Asaduddin Owaisi, Amit Shah Sarkarnama
विश्लेषण

Asaduddin Owaisi News: 'हा' भाजपची 'बी टीम'चा शिक्का पुसण्याचा ओवैसींचा प्रयत्न तर नाही ना ?

अय्यूब कादरी

AIMM News : खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयम पक्षाचे उमेदवार केवळ मतांची विभागणी करण्यासाठीच उभे असतात, त्यामुळे भाजपला मदत होते, अशी चर्चा सातत्याने केली जाते. बहुतांश ठिकाणची परिस्थिती त्यावर विश्वास ठेवावा अशी आहे. ईडीने शोधून शोधून विरोधकांवर कारवाई केली. मात्र, एमआयएमच्या एकावरही ईडीने (ED) कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे एमआयएम हा पक्ष भाजपची बी टीम आहे, या काँग्रेससह अन्य पक्षांकडून केल्या जाणाऱ्या प्रचाराला बळ मिळत गेले.

एमआयएमचे राजकारण हे धार्मिक ध्रुवीकरणावर अवलंबून आहे. विशेषतः. मुस्लिम समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा अजेंडा या पक्षाकडून राबवण्यात येतो. काँग्रेसने मुस्लिमांवर कसा अन्याय केला, याची सतत उजळणी केली जाते आणि मुस्लिम मते एमआयएमच्या पारड्यात पडतात. काँग्रेसने (Congress) मुस्लिमांवर अन्याय केला की नाही, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.

मात्र गंमत अशी की, भाजपसारखे पक्ष काँग्रेसने मुस्लिमांचे लांगूलचालन केले, असे म्हणत ध्रुवीकरण करत असतात आणि एमआयएमसारखे पक्ष काँग्रेसने मुस्लिमांवर अन्याय केला, असे म्हणत ध्रुवीकरण करत असतात. हळूहळू का होईना हा प्रकार मुस्लिम समाजाच्या लक्षात येऊ लागला. त्यामुळे एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, असा समज मुस्लिम समाजात घट्ट होत गेला. त्याचा फटका एमआयएमला बसू लागला.

आता एमआयएमने (AIMM) सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यघटना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला असून, राज्यघटना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. ढोबळमानाने हे समर्थन काँग्रेस पक्षाला असू शकते, असा अंदाज आहे. एमआयएमची ही भूमिका प्रामाणिक आहे की त्यांना आपल्यावरील बी टीमचा शिक्का पुसायचा आहे, याचा चिकित्सा केली जाऊ शकते. त्याला कारणही तसे सबळ आहे.

2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारांनी सोलापूर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्यासमोर मतविभागणीचे कडवे आव्हान उभे केले होते. मात्र, दोन्ही वेळी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी राजकीय कौशल्याचा वापर करून विजय मिळवला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2009 च्या निवडणुकीत एमआयएमने तौफिक शेख यांना उमेदवारी दिली होती. त्यांना 37,138 मते मिळाली होती. प्रणिती शिंदे यांना 46,907 मते मिळाली होती. शिवसेनेचे महेश कोठे यांना 33,334 आणि भाजपच्या मोहिनी पत्की यांना 23,319 मते मिळाली होती. भाजप-शिवसेनेत मतांची विभागणी झाली तशी ती काँग्रेस आणि एमआयएममध्येही झाली होती. काटाकाटीच्या या राजकारणात प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला होता. 2019 ला तर प्रणिती शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवला होता.

या निवडणुकीत एमआयएमचे फारूक शाब्दी यांना 38,721, अपक्ष महेश कोठे यांना 30,081, शिवसेनेचे दिलीप माने यांना 29,247 मते मिळाली होती. प्रणिती शिंदे या 51,440 मते मिळवून विजयी झाल्या होत्या. या दोन्ही निवडणुकांत एमआयएमला ना विजय मिळाला होता ना, त्यांच्या उमेदवारामुळे काँग्रेसचा (Congress) पराभव झाला होता. सोलापूर याला अपवाद ठरले होते. मग आता लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याचा एमआयएमचा निर्णय राज्यघटना वाचवण्यासाठी आहे की आपल्यावरील बी टीमचा शिक्का पुसण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या काही वर्षांत झालेल्या पश्चिम बंगाल, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एमआयमची डाळ शिजली नाही. पश्चिम बंगालमध्ये एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. एमआयएम पक्ष भाजपची बी टीम आहे, असा समज ओवैसी यांचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या हैदराबाद शहरातील मुस्लिम समाजातही पसरलेला आहे. मात्र, आमच्यासमोर पर्याय नाही, असे मत तेथील मुस्लिम नागरिक व्यक्त करतात. तिकडे, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातही यंदा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्यासाठी अडचण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

त्यामुळे एमआयएमने अकोल्याच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या निवणुकीत वंचित आणि एमआयएम एकत्र नाहीत. त्यामुळे वंचितच्या छत्रपती संभाजीनगरमधील मतदारांवर डोळा ठेवून एमआयएमने आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे. एमआयएममुळे काय होत आहे, याचा अंदाज आल्यामुळे एमआयएम बॅकफूटवर जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ केला जाऊ लागला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT