Rohit Pawar Sarkarnama
विशेष

Vitthal Sugar Factory : ‘काहीही करा; पण विठ्ठल बंद पाडा : राज्य बॅंक अन्‌ पोलिसांना मोठ्या नेत्यांचे फोन’

Rohit Pawar In Pandharpur : थकबाकी हा विषय विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या अगोदरचा आहे.

Vijaykumar Dudhale

Pandharpur News : अभिजित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अडचणीत असणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू केला. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भावही दिला. असे असताना राज्य सहकारी बॅंकेवर (शिखर बॅंक) दबाव आणला जात आहे. सत्तेत असणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांचे पोलिसांना आणि बॅंकांना फोन जात आहेत. ‘काहीही करा; पण कारखाना बंद पाडा,’ असे सांगितले जात आहे, असा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांंनी केला. (Police & State Bank are being pressured to take action against 'Vitthal': Rohit Pawar)

पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, ‘थकबाकी हा विषय विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या अगोदरचा आहे. निवडणुकीत लोकांनी विश्वास दाखवून अभिजित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निवडून दिले. ज्या संस्थेला विठुरायाचे नाव आहे, त्या संस्थेचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, या उद्देशाने गेल्या वर्षी वाईट काळ असूनही अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना चालू केला. उसाला चांगला भावही दिला.’

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘यंदाही अडचणीतून मार्ग काढून अभिजित पाटील यांनी कारखाना चालू ठेवला. असं असतानाही राज्य सहकारी बॅंकेवर दबाव आणून पोलिसांत तक्रार केली जाते. सत्तेत असणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांचे फोन एसपी आणि पोलिस अधिकाऱ्यांना येत आहेत. तसेच बॅंकेलाही केले जात आहेत. काहीही करा; पण कारखाना बंद पाडा, असे सांगितले जात आहे. कारखाना बंद पाडण्याचे कारण काय. थकबाकीचा विषय हा पूर्वीचा आहे. त्यामुळे बॅंकेनेही तडजोड केली पाहिजे. सध्याचे अध्यक्ष आणि संचालक प्रामाणिकपणे काम करीत आहेत,’ असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘अभिजित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंद पडलेला विठ्ठल कारखाना चालू केला, त्यामुळे राजकीय द्वेषातून कारखान्यावर कारवाई होऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. राजकीय द्वेषातून कोणी कारखान्याला अडचण करण्याचा प्रयत्न केला, तर पंढरपूर तालुक्यातील शेतकरी शांत बसणार नाहीत. पंढरपुरातील लोकं एकत्रित आली तर सत्तेतील लोकांना हे परवडणारे नाही. त्यामुळे सत्तेतील लोकांनी यामध्ये लक्ष घालू नये, अशी आमची विनंती राहील.’

महाराष्ट्रात रामराज्य आहे का?

सामान्य लोकांचा विचार केला जातो, त्याला रामराज्य म्हणतात. महाराष्ट्रातील लोकांच्या मनात रामराज्याचा विचार आहे. पण सत्तेत असलेली लोक शेतकऱ्यांचा अडचणी सोडवत नाहीत. महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाहीत. बेरोजगांचे प्रश्न सुटत नाहीत. सर्वसामान्यांकडे कोणी पाहत नाही. महाराष्ट्रात आज प्रत्येकाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यामुळे महाराष्ट्रात रामराज्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. सर्वांना समान अधिकार आणि सर्वसामान्यांचं ऐकून घेतलं जाईल, असे राज्य पाहिजे. पण आज कुठेही असं होताना दिसत नाही, असेही आमदार पवार म्हणाले.

पंढरपुरात येऊन प्रेरणा मिळते

पंढरपूर दौऱ्याबाबत रोहित पवार म्हणाले, चांगली घटना घडली, अडचण आली तर मी प्रत्येक वेळी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतो. आमदार झालो त्याच दिवशी रात्री मी दर्शनासाठी आलो होतो. लग्न झाल्यानंतरही आलो होतो. सुख-दुःखात प्रत्येक वेळी मी विठ्ठलाकडे आलो आहे. पंढरपुरात येऊन मी प्रत्येक वेळी प्रेरणा घेतो.

विठ्ठलापुढे नतमस्तक

देशात रामप्रतिष्ठापनेचा उत्साह आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येण्याचा निर्णय घेतला. येथे आल्यानंतर एका गोष्टीची जाणीव होते. गरीब-श्रीमंत असा येथे भेदभाव नसतो. जातीधर्मांमध्ये भेदभाव केला जात नाही. पंढरपुरात असा भेदभाव कधीच पाहायला मिळत नाही. त्यामुळे आजच्या दिवशी विठ्ठलापुढे नतमस्तक होणे फार महत्त्वाचे होते, असेही त्यांनी नमूद केले.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT