Eknath Shinde Group
Eknath Shinde Group Sarkarnama
विशेष

Shinde Group News : शिंदे गटातील आमदाराने स्पष्टच सांगितले : ‘मुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्ताराला होकार; पण...’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मंत्रिमंडळ विस्ताराला (cabinet expansion) होकार आहे. पण, काही भौगोलिक, विभागीय विषय असतात. काही समीकरणं असतात, त्यामुळे थोडंसं कुठंतरी अडलं असावं, असं मला वाटतं, असे शिंदे गटातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी सांगितले. त्यामुळे भोंडेकर यांचा रोख कुणाकडे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Chief Minister Shinde's positive to cabinet expansion; But...' : MLA Narendra Bhondekar)

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारास विलंब होत असल्याने मंत्रिपदाच्या आशेने शिंदे गटात दाखल झालेल्या आमदारांचा आता संयम सुटत चालला आहे. आमदार बच्चू कडू यांनी तर अनेकदा इशारा दिला आहे. तसेच, शिंदे गटातील आमदारही उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार भोंडेकर बोलत होते.

नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळ विस्तारासाठी ग्रीन सिग्नल आहे. पण काही विभागीय आणि भौगोलिक विषय असतात. काही राजकीय समीकरणं असतात. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचे थोडंसं कुठंतरी अडलं असावं, असं मला वाटतं. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलेला आहे. लवकरच तुम्हाला तो दिसेल.

भोंडेकर यांनी स्वतःच्या मंत्रिपदाबाबत बोलताना सांगितले की, आपल्या नेत्याला न्याय मिळेल, अशी माझ्या कार्यकर्त्यांना खात्री आहे. पण, सध्या मतदारसंघात कामं भरपूर मिळत आहेत, त्यामुळे मंत्रिपदाचा प्रश्न राहिलेला नाही. पण, आम्हा सर्व आमदारांचं एकच म्हणणं आहे की, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर व्हावा.

भोंडेकर म्हणाले की, शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी वगैरे काही नाही. बाळासाहेबांची शिवसेना हा आक्रमक पक्ष आहे. आमच्यात कुणी नाराज नाही. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. मंत्रीपद कोणाला द्यायचे, कुणाला द्यायचे नाही, हे या दोघांनी ठरवायचं आहे. मात्र, आम्हा सर्व आमदारांची एकच विनंती आहे की, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर करावा. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच महामंडळांचेही वाटप लवकरात लवकर करण्यात यावे. जेणेकरून ज्यांना कोणाला ते मिळेल, त्यांना काम करण्यासाठी संधी मिळेल. निवडणुकीच्या अगोदर सहा महिने दिलं तर हे आमदार मतदारसंघ पाहतील का? त्या खात्याचे काम पाहतील? त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार हा येत्या २६ जानेवारीपूर्वी करण्यात यावा, अशी आम्हा आमदारांची इच्छा आहे.

‘‘मंत्रिपद कोणाला द्यायचे, कुणाला द्यायचे नाही, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी ठरवायचं आहे. आमच्यामध्ये कोणीही नाराज नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांनी व्यक्त केलेली नाराजी नसून ती त्यांची आक्रमकता आहे, असेही आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT