Sharad Pawar-Suresh Prabhu Sarkarnama
विशेष

Suresh Prabhu : केवळ एक भाषण ऐकून शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आधी सुरेश प्रभूंना राज्य सहकारी बॅंकेवर संधी दिली होती....

Sharad Pawar Political News : शरद पवार गादीवर बसले होते आणि अनेक लोक त्यांना कानात येऊन बोलत होते. पण, माझ्या लक्षात आलं की, शरद पवार हे त्यांना थांबवून माझं भाषण ऐकत होते. मी स्टेजवर पण नव्हतो. त्यामुळे माझं भाषण संपलं आणि मी निघून गेलो.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 23 February : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना राजकारणातील निस्पृह व्यक्ती म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात ओळखले जाते. कोणतीही पार्श्वभूमी नसताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना राजापूरमधून खासदार केले आणि पुढे केंद्रीय मंत्री म्हणून संधी दिली, हे सर्वश्रूत आहे. मात्र, त्या आधीही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुरेश प्रभू यांना त्यांचे केवळ एक भाषण ऐकून राजकारणात पहिल्यांदा संधी उपलब्ध करून दिली होती. त्याअगोदर ते शरद पवारांना कधीही भेटले नव्हते, ते रहस्य खुद्द प्रभू यांनीच दिल्लीत झालेल्या साहित्य संमलेनातून उलगडले आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu) म्हणाले, शंकरराव कोल्हे राज्याचे सहकार मंत्री होते. त्या वेळी मी सारस्वत बॅंकेचा चेअरमन होतो. वयाच्या ३१-३२ व्या वर्षी मी सारस्वत बॅंकेचा चेअरमन झालो होतो. वयाने जास्त असूनही मी आताही कमी वाटतो, त्यावेळी आणखीन कमी वाटायचो. त्या वेळी शरद पवार यांनी राज्यातील सर्व साखर काखान्यांचे अध्यक्ष, संचालक, कार्यकारी संचालकांचे एक संमेलन सा. रे. पाटील अध्यक्ष असलेल्या दत्तशिरोळ काखान्यावर घेतलं होते.

त्या संमेलनात मलाही बोलावण्यात आले होते. त्या संमेलनात शंकरराव कोल्हेंनी सांगितले की, ‘तूही बोल.’ मी म्हटलं साखर कारखान्याचा कार्यक्रम. माझा काय संबंध, असं म्हणून मी टाळण्याचा प्रयत्न केला. पण, कोल्हेंनी मला भाषण कर, असं फर्मानचं सोडलं. सहकार मंत्री सांगत आहेत, म्हटल्यावर त्यांना नाही कसं म्हणणार म्हणून मी भाषण केले, असेही प्रभू यांनी नमूद केले.

सुरेश प्रभू म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) गादीवर बसले होते आणि अनेक लोक त्यांना कानात येऊन बोलत होते. पण, माझ्या लक्षात आलं की, शरद पवार हे त्यांना थांबवून माझं भाषण ऐकत होते. मी स्टेजवर पण नव्हतो. त्यामुळे माझं भाषण संपलं आणि मी निघून गेलो. ते एकमेव भाषण ऐकून शरद पवार यांनी राज्य सहकारी बॅंकेवर त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझी नेमणूक केली होती, हा त्यांचा मोठेपणा आहे.

त्या वेळी राज्य सहकारी बॅंक म्हणजे प्रति सरकार असायचं. कल्लाप्पाअण्णा आवाडे, रत्नाप्पा कुंभार अशी दिग्गज मंडळी राज्य सहकारी बॅंकेच्या बोर्डावर असायची, त्यात मला शरद पवारांनी बसायची संधी दिली होती. त्याचवेळी पर्यटन विकास महामंडळावरही माझी नेमणूक केली होती, अशी आठवणही प्रभू यांनी सांगितली.

बाळासाहेब ठाकरे यांनी डंकेल करारावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझं व्याख्यान ठेवलं होतं. बाळासाहेबांनी भाषण केले आणि ते खाली जाऊन बसले. त्यामुळे माझ्यावर प्रेशर आलं. पण, मी भाषण केले. माझं भाषण झाल्यावर बाळासाहेब स्टेजवर आले आणि ‘विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकणार अन सुरेश प्रभू आपले अर्थमंत्री होणार,’ अशी घोषणा केली. सुदैवाने शिवसेनेची सत्ता आली; पण अर्थखातं भाजपकडे गेलं, त्यामुळे मी अर्थमंत्री होऊ शकलो नाही, असेही प्रभू यांनी सांगितले.

ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना बोलावून सुरेश प्रभू यांना मंत्री करा, असे सांगितले. त्यावर जोशी यांनी मंत्र्यांचा कोटा संपल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मला राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले. एका संपादकाने सुरेश प्रभू पुढचे खासदार, असा लेख लिहिला होता. त्यावेळी माझा राजकारणाशी संबंध नव्हता. पण, त्या अगोदर शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य सहकारी बॅंकेवर त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझी नेमणूक केली होती.

मी शरद पवार यांना कधीही भेटलो नव्हतो, पण त्यांनी माझं एकमेव भाषण ऐकलं होतं, त्यानंतर त्यांनी माझी राज्य सहकारी बॅंकेवर नेमणूक केली होती. कधीही न भेटता त्यांनी मला थेट राज्य सहकारी बॅंकेवर संधी दिली होती, तो शरद पवार यांचा मोठेपणा आहे. राज्यात ठिकठिकाणी माझा सत्कार करण्यात येत होता. त्या प्रत्येक ठिकाणी पुढचा खासदार सुरेश प्रभू असे सांगितले जात होते. कदाचित काँग्रेसमधून...कारण, शरद पवार यांनी माझी नेमणूक केली होती, म्हणून असू शकते, असेही प्रभू यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT