sharad pawar jayant patil ajit pawar sarkarnama
विशेष

Jayant Patil : वजनदार नेते अजितदादांकडे, जयंतरावांची पुन्हा परीक्षा; पण...

Anil Kadam

शरद पवारांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. हाताचे चिन्ह सोडून घड्याळ घेऊन लढावे लागले. आता पुन्हा ती वेळ पवार आणि जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्यावर आली आहे. पंचवीस वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या ताब्यात गेला, अन् शरद पवारांनी नव्याने 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' असा नवा पक्ष काढला. आता चिन्हही मिळेल. पण, तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. सध्या शरद पवारांच्या साथीला केवळ जयंत पाटील हेच ताकदवान नेते आहेत. त्यांच्यापुढे नवा पक्ष आणि चिन्ह रुजविण्याचे आव्हान आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जयंतरावांची मोठी परीक्षा असेल.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जेष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) एकाकी पडले. 1999 मध्ये पवारांसोबत आमदार, खासदार तयार होते. राष्ट्रवादीमध्ये सर्व ताकदीचे आणि वजनदार नेते होते. राज्यातील सहकार शरद पवारांच्या शब्दावर चालत होते. त्यामुळे राज्यातील बहुतांश कारखानदार शरद पवारांच्या पाठिशी राहिले. त्यावेळी विरोधी पक्ष एवढा ताकदवान नव्हता. केवळ काँग्रेसमध्येच गटतट होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांच्या ताब्यात गेला आहे. त्यात पक्षातील वजनदार नेते अजितदादांच्या बरोबर आहेत. अशा स्थितीत जयंत पाटलांचा कस लागणार आहे. पण, त्यांच्यासाठी संकटातही ही मोठी संधी चालून आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2014 नंतर मोदी लाटेत देशात सर्वत्र भाजप पसरत गेला. अनेक राज्यात भाजपची सत्ता आली आणि त्यांची ताकद वाढली. शरद पवारांचेही वय वाढत गेले आणि अजित पवारांची ताकद वाढत गेली. अजित पवारांना ( Ajit Pawar ) मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा कधी लपून राहिली नाही. याचाच परिणाम म्हणून त्यांनी राष्ट्रवादी फोडली आणि पक्ष ताब्यात घेतला. अनेक मातब्बर नेते अजित पवारांबरोबर गेले. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हही अजित पवारांना दिले. येणाऱ्या काळात शरद पवार आणि जयंत पाटील यांना पक्ष पुन्हा जोमाने उभा करावा लागणार आहे.

यंदा लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. तळागाळातून नवी मोठ बांधांवी लागणार आहे. हे काही जयंत पाटील आणि शरद पवारांना नवीन नाही. शरद पवारांनी या अगोरदही अनेक चिन्हावर आणि अनेक पक्षातून निवडणूक लढवून जिंकलेही आहेत. जयंत पाटील आणि शरद पवार यांचा आजपर्यंत कोणीही पराभव करू शकले नाहीत. विकासकामे आणि सहकाराच्या माध्यमातून कार्यकर्ते त्यांना जोडले गेले आहेत.

पक्ष आणि चिन्ह जरी त्यांच्या हातातून गेले तरी त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्या दिवसापासून 'विजय निश्चय मेळाव्या'च्या माध्यमातून ते पुन्हा एकदा जनतेसमोर येत आहेत. अशा अडचणीच्या प्रसंगातून त्यांनी अनेकवेळा मार्ग काढला आहे. 1984 मध्ये राजारामबापू पाटील यांच्या अकाली निधनानंतर जयंत पाटील यांची राजकारणात एंन्ट्री झाली. जयंत पाटील यांनी पाच वर्षे मतदारसंघांचा अभ्यास केला आणि 1990 मध्ये पहिल्यांदा ते विधानसभेला उतरले. गेल्या सात निवडणुकीत प्रत्येकवेळी नवा उमेदवार त्यांच्या समोर उभा राहिला. प्रत्येकाला चितपट करीत ते पुढे चालले आहेत. मागील काही महिन्यांत राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आता पुन्हा शरद पवार आणि जयंत पाटील यांना शुन्यातून विश्व निर्माण प्रयत्न करावे लागणार असल्याचे चित्र दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT