील जनतेचा विश्वास दृढ होईल असे निर्णय त्यांनी घेतले. अनेक आमदारांना तर आजवर कधीही मिळाला नव्हता एवढा निधी त्यांच्या भागांचा विकास करण्यासाठी मिळाला. त्यातून अनेक प्रश्न तर कायमचे मार्गी लागले. ज्याचं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावं लागेल. (Maharashtra CM Eknath Shinde Birthday)

राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे हे राज्यभर फिरताहेत. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या निमित्तानं आजवर 22 जिल्ह्यांतील लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यासोबतच ज्या जिल्ह्यात जातात, त्यावेळी तेथील स्थानिक आमदारांनी पूर्ण केलेले अथवा होऊ घातलेल्या कार्यक्रमांचे उद्घाटन अथवा भूमिपूजन ते करतात. आजवर एकही दौरा त्यांनी स्थानिक शिवसेना आमदाराने सुचवलेला किंवा ठेवलेला कार्यक्रम केल्याशिवाय पूर्ण केलेला नाही. एकवेळ त्यांच्या घरी जाणं आणि पाहुणचार घेणं त्यांनी टाळलं; पण पक्षाचे किंवा इतर कार्यक्रम त्यांनी कधीही टाळलेले नाहीत. (Maharashtra CM )

शिवसेना-भाजपच्या तरुण आमदारांचं कौतुक करतानाच प्रसंगी एखादा आमदार किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणी आजारी असेल तर वेळात वेळ काढून ते जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतात, कुणाच्या घरात कुणाचे निधन झाल्यास सगळ्यात आधी पाठीवरून फिरणारा सांत्वनाचा हात हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असतो. सदा सरवणकर यांचे बंधू असोत किंवा राहुल शेवाळे यांच्या मतुःश्रींचे निधन असो किंवा स्वपक्षात नसूनही संजय दिना पाटील यांच्या मतुःश्रींचे निधन झाल्याचं समजल्यावर अपरात्री साडेतीन वाजता जाऊन घेतलेली त्यांची सांत्वनपर भेट असो, असे अनेक प्रसंग सांगता येतील. अनेकदा वैद्यकीय कारणासाठी मदत करताना ते पक्ष, पद कशालाही महत्त्व देत नाहीत. मदतीला धावून जाणं एवढंच त्याना ठाऊक असतं. याच भावनेतून त्यांनी एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यानी नंतर मुख्यमंत्र्यांचे आभारही मानलं होतं. (Eknath Shinde Birthday)

आज शिवसेनेच्या आमदारांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी एकनाथ शिंदे हे आधारस्तंभ आहेत. असं असलं तरीही कुठं चूक झाली तर कान धरायलादेखील ते मागेपुढे पाहत नाहीत. मागे एक मंत्री ऐन पक्षाच्या बैठकीतच मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांना वाट्टेल ते बोलून तावातावाने वर्षावरून बाहेर पडले, बाहेर जाऊन त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या समोरही आपली नाराजी जाहीर केली. मुख्यमंत्री शिंदे यांना ही बाब समजल्यावर त्यांनी काही वेळानं या मंत्र्यांना फोन करून शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. स्वतः त्या कामात लक्ष घालू ,असंही सांगितले. मात्र, यापुढे माझ्या स्टाफमधील अधिकाऱ्यांशी तुम्हाला नीट बोलावं लागेल, अशी जाहीर तंबीदेखील त्या मंत्र्याला दिली. जिथं आपल्या माणसांच्या पाठीशी ठाम उभं राहायचं असेल तेव्हा एकनाथ शिंदे हे कुणाचीही पर्वा करत नाहीत; मग समोरचा कुणीही असो, हेच या प्रसंगातून समोर आलं.

शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक बूथमागे शिवदूत नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिवदूतांनी पक्षासाठी प्रचंड काम केलं आहे. सर्वसामान्य लोकांना पक्षाशी जोडलं आहे. या दिवाळीला मुख्यमंत्री शिंदे यांनी याच शिवदूतांना पक्षाच्या वतीने छोटीशी दिवाळी भेट पाठवण्याचा निर्णय घेतला. काम करणाऱ्या प्रत्येक शिवदूतापर्यंत ही दिवाळी भेट पोहोचवण्याची जबाबदारी काही अधिकाऱ्यांना दिली. गावागावांत शिवदूतांना मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनिमित्त पाठवलेली खास भेट मिळाली.

शिवसेना ताब्यात आल्यानंतर पोटच्या मुलाप्रमाणे ही संघटना, तिचं राज्यभर विस्तारलेलं जाळं, वेगवेगळ्या शाखा, संलग्न संघटना यांना बळ देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. अत्यंत जीर्ण आणि कोणत्याही क्षणी पडतील अशा पक्षाच्या शाखा पाडून पुन्हा नीट बांधल्या... आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांएवढंच प्रेम सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरही केलं…!

SCROLL FOR NEXT