Devendra Fadnavis, Ajit pawar, bhagtsingh Koshyari Sarakarnama
विशेष

Maharashtra Political News : 80 तासांतच गडगडलेल्या 'त्या' सरकारच्या आठवणी आजही ताज्या !

Sachin Waghmare

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील जनता झोपेतून अजून पुरती जागेही झालेली नव्हती की त्यांच्या कानावर एक धक्कादायक बातमी येऊन धडकली. त्यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. रात्रीपर्यंत तर अमुक परिस्थिती होती आणि पहाटे असे कसे झाले? असा प्रश्न राज्यातील मंडळींना पडला. बातमी अशी होती की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गंमत अशी की, या पहाटेच्या शपथविधीसाठी राज्यात लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट रातोरात हटवण्यात आली होती. 23 नोव्हेंबर 2023 ची ती पहाट, त्याला गुरुवारी चार वर्षे पूर्ण झाली आहेत.

प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद, या वादातून शिवसेना आणि भाजपचे बिनसले होते. मार्ग निघाल्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली होती. यासाठी बराच काळ गेल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. अजितदादा पवार यांचे त्यावेळीही नेहमीसारखे तळ्यात मळ्यात सुरू होते. भाजपने त्यांना गळाला लाऊन हा शपथविधी घडवून आणला होता.

तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यात महत्वाची भूमिका बजावली होती. कुणालाही पत्ता लागणार नाही, अशा पद्धतीने अजितदादा पवार यांनी आपल्या काही आमदारांची जुळवाजुळव केली होती. कोश्यारी यांनीही गुपचूपपणे शपथविधी उरकला होता.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या 'महाविकास आघाडी'चं सरकार 23 नोव्हेंबर 2019 ला सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे या शपथविधीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. हा सर्व प्रकार महविकास आघाडीच्या दृष्टीने मोठा अविश्वासाचा होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अवघ्या एक दोन दिवसातच शिवसेनासोबत महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे चित्र असताना अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाल्याप्रमाणे वातावरण होते. त्यादिवशी सकाळी १० पर्यंत काय घडले असेल याचा अंदाज येत नव्हता.

अनेक आमदार होते 'नॉट रिचेबल'

पहाटेच्या या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांचे मोबाइल नॉट रिचेबल लागत होते. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत किती आमदार असावेत, याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे सर्वजण अंदाज घेत होते. अजित पवार यांच्यासोबत शपथविधीला आठ ते दहा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्याचे समजले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्व सूत्रे हाती घेतली. त्यांनी सर्व आमदारांना फोन करून बोलावून घेतले.

पवारांनी घेतली होती सर्व सूत्रे हाती

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी स्वतः फोनवरून चर्चा केली. त्यांना बोलवून घेत आधार दिला. दुसरीकडे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांना कामाला लावून तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील डॅमेज कंट्रोल रोखले. त्यांनी बैठक बोलवुन घेतली. या वेळी राष्टवादी काँग्रेसचे ५४ पैकी जवळपास ५० आमदार हजर राहिल्याने हे आमदार त्यांच्यासोबत असल्याचे पुढे आले. त्यामुळे अजित पवार यांनी शपथविधी घेताना दिलेले ५४ आमदारांच्या पाठिब्यांचे दिलेले पत्र कुचकामी ठरले.

दिल्ली, मुंबईतील हॉटेलांत घडला होता थरार

अजितदादांकडे गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी दिल्ली, मुंबईतील हॉटेलांत थरार घडला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री संजय बनसोडे दिल्लीला जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना शिवसैनिकांनी विमानतळावरून परत आणले होते. त्यासोबतच अजित पवार गटाच्या नजर कैदेत असलेल्या काही आमदारांना परत शरद पवार यांच्याकडे आणण्यासाठी नेतेमंडळींना कसरत करावी लागली होती. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका तरुण कार्यकर्तीने काही आमदारांची सुटका केली होती.

अजित पवार यांची केली मनधरणी

राजकारणात काही काही घटना अशा असतात ज्या काळाच्या पाटीवर आपलं अस्तित्व कायमचं अधोरेखित करुन जातात. पहाटेचा शपथविधी ही अशीच घटना ठरली. शरद पवारांनी अजित पवारांसह गेलेल्या सगळ्या आमदारांना परत आणले. त्यानंतर दोनच दिवसाच्या आत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांची देखील समजूत काढण्यात त्यांना यश आले.

त्यांनी केवळ 80 तासांतच त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने त्याकाळी पहाटेच्यावेळी आलेले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळले. त्यानंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतली.

विळ्या भोपाळ्याचे सख्ख्य असलेले पक्ष आले एकत्र

शरद पवार यांनी पुढाकार घेत महाविकास आघाडी स्थापन करीत ती पूर्णत्वाकडे नेली. त्यानंतर पाच दिवसातच म्हणजे २८ नोव्हेबर २०१९ ला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि अजित पवार हे त्या मंत्रिमंडळातही उपमुख्यमंत्री होते. हा सगळा घटनाक्रम महाराष्ट्राने पाहिला. सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे विळ्या भोपाळ्यासारखं सख्ख्य असलेले पक्ष एकत्र येतील असं कुणालाही खरंतर वाटलं नव्हतं मात्र तो प्रयोगही महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वीरित्या पार पडला.

पहाटेच्या शपथविधीबद्दल काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस

पहाटे शपथ घेऊन वर्ष पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की, हा घटनाक्रम कधीच विसरणार नाही. या पुढे पहाटे कधीच शपथ घेणार नाही. त्यासोबतच 'या पुढे पहाटे शपथ घेणार नाही, आता या पुढे तुम्हाला योग्य वेळी शपथविधी दिसेल,' असं म्हणतानाच त्यांनी अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला होता.

आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक

पहाटेच्या या शपथविधीनंतर सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींनी केले होते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप या मुळे वातावरण चांगलेच रंगले होते. देवेंद्र फडणवीसांना याबाबत विचारले असता त्यांनी तेव्हा राष्ट्रपती राजवट कुणाच्या सांगण्यावरुन लावली गेली होती? याचं उत्तर शरद पवार यांनी द्यावं असं म्हणत पुन्हा एकदा शरद पवारांकडेच अंगुली निर्देश केला होता.

पवार- ठाकरेंकडून विश्वासघात...

त्याबाबत पुन्हा एकदा शरद पवारांना (Sharad Pawar) विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले की ,समोरचा विकेट देत असेल तर ती घेतलीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली, अशी बोलकी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत अजित पवार यांनी बंड वगैरे केलं नव्हतं. ज्या काही गोष्टी पहाटेच्या शपथविधीच्या वेळी झाल्या त्या सगळ्या शरद पवारांसह ठरल्या होत्या. त्यांना या सगळ्याची पूर्ण कल्पना होती असं फडणवीस म्हणाले. शरद पवार यांनी विश्वासघात केला, त्यासोबत उद्धव ठाकरे ठाकरेंनी विश्वासघात केला, असा आरोप त्यांनी केला होता.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT