Mumbai News: राज्यात महायुती लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरत असताना विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील लढत बरोबरीत सुटली. त्यामुळे महायुती या पराभवाच्या छायेतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असताना आता 12 जुलैला होत असलेल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे निवडणूक होणार असून यामध्ये जर महायुतीला पराभव स्वीकारावा लागला तर आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीची वाट बिकट होण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीत मोठा गाजावाजा करीत देशात चारशे पार तर राज्यात मिशन 45 हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागेवर विजय मिळवता आला. दुसरीकडे विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील चार जागेच्या लढतीत महाविकास आघाडीला (MVA) दोन तर महायुतीला दोन जागा मिळाल्या. त्यामुळे ही लढत दोन-दोन अशी बरोबरीत सुटली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीला जोरात तयारी करावी लागणार आहे. (Vidhan Parishad Election News)
विधान परिषदेच्या निवडणूक सुरुवातीला बिनविरोध होईल, अशी शक्यता असताना 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने मतदान होणार आहे. 12 जुलैला विधिमंडळात मतदान होणार असून यासाठी महायुतीने 9 तर महाविकास आघाडीने 3 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीसाठी मतदान गुप्त स्वरुपाचे असल्याने मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराची शक्यता नाकारता येत नाही. क्रॉस व्होटिंगची शक्यतादेखील आहे. त्यामुळे कोणाची मते फुटणार याकडे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीतील पराभवामुळे मतदारांत चुकीचा 'मेसेज' जाऊ नये याची दक्षता सत्ताधारी व विरोधक घेत आहेत. या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यास येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत बॅकफूटवर जावे लागणार आहे.
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जयंत पाटील यांना पाठिंबा दिला नाही. त्यांनी आपले स्वीय सहायक नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. नार्वेकरांचे सर्वच पक्षांमधील नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. ते अनेकदा दिसून आले आहेत. त्यामुळे नार्वेकर मतांची जुळवाजुळव करु शकतात. जयंत पाटील यांचेही सर्वपक्षीय संबंध चांगले आहेत. त्यामुळे तेदेखील अनेक आमदारांशी संपर्क करत आहेत.
महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धोका
या निवडणुकीत महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धोका अधिक आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत अजित पवार गट बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याची गरज आहे.
त्यासोबतच प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराविरोधात त्यांच्या पक्षाकडून उमेदवार दिला होता. कडू यांच्या प्रहार पक्षाचे विधानसभेत दोन आमदार आहेत. त्यामुळे सर्वांचे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. त्यासोबतच बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पालघरमधून भाजपविरोधात उमेदवार दिला होता. त्यांचे भाजपसोबतचे संबंध ताणले गेले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही सहा मते येत्या काळात निर्णायकी ठरण्याची शक्यता आहे. ही सहा मते जर महायुतीपासून दूर गेले तर त्याचा याचा महायुतीला फटका बसू शकतो.
या विधानपरिषदेच्या निवडणुकीत प्रमुख पाच पक्षांच्या उमेदवाराना दुसऱ्या पक्षाची मते फोडून विजय मिळवावा लागणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्ष सोडला तर सर्वच पक्षाला कोटा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. केवळ काँग्रेसकडे ३७ मते आहेत. त्यांच्या एक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे कसलीच अडचण नसणार आहे.
हे उमेदवार निवडणूक रिंगणात
या निवडणूक रिंगणात भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन तर काँग्रेस एक, शेकाप एक व शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार रिंगणात आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना उमेदवारी दिली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर, काँग्रेसने प्रज्ञा सातव तर शेकापचे जयंत पाटील नशीब अजमावत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.