Narendra Modi Sarkarnama
विशेष

Modi's Malshiras Sabha : भाजपनं टायमिंग साधलं; माळशिरसमध्ये मोदींचा पिवळा फेटा बांधत काठी अन्‌ घोंगडं देऊन सत्कार...

Vijaykumar Dudhale

Solapur, 30 April : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (ता. 30 एप्रिल) माळशिरसमध्ये सभा झाली. भाजपच्या निवडणूक स्ट्रॅटेजीनुसार या सभेत मोदींचा पिवळा फेटा बांधून काठी अन्‌ घोंगडं देऊन सत्कार करण्यात आला. माढा लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाची निर्णायक मतदारसंख्या डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने पंतप्रधानांचा धनगरी वेशभूषा देऊन सत्कार केल्याचे उघड वास्तव आहे. दरम्यान, यापूर्वी पंढरपूरमधील मेळाव्यात अटलबिहारी वाजपेयी यांचा काठी-घोंगडं आणि गळ्यात ढोल घालून सत्कार करण्यात आला होता.

माढ्यातून (Madha Lok Sabha Constituency) मोहिते पाटील यांनी बंड केल्यानंतर भाजपचे बेरीजेचे राजकारण करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे (Dhangar community) नेते उत्तम जानकर यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न केला. कारण, माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची असलेली मतदारसंख्या डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने जानकरांसाठी रणनीती आखली होती. मात्र, जानकर यांना ठोस आश्वासन न मिळाल्याने त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. माळशिरसमधील कट्टर प्रतिस्पर्धी मोहिते पाटील (Mohite Patil) यांच्याशी युती करत लोकसभा निवडणुकीत मदत करण्याचा शब्द दिला. त्यामुळे भाजपचा हा डाव फसला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जानकर हाती न आल्यामुळे भाजपने माळशिरस विकास आघाडीच्या नावाखाली मोहिते पाटील आणि जानकर विरोधकांना एकत्र आणले. मात्र, मोहिते पाटील आणि जानकर यांच्या युतीपुढे माशिरस विकास आघाडी किती प्रभाव दाखवणार, हा प्रश्नच आहे. करमाळ्यातील धनगर नेते तथा माजी आमदार नारायण पाटील यांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यातही भाजपला यश आले नाही. त्यानंतर डॉ. अनिकेत देशमुख यांच्या बंडानंतर भाजपच्या आशेचा किरण थोडा जागा झाला होता. मात्र देशमुखांनी चोवीस तासांच्या आतमध्येच बंडाची तलावर मान्य केली.

माढ्यातील आव्हान लक्षात घेऊन भाजपनेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी माळशिरसमध्ये सभा लावली. सभेचे ठिकाणही धनगर समाजाचे प्राबल्य असलेला भागच निवडला. एरव्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका जिल्ह्यात एकच सभा घेतात. पण, सोलापूर जिल्ह्यात दोन उमेदवारांसाठी दोन सभा घेतल्या. त्यानंतर हाकेच्या अंतरावर असलेल्या साताऱ्यातही मोदींनी सभा घेतली.

माळशिरसमध्ये कृषी विभागाच्या जागेवर मोदींची आज सकाळी अकरा वाजताच सभा झाली. धनगर समाजाच्या वतीने मोदींचा पिवळा फेटा, काठी आणि घोंगडं देऊन सत्कार करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनीही आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. विशेष म्हणजे धनगरी वेशभूषेतील सत्कारानंतर भाषणाच्या सुरुवातीलाच ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोषही केला, तर बाळूमामांच्या नावानं चांगभलंही गाजवलं. त्यामुळे भाजपची निवडणूक स्ट्रॅटेजी स्पष्टपणे दिसत होती. मोदी यांनीही संपूर्ण भाषण अंगावर घोंगडी ठेवूनच केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT