Sugar Millers  Sarkarnama
विशेष

Sugar Millers Politics : 'साखरसम्राटां'ना सुटेना 'आमदारकी'चा मोह...! सोलापुरातील 9 कारखानदार विधानसभेच्या रिंगणात!

Solapur Assembly Election: सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातून नऊ साखर कारखानदार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे अकरा कारखानदार हे प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावत आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 06 November : साखर कारखानदारी आणि राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. साखर कारखान्याचे चेअरमन झालेल्या व्यक्तीला आमदार होण्याची घाई झालेली असते, त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखानदार हे आमदार किंवा खासदार आहेत. काही अपवाद वगळता सर्वच कारखानदारांना आमदारकी, खासदारकीचा मोह सुटलेला नाही, त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील नऊ साखर सम्राट हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर चार नेते हे अप्रत्यक्षरीत्या निवडणुकीशी संबंधित आहेत.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातून नऊ साखर कारखानदार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे अकरा कारखानदार हे प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावत आहेत.

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत त्यांच्या पाठीशी राज्यातील एका मोठ्या नेत्याचा हात असल्याची चर्चा आहे. काडादी हे सिद्धेश्वर कारखान्याचे काही वर्षे अध्यक्षही राहिले आहेत. सिद्धेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या सोलापूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभेसाठी (Assembly Election) शड्डू ठोकला असून त्यांच्यासमोर भाजपचे सुभाष देशमुख, महाविकास आघाडीचे अमर पाटील यांचे आव्हान असणार आहे. अमर पाटीलही सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक आहेत.

अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री शुगरचे मुख्य प्रवर्तक असलेले सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत. मातोश्री कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. मात्र, थकीत उसबिलामुळे हा कारखाना मध्यंतरी चर्चेत होता.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. या कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील शेजारच्या माढा मतदारसंघातून विधानसभेसाठी नशीब आजमावत आहेत. पंढरपूर तालुक्यातील 41 गावे या मतदारसंघाला जोडण्यात आलेली आहेत. याच गावाचा मोठा भरोसा अभिजीत पाटील यांना आहे. विठ्ठल कारखान्यासह इतर इतर तीन कारखानेही अभिजीत पाटील चालवत आहेत. यातील काही कारखाने हे बंद पडले होते, मात्र पाटील यांनी अल्पावधीतच ते कारखाने चालू केले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे हे आवताडे शुगर या साखर कारखान्याचे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सत्ता गेल्यानंतर अवघ्या वर्षभरात आवताडे शुगर हा खासगी साखर कारखाना सुरू केला आहे. आमदारकी टिकविण्यासाठी साखर कारखाना महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे ओळखून त्यांनी खासगी साखर कारखान्याची उभारण्याचे पाऊल उचलल्याचे दिसून येते.

करमाळा तालुक्यातील मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल हे विधानसभेसाठी करमाळ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बागल कुटुंबीयांकडे यापूर्वी तालुक्यातील आदिनाथ आणि मकाई हे दोन्ही सहकारी साखर कारखाने होते. मात्र, आदिनाथवर सध्या प्रशासक आहे.

राज्याचे सहकार मंत्री म्हणून काम केलेले सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाचे तीन साखर कारखाने आहेत. या कारखान्याशी सध्या सुभाष देशमुख यांचा संबंध नसला तरी त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात हे कारखाने आहेत. देशमुख हे दक्षिण सोलापूरमधून पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पंढरपुरातून प्रथमच विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. अनिल सावंत हे भैरवनाथ शुगर या खासगी कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत.

माढा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले रणजितसिंह शिंदे हे माढा तालुक्यातील केवड येथील बबनदादा शुगर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (दूध पंढरी) अध्यक्ष आहेत.

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हेही म्हैसगाव येथे विठ्ठल शुगर हा खासगी कारखान्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. मागील हंगामापर्यंत त्यांनी तो यशस्वीपणे चालवला आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल नऊ साखर सम्राट हे विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी नशीब आजमावत आहेत.

जिल्ह्यात नऊ साखर सम्राट हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात असले तरी अप्रत्यक्षरीत्या चार साखर सम्राटांचा निवडणुकीशी संबंध आहे. माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवणारे रणजितसिंह शिंदे यांचे वडील आमदार बबनराव शिंदे हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. साखर कारखानदारीमध्ये शिंदे यांचे मोठे नाव आहे.

मोहोळ राखीव मतदार संघातून यशवंत माने निवडणूक लढवत असले तरी खरी निवडणूकही माजी आमदार राजन पाटील यांच्याच हातात आहे. राजन पाटील यांच्याकडे लोकनेते हा खासगी साखर कारखाना आहे. त्यांचे पुत्र विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

सिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीप माने यांनीही विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळू शकलेली नाही, त्यामुळे ते निवडणुकीतून बाहेर पडले आहेत. मात्र, दक्षिण सोलापूर मतदारसंघात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भारतीय जनता पक्षाने पंढरपूरमधून उमेदवारी दिली नसली तरी पंढरपूर मतदारसंघात परिचारक यांची महत्त्वाची भूमिका आहे. ते ज्या गटाला पाठिंबा देतील तोच उमेदवार पंढरपूरमधून जिंकून येऊ शकतो. ते पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT