Chandrakant Patil-Ranjitshinh Naik Nimbalkar-Narayan Patil Sarkarnama
विशेष

Karmala Politics : नारायण पाटलांना भेटायला जाताना चंद्रकांतदादांनी निंबाळकरांना सोबत नेणे टाळले!

Lok Sabha Election 2024 : निंबाळकर यांनी माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थन मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. मात्र, नारायण पाटील हे खासदारांवर नाराज असल्यामुळे त्यांच्याकडून भेटीबाबत कोणताही ग्रीन सिग्नल मिळत नसल्याची माहिती आहे, त्यामुळे निंबाळकरांसमोरील अडचण वाढताना दिसत आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 11 April : माढा लोकसभा मतदारसंघात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे मोहिते पाटील हे भाजप सोडण्याच्या मनःस्थितीत असताना भाजप नेत्यांवरील शेतकऱ्यांचा रोष आता सभा-बैठकांमधून सामोरे येताना दिसत आहे. तसेच, महायुतीमधील काही नेत्यांकडे गेली पाच वर्षे झालेले दुर्लक्षही विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळक यांच्या अंगलट येताना दिसत आहे. त्यातून करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना भेटायला जाताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निंबाळकर यांना सोबत नेले नाही. त्यामुळे निंबाळकर यांना गेटवरच गाडीतच बसून राहावे लागले.

माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यानंतर निंबाळकर हे पायाला भिंगरी बांधून मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. दुसरीकडे निंबाळकर यांना तिकिट दिल्याने याच मतदारसंघातील दुसरे इच्छूक नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. मोहिते पाटील यांची बंडखोरी निंबाळकर आणि भाजपची मोठी डोकेदुखी ठरत आहे. भाजपच्या हायकमांडकडून मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात भाजपला यश आलेले दिसत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहिते पाटील यांच्या बंडखोरीचा प्रश्न असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही भाजप नेत्यांना जाब विचारला जात आहे. त्यातून शेतकरी आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष पहायला मिळत आहे. त्याचा प्रत्यय माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे बुधवारी आला. शेतीप्रश्नावरून भाजप नेत्यांना जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांकडून सभेबाहेर काढण्यात आले. मोहिते पाटील यांच्या माध्यमातून होणारी वजाबाकी दुसरीकडे भरून काढण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे.

सोलापूचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवारी माढा मतदारसंघात होते. ते करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना भेटायला गेले होते. त्यांच्यासोबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरही होते. मात्र, पाटील यांना भेटायला जाताना चंद्रकांतदादांनी (Chandrakant Patil) निंबाळकर यांना सोबत नेणे टाळले. चंद्रकांत पाटील हे आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांना घेऊन नारायण पाटील (Narayan Patil) यांना भेटले. मात्र, शेवटपर्यंत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपल्या गाडीत बसून राहावे लागले. निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीबाबत नारायण पाटील यांनी चंद्रकांतदादांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

दरम्यान, निंबाळकर यांनी माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थन मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. मात्र, नारायण पाटील हे खासदारांवर नाराज असल्यामुळे त्यांच्याकडून भेटीबाबत कोणताही ग्रीन सिग्नल मिळत नसल्याची माहिती आहे, त्यामुळे निंबाळकरांसमोरील अडचण वाढताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT