BJP Sarkarnama
विशेष

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूरच्या बड्या नेत्याचे मंत्रिपद निश्चित?

सरकारनामा ब्यूरो

प्रभू वारशेट्टी

Solapur, 20 June : पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यात सोलापूरमधील (Solapur) भाजपच्या एका बड्या नेत्याचे मंत्रिपद निश्चित झाल्याची माहिती आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेली आढावा बैठक सोडून संबंधित नेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यात सोलापूरच्या त्या नेत्याचे मंत्रिपद निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी (Cabinet Expansion) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट आग्रही आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नाराज नेत्यांना संधी देऊन विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न महायुतीकडून होताना दिसत आहे.

संबंधित भाजप नेत्याच्या (BJP Leader) घरी पालकमंत्र्यांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. मात्र, त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत होणारी भेट रद्द करून मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला जाणे पसंत केले होते. त्या ठिकाणी त्यांच्यात मंत्रिपदाची चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सोलापूरला मंत्रिपद मिळून पालकमंत्रीही सोलापूरला होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या कालावधीतही सोलापूरला आतापर्यंत मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. ते मंत्रिपद आता शेवटच्या टप्पात सोलापूरला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातला आहे. त्या विस्तारात सोलापूरला पुन्हा एकदा भाजपकडून मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत सोलापूरला जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नव्हते, त्यामुळे पालकमंत्रिपदही बाहेरच्या नेत्याकडे होते. आघाडी सरकारच्या काळात दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड आणि त्यानंतर दत्तात्रेय भरणे असे पालकमंत्री सोलापूरला लाभले.

महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातही सोलापूरला स्थान मिळाले नव्हते. विधानसभा निवडणुकीत सोलापूरच्या जनतेने भाजपला चार आमदार आणि एक सहयोगी असे पाच आमदार निवडून दिले होते, त्यानंतरही सोलापूरला मंत्रिपदाबाबत उपेक्षितच राहावे लागले हेाते. त्यामुळे महायुती सरकारच्या काळातही पहिल्यांदा नगरचे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आली होती.

भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकास कामांच्या निधीबाबत बैठक हेाती. त्या बैठकीसाठी संबंधित बडा नेता गेला होता. मंत्रिपदासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा काळेंनी केला आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT