Mahavikas Aghadi Vs Mahayuti  Sarkarnama
विशेष

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत कोणाची विकेट पडणार? राजकीय विश्लेषकांचे नेमके म्हणणे काय

Political News : विधान परिषद निवडणुकीनंतर दोन वर्षांपूर्वी झालेल्या फोडाफोडीनंतर राज्यात सत्ता बदलेली होती. त्यावेळेसपासून राजकारणाने कुसच बदलली होती. मात्र, दोन वर्षात आता बरेच पुलाखालून पाणी गेले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : आमदारातून निवडून द्यावयाच्या विधान परिषद निवडणुकीनंतर दोन वर्षांपूर्वी झालेल्या फोडाफोडीनंतर राज्यात सत्ता बदलेली होती. हा सत्ता बदल त्यावेळी भाजपच्या बाजूचा होता. त्यावेळेसपासून राजकारणाने कुसच बदलली होती. मात्र, दोन वर्षात आता बरेच पुलाखालून पाणी गेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले.

48 पैकी 30 जागा मिळवत महायुतीचा पराभव केला तर पदवीधरच्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने दोन जागा मिळवत बरोबरी साधत यश मिळाले. त्यामुळे या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीन जागा निवडून येतील, असे चित्र असल्याचे राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला एका जागेवर पराभव स्वीकारावा लागू शकतो.

या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष सोडला तर सर्वच पक्षाला कोटा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. केवळ काँग्रेसकडे 37 मते आहेत. त्यांच्या एक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे कसलीच अडचण नसणार आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाची एक जागा निवडून येण्यासाठी 23 मते लागणार आहेत. त्यांच्याकडे 15 मते असल्याने आठ मतांची गरज असणार आहे. तर शेकापच्या जयंत पाटील यांना 23 मते गरजेचे आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 तर शेकाप 1, माकप 2, अपक्ष एक असे 16 मते आहेत. त्यांना अजून 7 मतांची आवशकता असणार आहे.

ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांचे सर्व पक्षात चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते उर्वरित सात ते आठ मते घेऊ शकतील असे चित्र आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांचा राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव पाहता ते पण उर्वरित मते खेचून आणतील. त्याशिवाय काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्याकडे कोट्यापेक्षा जास्त मते आहेत. त्यामुळे त्यांना कसलाच धोका नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तीन जागा सहज विजयी होतील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

दुसरीकडे महायुतीमधील तीन घटक पक्षांसोबत असलेल्या अपक्ष व छोट्या मित्र पक्षाना सांभाळून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महायुतीमधील तीन पक्षांना साधारण 12 मतांची जोडणी करावी लागणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या (Bjp) पाच उमेदवारापैकी चार उमेदवार सहज निवडून येतील पाचव्या जागेसाठी दुसऱ्या पक्षाची साधारणता सात ते आठ मते फोडून विजय मिळवावा लागणार आहे.

दुसरीकडे महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Ncp) दोन उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे दोघे निवडणूक लढणार आहेत. त्यांच्याकडे 39 मते आहेत त्यांना अजून सात मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांचा कस लागणार आहे. जरी त्यांच्याकडे 39 मते असली तरी त्यांना ही मते प्रत्यक्षात पडणार का यावर बरीच गणित अवलंबून असणार आहे. त्यांची मते शरद पवार गटाकडे झुकणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या दोन जागा निवडून येण्यासाठी 46 मतांची आवश्यकता आहे. मात्र, त्यांच्याकडे 40 स्वतःची तर 10 अपक्षांची मते असल्याचा दावा आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा असलेल्या अपक्षांची मते मिळाली तर इतर मतांची आवश्यकता भासणार नाही. या निवडणुकीसाठी गोपनीय पद्धतीने मतदान होणार असल्याने घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याचे देसाई यांनी व्यक्त केली.

त्यासोबतच माकपची दोन मते महाविकास आघाडीसोबत जातील तर एमआयएमची दोन मते ही तटस्थ राहतील अथवा महाविकास आघडीला हे मतदान करतील. तर बहुजन वंचित आघाडीची तीन मते हे भाजपसोबत जातील, असे देसाई यांनी सांगितले.

या विधानपरिषद निवडणुकीत जर महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या तर हा विजय त्यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणुका डोळयांसमोर ठेवता बुस्ट मिळणार आहे. या निवडणुकीत महायुतीला पराभव स्वीकारावा लागला तर आगामी विधानसभा निवडणुका पाहता त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असू शकेल. गुप्त मतदान असल्याने काही मते फुटू शकतात तर काही मते जाणीवपूर्वक बाद केली जाऊ शकतात. याचा फटका कोणाला बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT