Maharashtra Political News : ऐन हंगामात केलेली कांदा निर्यातबंदी भाजपची पाठ सोडायला तयार नसल्याचे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात दिसून आले. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण, सत्ताधाऱ्यांकडून त्यावर कोणताही उपाय शेवटपर्यंत योजिला गेला नाही. तो राग तिसऱ्या टप्प्यापासून महाराष्ट्रात तीव्रतेने जाणवू लागला आहे. माढा लोकसभा मतदारसंघापासून सुरू झालेला हा राग आज शेवटच्या टप्प्यातील मतदानादरम्यान नाशिकच्या सटाण्यापासून चांदवडपर्यंत दिसून आला. खुद्द कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनीही त्याबाबत भाष्य केले, त्यामुळे कांदा निर्यातबंदीचा निर्णय भाजपच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कांदा निर्यातबंदीची (Onion Export Ban) मागणी कोणीही केलेली नसताना केंद्र सरकारने (Central Government) डिसेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला. वास्तविक सरकारनेच डिसेंबर अखेरपर्यंत निर्यात सुरू राहील, असा निर्णय घेतला होता. मात्र, आपलाच निर्णय बदलत सरकारने कांदा निर्यातबंदी करून टाकली होती. निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. कांदा 40 रुपये किलोवर असताना निर्यातबंदीच्या निर्णयामुळे तो दहा रुपयांवर आला होता. त्यावेळी निर्यातबंदीच्या विरोधात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला होता. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) हे स्वतः नाशिक जिल्ह्यातील आंदोलनात सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही त्यांनी कांद्याच्या संदर्भात वेळोवेळी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्यापासून कांदा या विषयाने भाजपला जेरीस आणायला सुरुवात केली. सोलापूर, धाराशिव हे मतदारसंघ कांदा उत्पादक म्हणून ओळखले जातात. माढ्याच्या प्रचारादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कांद्याच्या निर्यातबंदीवरून केंद्रावर तोशेरे ओढले होते. त्याचवेळी नेमके केंद्र सरकारने गुजरातच्या कांद्याला परवानगी दिली होती. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्यानंतर केंद्राने लाल कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. पण, कांद्यावर निर्यातशुल्क वाढविल्याने त्याचा तेवढासा फायदा कांदा बाजारावर झालेला दिसत नाही.
माढा लोकसभा मतदारसंघातील कांदा उत्पादक करमाळ्यातील एका शेतकऱ्याने चक्क कांद्याने तुतारीचे बटन दाबून भाजपच्या विरोधात मतदान करत आपला संताप व्यक्त केला होता. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इतर ठिकाणाहून या संदर्भाने घडामोडी घडत होत्या. पुढच्या चौथ्या टप्प्यात कांदा उत्पादक असणारे नगर आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यातून रोष व्यक्त केला गेला. विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघात हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला. खुद्द महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी याच मुद्यावरून रान तापवले होते.
पुढे दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आयोजित केली हेाती. त्याच सभेत काही युवकांनी पंतप्रधानांना कांद्यावर बोला, अशी मागणी केली. त्यावेळी एकच गोंधळ उडाला. असा प्रकार पंतप्रधानांच्या सभेत यापूर्वी कधीही झाला नव्हता. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेऊन बाहेर काढले, त्यानंतर मोदी यांनी कांदा आणि निर्यातबंदीच्या संदर्भाने काही मुद्दे मांडत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता.
आज त्याच नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातबंदीचा विषय पुन्हा तीव्रतेने पहायला मिळाला. बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण आणि संजय चव्हाण यांनी कांद्यात माळा गळ्यात घालून मतदान करत निषेध व्यक्त केला. तसेच, नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव येथील काही युवक शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदान केंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना मतदान केंद्रास जाण्यास मज्जाव केला. अखेर गळ्यातल्या कांद्याच्या माळा काढल्यानंतर त्यांना मतदानासाठी केंद्रात जाण्याची परवानगी दिली.
अधिकाऱ्यांसमोर कांद्याचा माळा घालून काय उपयोग?
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये आज आपले मतदान केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कांद्याच्या प्रश्नासंदर्भात राजकारण्यांपुढे सत्याग्रह करा. मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या समोर कांद्याचा माळा घालून काय उपयोग होणार आहे. त्याऐवजी आमच्यासारख्या राजकारण्यांपुढे सत्याग्रह करा. त्या सरकारी अधिकाऱ्यांसमोर असे कृत्य करू नका, असे आवाहन भुजबळ यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे कांद्याचा प्रश्न भाजपचा वांदा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.