विशेष

Eknath Shinde Birthday : भाजपला वैतागून एकनाथ शिंदेंनी भरसभेतच उद्धव ठाकरेंकडे राजीनामा देऊन टाकला...

Vijaykumar Dudhale

ठाणे आणि शिवसेना हे एक समीकरण आहे. कारण मुंबईच्या अगोदर शिवसैनिकांनी ठाण्यात शिवसेनेचा महापौर करून महापालिकेवर भगवा फडकवला होता. आनंद दिघे या बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर चाहत्याने कडवे शिवसैनिक ठाण्यात निर्माण केले होते. त्यातील एक नाव म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे. होय, एकनाथ शिंदे हे दिघे यांच्या तालमीत तयार झालेले कट्टर शिवसैनिक आहेत, त्यामुळे पक्षावरील अनेक संकटांच्या काळातही ते ढाल बनून राहिले आणि आलेली आव्हाने परतवून लावली. (Eknath Shinde Birthday)

आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्ह्यातील सैरभैर झालेल्या शिवसैनिकांना मानसिक आधार आणि पाठबळ देण्याचे मोठे काम एकनाथ शिंदे यांनी केले. पक्षासाठी वाटेल ते करण्याची ऊर्मी अंगी बाळगूनच ते शिवसेनेत आले होते. ‘शिवसेना’ ही चार अक्षरे शिंदे यांचा जीव की प्राण होती. त्यातून त्यांनी प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करत पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळेच विरोधी पक्षात मोठमोठे नेते असूनही त्यांनी शिवसेनेचा ठाणे हा बालेकिल्ला कधी ढासळू दिला नाही. ठाण्याबरोबरच पालघर जिल्हा आणि शेजारच्या महापालिकांमध्येही त्यांनी शिवसेनेची सत्ता आणली. (CM Eknath Shinde Birthday News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खरं तर १९८० मध्ये शिवसेनेत दाखल झालेल्या शिंदे यांना आमदार होण्यासाठी २००४ पर्यंत वाट पाहावी लागली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जो आदेश देतील, त्याप्रमाणे वागणारे शिंदे यांनी त्याबाबतही कधी तक्रार केली नाही. मंत्रिपदही त्यांना आमदार झाल्यानंतर तब्बल १० वर्षांनंतर मिळाले.

मोदी लाटेवर स्वार झालेल्या भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये आपल्या सर्वांत जुन्या मित्राला (शिवसेना) बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेनेनेही न डगमगता विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आणि विरोधी पक्षनेतेपदाचा मान आपसूकच एकनाथ शिंदे यांना मिळाला. एकनाथ शिंदेंनीही हिकमतीने विरोधकांचा किल्ला लढवला. (Eknath Shinde Special story)

पुढच्या सहा महिन्यांत शिवसेना भाजपसोबत सत्तेत गेली. मात्र, भाजपकडे स्वतःचे १२२ आमदार आणि त्यांना काही अपक्षांचा पाठिंबा होता, त्यामुळे शिवसेनेला सरकारमध्ये दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली. त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह १० आमदार मंत्री म्हणून सहभागी झाले होते. त्यात शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.

भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला सोबत तर घेतले. मात्र, दुय्यम खाती आणि कमी बजेटची मंत्रालये शिवसेनेच्या माथी मारली होती. त्यामुळे शिवसेनेसारख्या लढवय्या नेत्यांचा सरकारमध्ये दम घुसमटत होता. सरकारमध्ये राहूनही आपल्याला कामे करता येत नसतील, तर सरकारमध्ये राहण्यात काय मतलब आहे, अशी भावना शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांची होती. भाजपकडून होणाऱ्या आर्थिक नाकेबंदीमुळे हे सर्व मंत्री हतबल झाले होते. शिवसेना पक्षप्रमुखांच्या कानावर ही गोष्ट जाणे गरजेचे होते. (CM Eknath Shinde Birthday News)

शिवसेना-भाजपच्या त्या युती सरकारमध्ये रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते, दीपक सावंत असे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. मात्र, भाजपकडून होणाऱ्या कोंडीच्या विरोधात, शिवसैनिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनीच आवाज उठवला. ‘मी आता भाजपसोबत काम करू शकत नाही,’असे म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे धाडस त्यावेळी प्रथमच मंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांनी दाखवले होते.

अन्यायाच्या विरोधात लढणे, हे रक्तातच असल्यामुळे शिंदे यांनी भाजपकडून होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला होता. पक्षासाठी आणि सामान्य शिवसैनिकांसाठी शिंदे यांनी कायम पुढाकार घेतला. त्यामुळेच ठाण्यात ते ‘अनाथाचे नाथ’ म्हणून ओळखले जाऊ लागले होते. सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिकांसाठी शिंदेंच्या घराचे दरवाजे कायम उघडे असायचे. अशा घटनांमुळे शिंदेंचा शिवसैनिकांशी थेट ‘कनेक्ट’ होता.

पुढे २०१९ मध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सामील झाली, त्यावेळी पहाटेच्या शपथविधीचे एक नाट्य महाराष्ट्रात घडले होते. त्या नाट्यात गायब झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना शोधून आणण्याची जबाबदारीही एकनाथ शिंदे यांनी यशस्वीरित्या पार पडली होती. याशिवाय शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षित ठेवण्याचे मोठ्या जोखमीचे कामही शिंदे यांनी लिलया पार पाडले होते. महाविकास आघाडी सरकारच्या उभारणीतील शिंदे यांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. त्यामुळेच त्यावेळी खरं तर एकनाथ शिंदे यांचाच मुख्यमंत्रिपदावर हक्क होता. मुख्यमंत्रिपद तर सोडाच, पण त्यांना सरकार आणि शिवसेनेतसुद्धा तिसऱ्या क्रमांकाची भूमिका पार पाडावी लागली होती. शिंदे यांनी तीही भूमिका ‘शिवसेना’ या चार अक्षरासाठी मोठ्या आनंदाने स्वीकारली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT