
Satara, 24 February : माणमधील काही लोकं इथं आहेत. त्यांना मी काय सांगतोय, त्यात काहीही नवल वाटल, असं मला वाटत नाही. ‘तुम्ही गेली 15 वर्षांपासून बघत आहात, मी काही बोलणार नाही. पहिला तास ते दीड तास पोलिस चौकीला फोन करण्यातच जातो. बारा-साडेबारा वाजले की निघून जातात. ही भानगड, ती भानगड, या भानगडीमध्येच दिवस जात असेल... आणि हे कोण करतंय, हे मी नाव घेऊन माझी जीभ कशाला विटाळू, असा सवाल करत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर पडलेल्या छाप्यावरून रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, तुम्ही म्हणताय रेड पडली, रेड पडली. मी म्हणतोय अजून टाका. खरं तर माझ्यावरच रेड टाकली असती, तर माझा स्टेट्स वाढला असता. आहे काय आपल्याकडे, कर्जाशिवाय दुसरं काही सापडणंच शक्य नाही.
त्यांनी टाकायला लावली की नाही मला माहिती नाही. पण, लोकं म्हणतात. लोकशाहीत सत्य काहीही का असेना. पण, तुम्हाला वाटतंय ना संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांच्यावर कोणीतरी रेड टाकायला लावली. बास झालं तेवढं. तेच सत्य असतं. आपण कितीही सांगायचा प्रयत्न केला. पण, लोकांचा एकदा समज झाला की... आपल्या तालुक्यात आतापर्यंत कोणावरच रेड झाली नव्हती. पण, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरच रेड झाली. तिथंही आम्हीच प्रथम आहोत, म्हणावं, असा टोला रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना लगावला.
रामराजे म्हणाले, आता आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. बरेच दिवस मी बोललो नाही. कारण मी जरा थांबलो आहे. राजकारणात कुठं थांबावं, हे कळलं पाहिजे. राजकाणात वेळ, काळ महत्वाची असते. तुम्हाला जी काळजी लागली आहे, काय होणार कसं होणार, मग आपण प्रवेश करायचा का. आपण इकडं जायचं की तिकडं जायचं. तुम्ही माझ्यासाठी तीस वर्षे जे केले, तेच करा. बाकीचं मी बघेन. पण सर्वांनी एकत्र राहावे. ज्यांना पळून जायचं आहे, त्यांनी इथूनच जावं. आम्ही शून्यातून सुरुवात केली आहे.
रामराजे नाईक निंबाळकर आणि माणचे आमदार तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील संबंध सर्व सातारा जिल्ह्याला माहीत आहेत. ते एकेमकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नाहीत. दोघांचे विळ्या भोपळ्याचे नाते आहे. मध्यंतरी जयकुमार गोरे यांनी जे मला संपवायला निघाले होते, ते स्वतःच संपले असे विधान केले होते. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत असतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.