Congress Meeting Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Congress : लोणावळा : काँग्रेसचे चिंतन, चिंता आणि चिक्की

Lonavala Congress Chintan Shibir : शिबिर महत्त्वाचे, तितकेच भयग्रस्तही

Sachin Deshpande

Maharashtra Congress : देश स्वतंत्र होण्याआधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईत 1885 मध्ये झाली. त्यानंतरचा स्वातंत्र्य लढा झाला. या लढ्यात काँग्रेसने अनेक कालानुरुप बदल पाहिले. महाराष्ट्रातून जहाल मतवादी लोकमान्य टिळक, सुधारणावादी गोपाळ गणेश आगरकर त्याच बरोबर मवाळ गटाचे महात्मा गांधी, पंडीत नेहरु यांचा वारसा असलेली अशी काँग्रेसची ओळख आहे.

स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पदावर पंडीत नेहरु, गुलजारीलाल नंदा, लालबहादूर शास्त्री, त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंह यांची सत्ता देशाने अनुभवली आहे. महाराष्ट्र नेहमीच काँग्रेससाठी भक्कम साथ देणारे राज्य राहिले. महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांना देश पातळीवर नेतृत्वाची संधी काँग्रेसने दिली. इतकेच नाही तर अनेक मराठी नेते हे ‘किचन कॅबिनेट’मध्ये वरिष्ठ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते, आज ही बसतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक चव्हाण हे भाजपामध्ये गेल्यानंतर निश्चितच त्यांच्या इतिहासावर चर्चा होणार. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांना देखील काँग्रेसने सर्वकाही दिले. दोनदा मुख्यमंत्रिपद, एकदा उपमुख्यमंत्रिपद, देशाचे संरक्षणमंत्री अशीच काय ती ओळख शंकरराव चव्हाण यांची आहे. तशीच काय ती ओळख अशोक चव्हाण यांची आहे. चारदा आमदार, दोनदा खासदार, दोनदा मुख्यमंत्री, एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विविध खात्यांचे मंत्री असा मोठा इतिहास अशोक चव्हाण यांचा आहे. महाराष्ट्रात शंकरराव चव्हाण हे निष्ठावान काँग्रेस नेते म्हणून त्यांचा नावालौकीक होता. शंकरराव चव्हाण यांच्या मुलाला अर्थात अशोक चव्हाण यांना काँग्रेसने देखील बरेच काही दिले. अशा परिस्थितीत अशोक चव्हाण हे काँग्रेस सोबत एकनिष्ठ का राहिले नाहीत. हा खरा तर महत्वाचा चिंतनाचा विषय काँग्रेससाठी आहे.

कोणी कोणासोबत एकनिष्ठ रहावे, हा जरी वैयक्तिक मुद्दा असला, तरी देखील काँग्रेसने शंकरराव चव्हाण असो की अशोक चव्हाण, या दोघाही पिता पुत्रांना राज्यातील सर्वोच्च पदे दिली. संघटनेत पदे दिले. तरीदेखील अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसभा उमेदवारी मिळताच दुधात साखर गोड झाली. पण, हे करताना काँग्रेसचे दूध नासले, महाविकास आघाडीचे दूध फाटण्याची प्रक्रिया सुरू केली गेली. काँग्रेसकडे देशातील सत्ता नसताना जेव्हा खरोखरच काँग्रेसला निष्ठावंताची गरज आहे, त्यावेळी काँग्रेस निष्ठावंतांनी काँग्रेसला पाठ का दाखविली? याचे चिंतन काँग्रेसला करावे लागेल. हे चिंतन करताना ज्यांना काँग्रेसने भरभरून दिले, त्यांनीच काँग्रेसला अडचणीच्या काळात का सोडले? त्यांचेही चिंतन काँग्रेसला करावे लागेल.

काँग्रेसने नेत्यांना भरभरुन दिले म्हणून तर तपास यंत्रणा त्यांच्या पाठिमागे लागल्या नाही ना? असा ही प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो. नेत्यांना भरभरुन देणे, ही काँग्रेसची चूक होती का? याचे चिंतन काँग्रेसला करावे लागेल. नेत्यांना जितके आवश्यक आहे, तितकेच काँग्रेसने दिले असते तर काँग्रेस नेत्यांच्या पाठीमागे तपास यंत्रणा लागल्या नसत्या. अशा वेळी काँग्रेसने दिलेली मोकळीक आता काँग्रेससाठी अडचणीची ठरत असावी. त्यावरदेखील चिंतन होण्याची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस सोडून जाणाऱ्यांना थांबविणे, हे जरी भविष्यात काँग्रेसचे उद्दिष्ट नसले, तरी यापुढे एकाच परिवारातील सदस्यांना काँग्रेस भरभरुन मात्र देणार नाही. कारण, अशोक चव्हाण यांचा अनुभव काँग्रेसच्या पाठिशी असेल. ज्या नेत्यांना काँग्रेसने काही दिले नाही, अशांनी काँग्रेस सोडली तर इतके प्रश्न कदाचित विचारले जाणार नाहीत. ज्यांना काँग्रेसने सर्वकाही दिले त्यांनी काँग्रेसच्या उपकाराची जाण ठेवली नाही. अशोक चव्हाण यांनी ‘सहकारातील आदर्श’ राजकीय संकट पाहता काँग्रेसला सोडले हा चिंतनचा विषय नक्कीच आहे.

लोणावळा चिंतन शिबिरात माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य होते. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची चर्चा सुरू होती. लोकसभा जागा, लोकसभा उमेदवार निश्चिती, लोकसभा निवडणूक रणनिती रचल्या जात होती. महाविकास आघाडीच्या अनेक बैठकींमध्ये अशोक चव्हाण हे उपस्थित होते. त्यांना लोकसभेच्या 2024 मधील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची संपूर्ण तयारी, व्यूहरचना माहिती आहे. त्यांनी अचानक काँग्रेसला सोडून जाणे हे काँग्रेससाठी जितके धक्कादायक आहे, तितकेच ते महाविकास आघाडीचे घटक असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनादेखील धक्कादायक आहे.

‘महाविकास’च्या बैठकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांना कोणता मतदार संघ सुटणार, त्यावर संभाव्य उमेदवार कोण असतील याची सर्व माहिती अशोक चव्हाण यांना आहेच. आतापर्यंत ‘महाविकास’ने आखलेल्या सर्व राजकीय डावपेचांवर अशोक चव्हाण यांनी पाणी फेरल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा एकदा चिंतन, फेरआढावा काँग्रेसला बरोबर महाविकास आघाडीलादेखील करावा लागेल, कारण आता भाजपाला लोकसभा मतदार संघनिहाय कोणता उमेदवार रिंगणात येऊ शकतो, याची पुरती जाणीव झाली असेल. या चिंतेच्या विषयावर देखील काँग्रेसला लोणावळ्यात चिंतन करावे लागेल. इतक्यावर हा विषय थांबणार नाही, तर तसे फेरबदल करावे लागतील.

चिक्की, ही सत्तेतील गोड पदार्थासारखी असते. ती नेहमी खावीशी वाटते, तशी ती हवीहवीशी वाटते. त्यामुळे चिक्कीतील गोडवा जसा प्रत्येकाला गरजेचा वाटतो. त्याच प्रमाणे महाविकास आघाडीतील घटकांना सत्तेसाठी एकमेकांसोबत राहावे लागेल. लोणावळ्यात चिक्की प्रसिद्ध आहे. काँग्रेसचे लोणावळा दोन दिवसीय चिंतन शिबिरात चिक्कीप्रमाणे काँग्रेसला चिटकून बसलेल्या नेत्यांना त्यागाचा पण धडा शिकवावा लागेल. इतकेच नाही तर काँग्रेसच्या चिक्कीचा मोह सोडून भाजपकडे जाणारे नेते यांच्यावर ‘वॉच’ ठेवावा लागेल. काँग्रेसचे लोणावळा चिंतन शिबिर झाल्यावर काहींनी भाजपाची वाट धरली तर काँग्रेसच्या चिंतन शिबिरातील प्रत्येक गोष्ट भाजपाकडे जाईल. आता मात्र लोणावळ्यातील या शिबिरात काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर संशयाच्या नजरेतून पाहिल्या जाण्याची भिती आहे.

काँग्रेसच्या या चिंतन शिबिराला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे संबोधित करणार आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले, विरोधी पक्षनेता विजय वड्डेटीवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, संध्या सव्वालाखे, अॅड. यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे यांची उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. असे असताना अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणाऱ्या आठ ते दहा काँग्रेस नेत्यांपैकी किती नेते हे या चिंतन शिबिरात काँग्रेसचे म्हणून जातील आणि भाजपाचे म्हणून परत येतील. याची काँग्रेसला खातरजमा करावी लागेल. त्यामुळे काँग्रेसच्या चिंतन शिबिरात जो कुंपणावर बसलेला नेता आहे, त्याच्याकडे संशयाच्या नजरेतून पाहिले जाईल हे मात्र नक्की. काँग्रेसच्या लोणावळा शिबिरात चिंतन, चिंता आणि चिक्की यावर नक्की चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT