अभय नरहर जोशी
Pune News : नवीन वर्षांत काही नेत्यांनी केलेले गुप्त संकल्प आम्हाला समजले आहेत. ही ‘महाब्रेक्रिंग न्यूज’ ‘महा एक्सक्ल्युजिव्हली’ फक्त आम्ही प्रसिद्ध करत आहोत. त्यांच्या डायरीची पाने प्रस्तुत प्रतिनिधीच्या हाती लागली आहेत. ती खास ‘सरकारनामा’च्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
नागपूरकर ‘सीएम’
‘मी पुन्हा येईन’ हा संकल्प गेल्या वर्षी खरा ठरला बाबा एकदाचा. पण खूप घाम गाळावा लागला. आता खबरदारीनं पावलं टाकावी लागणारेत. अनेक सहकाऱ्यांच्या मनात तेच लोकांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, असे पक्के आहे. त्यांची ती इच्छा त्यांच्या मनातल्या मनातच राहून देण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. नवे वाद न होण्याची काळजी घरापासूनच घ्यावी लागेल. हिला सांगावं लागेल की चारचौघांत माझं खाणं काढू नकोस (अन् तुझ्या गाण्याचा अल्बमही काढू नकोस). कुणीही मुलाखत घेतली तरी अघळपघळ बोलून ‘राज’ उघड करू नकोस. बीड-परभणीनं घाम काढला आहे. आष्टीवाल्यांनी प्रकरण ‘धसा’स लावण्यासाठी खूपच घाम गाळलाय. त्यांना शांत करावे लागेल. शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम करून ऱ्हायलोय पण अनेक मंत्र्यांनी अद्याप पदभारच स्वीकारला नाहीये. आता यांचे शंभर दिवस कुठून मोजायचे हे ठरवावे लागेल. पालकमंत्रिपदाचा ‘जांगडगुत्ता’ सोडवावा लागेल. महाराष्ट्राच्या (अन् माझ्या) भल्यासाठी नव्या वर्षात प्रयागराजच्या महा कुंभमेळ्यात ‘नमो’रायांसह महास्नान करावं म्हणतोय.
ठाणेकर 'डीसीएम’
डॉक्टरांनी कितीही सांगितले की आपण बरे आहात. तरी आतून बरंच वाटत नाही सध्या. आजारी नसलो तरी फारसं हसूही चेहऱ्यावर फुटत नाही हे खरं. सारखं आपल्या गावी जावंसं वाटतंय. नव्या वर्षात आपल्या दरे गावीच ‘डीसीएम’ कार्यालय सुरू करावं का...तेवढाच वेगळा पायंडा पडेल. परवा ‘नमोरायां’च्या भेटीला सहकुटुंब दिल्लीवारी केली. मनातलं बरंच बोलायचं होतं. पण त्यांनी काही बोलूच दिलं नाही. ढोकळा-फाफडा देऊन बोळवण केली. वाटेत खायला खाकरेही दिले. नवीन वर्षांत दिल्लीवाऱ्या वाढवाव्या लागतील. हे गतिमान सरकार, कृतिशील सरकार, लोकांचे सरकार आहे...हे पालुपद कमी करावे लागेल. सरकारमध्ये असलो तरी हे माझ्या नेतृत्वाखालील सरकार नाही. असो. ‘डेडिकेटेड टु कॉमन मॅन’ होऊन आपलं ‘डीसीएम’पद सार्थ करू.
बारामतीकर ‘डीसीएम’
गेल्या वर्षी लोकसभेत नाय पण विधानसभेत (Vidhnsabha) चांगलं यश मिळालंय. पण माशी कुठं शिंकली कोण जाणे? एक एक झेंगट मागं लागत जातंय. नव्या वर्षात हे सर्व निस्तरावं लागेल. विधानसभेच्या ‘गुलाबी’ यशामुळे जोशात काही धडाडीचे निर्णय घेतले. तर काहीजण गुलाबी आनंदी झाले तर काही रागाने लालेलाल झाले. मंत्रिमंडळात जुन्या जाणत्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आपल्या गळ्यातील मफलर माझ्या गळ्यात अडकवून चांगलीच आवळली. ‘येवल्या’चा पतंग कापला म्हणून लैच ओरडा केला. आता नव्या वर्षात संक्रांतीला येवल्यात पतंग उडवायला जाऊन संक्रांतीला त्यांचं तोंड गोड करतो. त्या बीडनंही घाम फोडलाय. सत्तेच्या गुलाबाचे काटेच जणू टोचू लागलेत. कऱ्हाडला जाऊन ‘आत्मक्लेश’ करायचा विचार करतोय.
‘मातोश्री’वासी माजी ‘सीएम’
(येरझाऱ्या घालत) गेलेले वर्ष दोन हजार चोवीस मला अवघे वीस आमदार देऊन गेलं. नव्या वर्षात फेसबुक बाजूला लोकांत ठेवून फिरलं पाहिजे. मुंबई महापालिका कोणत्याही स्थितीत जाता कामा नये. माझ्या आदुबाळासाठी प्रसंगी काहीही करीन. त्याच्यासाठी त्या ‘सीएम’च्या दालनातही मी गेलो. त्यांचं अभिनंदन करून आदुसाठी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली. त्यांनी मात्र हसत हसत मला माझ्या ‘एक तर तू राहीन किंवा मी’ या बाणेदार उद्गारांची आठवण करून दिली. मी लगेच खुलासा केला, ‘अहो म्हणजे एक तर तुम्ही ‘सीएम’पदी रहाल किंवा मी तरी. बाकी कुणी नकोच. तुम्ही झालात. हरकत नाही...’ नव्या वर्षात विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फॉलोअप’ घ्यावा लागेल. (तेवढाच आदुबाळाला ‘कॅबिनेट दर्जा’ तर मिळेल) तोपर्यंत संपादकांना सकाळी जरा जपून बोलायला सांगितलं पाहिजे. परवा लग्नात ‘शिवाजी पार्क’वाले बंधू भेटले. त्यांना टाळी द्यावी का? बरोबर घेऊन महापालिका लढवावी का? नव्या वर्षात निर्णय घ्यावाच लागेल. पण तसे केल्यास स्वयंपाकघरात आदळआपट होईल. नव्या वर्षात काही शब्द वापरणे बंदच करणार आहे. उदा. - गद्दार, नमकहराम, चोर, मिंधे, टरबूज वगैरे, वगैरे.
वनवासातील माजी वनमंत्री
गेल्या वर्षात लोकसभेत (Loksabha) पराभवाचा अन् विधानसभेत विजयाचा निर्धार मी केला होता. तो खरा केला तर श्रेष्ठी नाराज झाले. त्यांनी वनमंत्रीच नव्हे मंत्रिपदही न देता मला वनवासात पाठवण्याचा निर्धार केलाय. कोडंच आहे. ही कटुस्मृती विसरून नव्या वर्षाला सामोरे गेले पाहिजे. वनमंत्रिपदाच्या काळात मी वनसंपदा प्रचंड प्रमाणात वाढवली (कुठे आहे ती...असं कोण विचारतंय?) तिथेच मी वनवासात जावं अशीच श्रेष्ठींची इच्छा दिसतेय. वनमंत्री असताना वाघापासून सर्व श्वापदे मला टरकायची. आता मात्र पाळीव प्राणीही मला घाबरत नाहीयेत. अखेर ज्येष्ठ मार्गदर्शक ‘रस्तेमार्तंड नेत्यां’च्या वाड्यावर गेलो. त्यांनी (सु)धीर धरण्याचा सल्ला दिला. मी देशभर एवढे रस्ते-पूल बांधूनही मलाही ‘त्यांनी’ त्यांच्या रस्त्यातून बाजूला केलं, तुझी काय कथा...असे ते वऱ्हाडी पाटवडी चापत असताना म्हणाले. त्यांनी मलाही आग्रह केला. आलुबोंडाही आहे. तो खा म्हणाले. पण सध्या तोंडाची चवच गेल्याने मी तो मोह टाळला. नवीन वर्षात माझे पुनर्वसन झाले तरच आलुबोंडा, वऱ्हाडी पाटवडी, सावजी मटण खाईन, हा माझा निर्धार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.