Chhagan Bhujbal  Sarkarnama
विशेष

Bhujbal Vote to Shivsena : बाळासाहेबांना चॅलेंज करणाऱ्या भुजबळांनी 34 वर्षांनंतर उमटवली धनुष्यबाणावर मोहोर...!

Vijaykumar Dudhale

Mumbai, 20 May : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज (ता. 20 मे) नाशिक शहरातील सिडकोमधील मॉडर्न स्कूल मतदान केंद्रावर कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. महायुतीचे नेते म्हणून त्यांनी नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना मतदान केले. छगन भुजबळ यांनी 1991 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना चॅलेंज दिले होते. त्याच भुजबळांनी तब्बल 34 वर्षांनंतर धुनष्य बाणासमोर मोहोर उमटवून आज शिवसेनेला मतदान केले. तत्पूर्वी त्यांनी 1990 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझगावमध्ये शेवटचे मतदान शिवसेनेला केले होते.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) हे शिवसेनेचे संस्थापक सदस्य होते. शिवसेनेचा (Shivsena) फायर ब्रॅंड नेता अशी छगन भुजबळ यांची ओळख होती. मुंबईसह महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात घरोघरी शिवसेना पोहोचवण्यात छगन भुजबळ यांचा मोठा वाटा आहे. शिवसेनेसाठी त्यांनी घेतलेले कठोर कष्ट पक्षाचे जुन जाणते नेते आजही मान्य करतात. त्या काळी भुजबळ हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे उजवे हात मानले जात होते. शिवसेनेकडून ते दोन वेळा मुंबईचे महापौरही बनले होते. भुजबळांची आमदारकीपर्यंतची वाटचाल शिवसेनेतच झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईचे दोन वेळा महापौरपद भूषवलेल्या छगन भुजबळ यांनी 1985 मध्ये मुंबईच्या माझगावमधून प्रथम अपक्ष म्हणून मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यानंतरची 1990 ची विधानसभा निवडणूक मात्र शिवसेना आणि पक्षाचे अधिकृत चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर माझगावमधून पुन्हा लढवली आणि जिंकलेही. त्या निवडणुकीत शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले होते, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळेल, असा होरा छगन भुजबळ यांचा होता. मात्र, पुढील राजकीय गणिते लक्षात घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदी मनोहर जोशी यांची नियुक्ती केली. त्यानंतर पुढे मंडल आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, यासाठी भुजबळ आग्रही होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे हे मंडल आयोगाच्या विरोधात होते, त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावरून डावलेले भुजबळ हे मंडल आयोगाच्या शिफारशी लागू होत नसल्याचे कारण सांगून शिवसेनेतून बाहेर पडले आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सामील झाले.

भुजबळ हे 1990 पासून काँग्रेस पुढे 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन राज्य सरकारमध्ये सहभागी आहेत. काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत 2019 पर्यंत शिवसेनेची कधीही युती नव्हती, त्यामुळे शिवसेनेला मतदान करण्याची वेळ भुजबळ यांच्यावर आली नव्हती.

महायुतीसोबत गेलेले छगन भुजबळ यावेळी नाशिकमधून लोकसभेसाठी इच्छुक होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून भाजपच्या राज्यातील नेत्यांपर्यंत सर्वजणच भुजबळांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या ताठर भूमिकेमुळे भुजबळांना माघार घ्यावी लागली आणि हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेला.

महायुतीचा धर्म म्हणून छगन भुजबळ यांनी आज तब्बल 34 वर्षांनंतर शिवसेनेला मतदान केल्याचे मानले जात आहे. कारण 1990 नंतर 2024 पर्यंत शिवसेनेला मतदान करण्याची वेळ भुजबळांवर कधीही आला नाही. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत युती धर्मामुळे भुजबळ यांना हेमंत गोडसे यांच्या नावासमोरील धनुष्य बाणापुढील बटण दाबून शिवसेनेला पुन्हा एकदा मतदान करण्याची संधी मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT