Year Ender 2023: Sarkarnama
विशेष

Year Ender 2023: अजितदादांचं बंड ते मणिपूरमधील संघर्ष; वर्षातील 10 मोठ्या घडामोडी !

Maharashtra Flashback 2023: हे वर्ष देशासह राज्याच्या राजकीय, सामाजिक पटलावर दूरगामी परिणाम करणारे ठरले.

अय्यूब कादरी

Flashback Or Year Ender : 2023 हे वर्ष देशासह राज्याच्या राजकीय, सामाजिक पटलावर दूरगामी परिणाम करणारे ठरले आहे. मणिपुरातील मैतेई-कुकी यांच्यातील हिंसाचार आणि कुकी महिलांना नग्नावस्थेत फिरवण्यात आल्यामुळे अख्ख्या देशाची मान शरमेने खाली गेली. त्या महिलाच नव्हे, तर समाजही त्या दिवशी निर्वस्त्र झाला. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा राजीनामा आणि त्यानंतर अजितदादा पवार यांनी बंड केले.

भाजपने काँग्रेसला जबर धक्का देत तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. दुसरीकडे, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील विजय काँग्रेसला मैदानात तग धरून उभे राहण्यासाठी पुरेसा ठरला. मराठा आरक्षण आंदोलनाने राज्यात सामाजिक घुसळण झाली. याच वर्षात देशाला नवीन संसदही भवन मिळाले. बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेचे नवीन आकडे जाहीर झाले. 2023 ला निरोप देताना वर्षभरातील महत्वाच्या घडामोडींचा हा धावता आढावा.

मणिपूरमधील मेतैई-कुकींमधील संघर्षाने चिंता वाढवली

मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समाजांमध्ये जातीय संघर्ष सुरू झाला आणि तो टोकाला पोहोचला. देशातील उर्वरित भागांना या संघर्षाची चाहूल उशीराच लागली. या संघर्षात 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मणिपूरमधील बहुसंख्य मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचे निर्देश एप्रिलमध्ये दिले. कुकी समुदायासह अन्य अल्पसंख्याक आदिवासी जमातींनी याविरोधात आंदोलन सुरु झाले.

त्याची परिणती रक्तरंजित संघर्षात झाली. खून, महिलांवर अत्याचार असे प्रकार घडू लागले. कुकी-झोमी समाजाच्या दोन महिलांना नग्नावस्थेत फिरवण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे देश सुन्न, स्तब्ध झाला. देशाची मान शरमेने खाली गेली. आॅक्टोबरमध्ये या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात संशयित म्हणून सहा अल्पवयीन मुलांचा समावेश होता. ते कृत्य आणि आरोपी अल्पवयीन, यामुळे समाज म्हणून आपणही निर्वस्त्र झालो. समाज मणिपूरमध्ये वर्षअखेरिसही हिंसाचाराचे प्रकार सुरूच होते.

शरद पवारांचा राजीनामा, बंड करत अजितदादा बनले उपमुख्यमंत्री

शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन 2 मे रोजी झाले. 63 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीनंतर आता थांबायचा विचार करणे आवश्यक आहे, असे म्हणत त्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी त्यांनी लागलीच समितीही स्थापन केली.

अजितदादांकडे राज्याची, तर सुप्रिया सुळे यांच्याकडे त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणाची धुरा सोपवून दिली. शरद पवारांच्या राजीनाम्याला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रखर विरोध केला. त्यामुळे 5 मे रोजी शरद पवार यांनी राजीनामा दिला. याच्या काही दिवसांनंतर अजितदादा 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. 2 जुलै रोजी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

शिवसेना, धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनाच

2022 मध्ये शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली होती. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. भाजपसोबत जाऊन शिंदे हे मुख्यमंत्री बनले. मग पक्ष कोणाचा यावरून न्यायालयीन लढाई सुरू झाली. पक्षाचे व्हिप डावलणाऱ्या शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण न्यायालयात गेले.

राज्याच्या विधिमंडळातील बहुमताच्या आधारे शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असा निकाल निवडणूक आय़ोगाने दिला. त्यामुळे धनुष्यबाणही शिंदेनांच मिळाले. आमदार अपात्रतेचे प्रकरण न्यायालयात असताना निवडणूक आयोगाने हा निकाल दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेना गमवावी लागली. 40 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात गेले होते. त्याच्या आधारावरच निवडणूक आयोगाने हा निकाल दिला.

पुण्यातील कसब्यात भाजपला धक्का, काँग्रेसच्या धंगेकरांची सर्वत्र चर्चा

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने पराभव केला. या मतदारसंघात तब्बल 28 वर्षांनंतर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. भाजपने संपूर्ण शक्ती पणाला लावूनही धंगेकर यांच्यासमोर रासने यांचा निभाव लागला नाही. यानिमित्ताने राज्यभरात काँग्रेसपेक्षा धंगेकर यांचीच अधिक चर्चा झाली. काँग्रेसकडे योग्य, धडाडीचे, लोकांची कामे करणारे कार्यकर्ते आहेत. मात्र, त्यांना संधी दिली जात नाही, ही चर्चा यानिमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाली. धंगेकर यांच्या विजयाने राज्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या.

गिरीश बापट, लक्ष्मण जगताप, बाळू धानोरकर यांचे निधन

पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजाराने 29 मार्च रोजी निधन झाले. भाजपसाठी आणि पुणेकरांसाठी हा मोठा धक्का ठरला. गिरीश बापट हे लोकांमध्ये सहज मिसळायचे. पुण्यात भाजप रुजविण्यात त्यांचे योगदान मोठे होते. भाजपचे पिंपरी-चिंचवड येथील आमदार लक्ष्मण जगताप यांचेही दीर्घ आजाराने 3 जानेवारी रोजी निधन झाले. ते मूळचे काँग्रेसचे होते. मात्र नंतर ते राष्ट्रवादीत गेले आणि तेथून भाजपमध्ये आले होते. काँग्रेसचे चंद्रपूरचे तरुण खासदार बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झाले. त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केली होती. नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते.

वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी

भागतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदाची कारकीर्द सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहिली. महाविकास आघाडी सरकारची स्थापना आणि सरकार पडल्यानंतरच्या विविध घडामोडींत त्यांची भूमिका वादग्रस्त ठरली. ते प्रचंड टीकेचे धनी ठरले. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी कोश्यारी यांनी भल्या पहाटे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती.

छत्रपती शिवाजी महाराज. महात्मा जोतिबा फुले यांच्यावरील त्यांच्या वादगस्त विधानांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. राज्यात महायुतीचे सरकार असताना 13 फेब्रुवारी रोजी त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर ते राजकारणातूनही निवृत्त झाले.

भाजपचा दबदबा कायम, काँग्रेसच्या आशा जिवंत

वर्षाच्या सुरुवातीला ईशान्येकडील त्रिपुरा, नागालँडची निवडणूक भाजप आघाडीने जिंकली. वर्षअखेरीस झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. मध्यप्रदेशात भाजपने मोठा विजय मिळवत सत्ता कायम राखली. यासह राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्ये काँग्रेसच्या ताब्यातून अक्षरशः हिसकावून घेतली.

कर्नाटक निवडणुकीतील विजयाने काँग्रेसमध्ये उत्साह भरला खरा मात्र तो मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकीत कामाला आला नाही. तिकडे तेलंगणात रेवंथ रेड्डी यांच्यासारख्या आश्वासक चेहऱ्याच्या बळावर काँग्रसने सत्ता मिळवली. बीएआरसच्या पराभवामुळे तत्कालीन मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्र दिग्विजयाचे मनसुबे धुळीस मिळाले.

मराठा आरक्षण आंदोलन पेटले

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मराठा समाजाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आरक्षणासाठीचा हा एल्गार अंतरवाली सराटी (जि.जालना) येथील जरांगे पाटील यांच्या उपोषणाने 29 आॅगस्ट रोजी सुरू झाला. उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी एक सप्टेंबरला केलेल्या लाठीमारामुळे आंदोलनाची धग वाढली. मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ताकदीनिशी एकवटला. त्यांच्या समर्थनार्थ गावोगावी उपोषण सुरू झाले. अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली.

30 आॅक्टोबरला या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. काही लोकप्रतिनिधींची घरे, सरकारी इमारतींचे नुकसान करण्यात आले. हे नुकसान करणारे मराठा आंदोलक, नव्हते असे जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. सरकारच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी दिवाळीच्या तोंडावर उपोषण मागे घेतले, मात्र ते दिवाळीलाही आपल्या घरी गेले नाहीत. मराठा आरक्षणासाठी वेळोवळी दिलेली मुदत सरकारने पाळली नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आता नवीन वर्षात मुंबईवर धडकण्याचा इशारा दिला आहे.

ओबीसी समाजाचीही राज्यभरात उपोषणे

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाने प्रखरपणे विरोध केला आहे. यासाठी ओबीसी समाजाने ठिकठिकाणी एल्गार सभा घेतल्या, उपोषण करण्यात आले. ओबीसी नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात एकमेकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात टीका-टिपण्णी झाली. राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील एकमेकांविरुद्ध उघड भूमिका घेताना, आरोप-प्रत्यारोप करताना दिसून आले.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालेल्या अंतरवाली सराटीपासून 20 किलोमीटरवरील अंबड गावात ओबीसी समाजाने आरक्षण बचाव आंदोलन सुरू केले. राज्यातील विविध भागांत सभा झाल्या. रवींद्र टोंगे यांनी चंद्रपूर येथे 11 सप्टेंबरला अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात जाऊन सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन टोंगे यांना दिले होते. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

बिहारमध्ये जातनिहाय जनगणना

नितीशकुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये जातनिहाय जनगणना केली. हा निर्णय ऐतिहासिक ठरला. वर्षाच्या प्रारंभी ही जनगणना सुरू झाली होती. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी दोन आॅक्टोबरला त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. अशा प्रकारची आकडेवारी 92 वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. 1941 मध्येही अशी जनगणना झाली होती, मात्र त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती. यंदा दोन आॅक्टोबरला समोर आलेल्या आकडेवारीनुसार संबंधित प्रवर्गांची आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. जातनिहाय जनगणनेवरून विरोधी पक्षांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

देशाला मिळाले नवे संसद भवन

मावळत्या वर्षात देशाला नवीन संसद भवन मिळाले. 8 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. या कार्यकर्मावर जवळपास 20 विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी, अशी या विरोधी पक्षांची मागणी होती. संसदेच्या या नवीन इमारतीत 19 सप्टेंबरपासून कामकाज सुरू झाले. लोकसभेच्या अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल स्थापित करण्यात आला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरून यांनी हे सेंगोल धर्मगुरुंच्या हस्ते सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून स्वीकारले होते.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT