Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Ajit Pawar Warning : अजितदादांनी दम भरल्यानंतर तरी अधिकारी सुतासारखे सरळ होणार का ?

Officers Discipline Maharashtra News : पुण्यातील विकासकामांमध्ये निष्काळजीपणा केली जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधीनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरबैठकीतच अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले

सरकारनामा ब्युरो

Pune News : नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर पुणे जिल्हा महायुतीचा गड राहिला आहे. त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षाचे नेहमीच पुण्याकडे लक्ष असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्यावर नेहमीच वर्चस्व राहिले आहे. मंत्री असताना अजितदादा नेहमीच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत. त्यांची ओळख अत्यंत प्रभावी आणि थेट बोलणारे नेते अशीच राहिली आहे.

पुण्यातील विकासकामांमध्ये निष्काळजीपणा केली जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधीनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरबैठकीतच अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. जर कोणी शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडत नसेल, तर त्यांना पुण्याबाहेर जावे लागेल, असा सज्जड दमच अजितदादांनी भरला आहे.

पुणे जिल्हा हा शहरीकरण, औद्योगिकरण आणि शिक्षणाचा केंद्रबिंदू असल्याने, येथील विकासकाम प्राधान्याने आणि जलद गतीने व्हावे, ही लोकांचीही मोठी अपेक्षा असते. त्यामुळे, स्थानिक नेते व अधिकारी वर्गावर विकास कामांची मोठी जबाबदारी असते. मात्र, गेल्या काही दिवसापासून विकास कामाकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शहर व जिल्हयातील विकास कामे रखडली आहेत.

शुक्रवारी पुण्यातील विधानभवनात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर या अधिकारी वर्ग कामच करीत नसल्याच्या तक्रारीचा पाढा लोकप्रतिनिधींनी या बैठकीत वाचला. त्यानंतर या बैठकीतच अजितदादांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. या पुढे कोणत्याही लोकप्रतिधींनी काम करण्यास दिरंगाई केली जात असल्याची तक्रार केली तर त्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

पुण्यातील पर्वती मतदारसंघातील पुलाखालील अतिक्रमण काढण्यास अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, हे अतिक्रमण न काढता त्याच्याकडे दुर्लक्ष केले असल्याची तक्रार या बैठकीवेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी केली. त्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे वेळेत पूर्ण करा, असा इशारा दिला.

पुण्यात बदली हवी म्हणून अनेक अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्याकडे येत असतात. तर काही जणांना पुण्यातच थांबायचे असते. अनेक अधिकारी दहा वर्षापेक्षा अधिक काळ पुण्यातच काढतात. त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही. त्याउलट तुम्ही सेवानिवृत्त होईपर्यंत येतेच थांबा. मात्र, काम करून चांगला रिजल्ट तरी द्या, येत्या काळात तुम्ही जर विकास कामे करणार नसाल तर पुण्याबाहेर जावे लागेल, असा इशारादेखील अजितदादांनी दिला.

यापूर्वी कधीच अधिकारी वर्गाला आम्ही बेकायदा कामे सांगितलेली नाहीत. यापुढील काळात देखील बेकायदा कामे सांगणार नाही. रीतसर कामे आहेत तेच सांगितले जातील. लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे जर पूर्ण करण्यात आली नाहीत तर पुढच्या बैठकीला उभे ठेवण्यात येईल, असा सज्जड दमच अजितदादांनी बैठकीवेळी भरला.

त्यासोबतच या बैठकीवेळी पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले हे काम करीत नसल्याबद्दल काही आमदारांनी बैठकीवेळी तक्रार केली होती. त्यावेळी अजितदादांनी राजेंद्र भोसले हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यापूर्वी वेगळा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

पुणे शहर व जिल्ह्यातील विकासकाम प्राधान्याने आणि जलद गतीने व्हावे, अशी नागरिकांची मोठी अपेक्षा असते. त्यामुळे, स्थानिक नेत्यांवर विकासकामांची प्रचंड जबाबदारी असते. त्यामुळेच लोकप्रतिनिधीकडून नेहमीच कामांचा पाठपुरावा केला जातो. त्यामुळे ही विकासकामे प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असते. त्याकडे जर थोडेही दुर्लक्ष झाले तर जनता नाराज होईल आणि याचा परिणाम थेट निवडणुकीवर होईल, अशी भीती नेत्यांना असते.

त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरबैठकीतच अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यानंतर आता अधिकारी वर्गाकडून कशा प्रकारे प्रतिसाद दिला जातो याकडे लक्ष लागले आहे. अजितदादांची ओळख शिस्त लावणारे नेते अशीच आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर तरी काम न करणारे अधिकारी येत्या काळात सुतासारखे सरळ होणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT