Jalna News : अंबडमध्ये ओबीसी मेळाव्यात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज आक्रमक भूमिका मांडली. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होणाऱ्या टीकेला भुजबळ यांनी आपल्या आक्रमक शैलीत, नाव न घेता एकेरीत उत्तर दिले. मराठा समाजात आजही अनेक समंजस नेते आहेत, याच्या कोठे नादी लागलात, ह्या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला, असा सवाल करत भुजबळांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. (Chhagan Bhujbal criticizes Manoj Jarange Patil)
जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज (ता. १७ नोव्हेंबर) ओबीसींचा महामेळावा झाला. त्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या वेळी भुजबळ यांनी लाठीचार्जवेळी झालेला पडद्यामागील घटनाक्रम आपल्या भाषणातून मांडला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आरक्षण म्हणजे गरिबी हटविण्याचा कार्यक्रम नाही. वर्षानुवर्षे पिचलेल्या लोकांना पुढे आणण्यासाठी हे आरक्षण आहे. आरक्षण काय आहे, हे एकदा समजून तर घे, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला. ते म्हणाले की, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आरक्षणासाठी ५८ मोर्चे निघाले, आम्ही त्याला विरोध केला नाही. मी विरोधी पक्षात असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा ठराव मांडला. मराठ्यांना आरक्षण द्या, असे मी त्या वेळी सांगितले. पण ते सर्वोच्च न्यायालयात अडकले. त्यावर मार्ग काढा, अभ्यास करा. त्यावेळी कोणाची घरे, दुकाने जाळली नाहीत. समंजस्य भूमिका घेतली.
राज्यात अनेक मराठा समंजस नेते आहेत आणि होऊन गेले. त्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली आहे. आजही मराठा नेते महाराष्ट्रात भरपूर आहेत. मला मराठा तरुणांना सांगायचं आहे की, याच्या कोठे नादी लागलात. ह्या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला. ह्याला कळंना ना वळना. त्यांच्याकडून लेकरं लेकरं केलं जातं. मग आमचीसुद्धा लेकरं आहेत. तुम्हाला आरक्षण वेगळ्या प्रवर्गातून घ्या ना. आमचा कुठं विरोध आहे, असा सवालही भुजबळ यांनी केला.
भुजबळ म्हणाले की, ओबीसींमध्ये सुरुवातीला २५० जाती होत्या. त्यात पुन्हा काही आयोगाच्या आदेशानुसार समाविष्ट. त्याला आम्ही कुठं विरोध केला. पण तुम्ही कायद्याने येत नाही. दादागिरी आणि गडबड करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही सरकारकडून योजना घ्या, आमचं काहीही म्हणणं नाही. पण आम्हाला देताना नाकं मुरडू नका.
...तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडं मोडत नाही
होय, मी जेलमध्ये बेसन भाकरी खाऊन आलो. मी छगन भुजबळ दिवाळीतसुद्धा खर्डा-भाकरी आणि कांदा फोडून खातो. मी स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडं मोडत नाही, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.