Devendra Fadnavis | Eknath Shinde Sarkarnama
विशेष

Lok Sabha Election 2024 : शिंदे सेनेकडून भाजपची कोंडी, कल्याणचे उट्टे नाशिकला काढणार!

Nashik Lok Sabha Election 2024 : शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपची नाशिकमध्ये कोंडी करण्याचे सूतोवाच केले आहे.

Sampat Devgire

कल्याण लोकसभा मतदारसंघात ( Kalyan Lok Sabha Election 2024 ) भाजपने शिंदे शिवसेनेचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. त्यावरून भाजपा आणि शिंदे गटात राजकारण चांगलेच तापले आहे. शिंदे गटाने ही भाजपला धडा शिकविण्यासाठी त्यांची कोंडी करण्याची व्यवस्था केली आहे.

कल्याण मतदार संघातून ( Kalyan Lok Sabha Election 2024 ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांची उमेदवारी जाहीर केली. त्याचे राजकीय पडसाद लगेच उमटले. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी डॉ. शिंदे यांचा प्रचार करण्यास नकार दिला. तसा ठरावही पक्षाच्या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे शिंदे सेना आणि भाजपमध्ये चांगलाच राजकीय वाद उफाळून आला आहे. थेट शिंदे सेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनाच भाजपने आव्हान दिल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते चांगले संतापले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदार संघातून शिंदे सेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) आहेत. नैसर्गिक न्यायाने महायुतीचे उमेदवारी त्यांना मिळायला हवी होती. मात्र, भाजपने गोडसे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. नाशिकची जागा भाजपलाच मिळावी यासाठी नेत्यांकडे दोन वेळा शिष्टमंडळ भेटले. त्यामुळे महायुतीत नाशिकच्या जागेवरून वाद निर्माण झाला. या वादातूनच आता भाजपच्या धोरणानुसार राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना नाशिक मधून उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे शिंदे गट नाराज आहे. त्यांना आता आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी चक्क वरिष्ठांकडून मुकसंमती आहे. नाशिक मतदार संघात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

कल्याण मतदार संघात भाजपने शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करायचा नाही, असे जाहीर केले आहे. आता नाशिकमधूनही शिंदे सेनेचे कार्यकर्ते त्याचा कित्ता गिरवत आहेत. महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यास शिंदे सेनेचे कार्यकर्ते प्रचार करणार नाहीत, असे सुतोवाच थेट संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनीच केले आहे. त्यामुळे स्थानिक नेतेही आता महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार घालण्याच्या विचारात आहेत.

नाशिकची जागा शिंदे यांना मिळाल्यास पक्षाचे कार्यकर्ते प्रचार करतील की नाही याबाबत अनिश्चितता असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून नेत्यांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच आता थेट कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर होण्याआधीच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव दिसू लागला आहे. या निमित्ताने शिंदे गटाने कल्याण मतदार संघातील भाजपच्या भूमिकेचे उट्टे काढणार असल्याचे संकेत दिले आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT