
Maharashtra Politics : महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यावरुन ढवळून निघालं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत बोलताना आमच्यातील वाद, भांडण छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. असे म्हणत राज ठाकरेंनी युतीसाठी उद्धव ठाकरेंना प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर राज्यभर नव्या युतीची चर्चा सुरू झाली.
या सगळ्या घडामोडी सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक्स'वर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. 'वेळ आलीयं, एकत्र येण्याची' मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी ! अशा आशयाची पोस्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत एक्स अकाउंट वरुन करण्यात आली आहे. राज-उद्धव मनोमिलनाच्या चर्चा सुरु असनाच उबाठा गटाकडून करण्यात आलेली ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.
दरम्यान दोघेही ठाकरे बंधू विदेशात आहेत. उद्धव ठाकरे व कुटुंबीय युरोप दौऱ्यावरती आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे हे देखील विदेश दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर राज ठाकरे २९ एप्रिलला परतणार आहेत. त्यामुळे दोघे बंधू परतल्यानंतर युती संदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, आमच्यातले वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे एकत्र येणं, राहणं कठीण नाही, असं मोठं विधान मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलं होतं.
राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे असे सांगत उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या टाळीला टाळी दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रात हे दोघे ठाकरे भाऊ एकत्र येतील का या विषयावरुन अनेक राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी या युतीचे स्वागत केले, तर विरोधकांनी यावर टीकाही केली. उबाठाने केलेल्या एक्स पोस्टमुळे पुन्हा या चर्चांना जोर आला आहे.
दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून या पोस्टच्या संदर्भात खुलासा करण्यात आल्याचे पुढे आले आहे. अशा प्रकारच्या पोस्ट दररोज सकाळी केल्या जातात आणि त्यातून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा, हा हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे. तर अनेकांनी या पोस्टचा संदर्भ मनसे आणि शिवसेना यांच्या मनोमिलनाशी जोडल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.