Chhagan Bhujbal devendra fadnavis  sarkarnama
विश्लेषण

OBC DNA : ‘ओबीसी डीएनए’ म्हणणाऱ्याकडूनच दगाफटका : भुजबळांनी आता थेट फडणवीसांशीच पंगा घेतलाय !

Bhujbal statement News : या मेळाव्याच्या निमित्ताने 'ओबीसी डीएनए’ म्हणणाऱ्याकडूनच दगाफटका होण्याची शक्यता व्यक्त करीत त्यांनी भाजप नेत्यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

Beed News : बीड येथील ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून नेतेमंडळींने रणशिंग फुंकले आहे. ओबीसी समाजाची वजमुठ आवळत त्यांनी आरक्षणात ढवळाढवळ करणाऱ्यांना फटकारले आहे. या मेळाव्यातून त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना शिंगावर घेत जहरी टीका केली तर दुसरीकडे या निमित्ताने सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतही पंगा घेतला आहे. भाजपचा डीएनए ओबीसी असे सांगणाऱ्यांनी हा ‘जीआर’ काढला आणि ओबीसींशी दगाफटका केला, असा आरोपही त्यांनी फडणवीस यांचे नाव न घेता केला. त्यामुळे या मेळाव्याच्या निमित्ताने 'ओबीसी डीएनए’ म्हणणाऱ्याकडूनच दगाफटका होण्याची शक्यता व्यक्त करीत त्यांनी भाजप नेत्यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

ओबीसी मेळाव्यातून व्यासपिठावर उपस्थित असलेल्या नेत्यांनी कडक शब्दांत राज्य सरकारला इशारा दिला आहे. विशेषतः या वेळी उपस्थित असलेल्या लक्ष्मण हाके, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ यांनी या मेळाव्यातून त्यांनी २ सप्टेंबरचा राज्य सरकारचा कुणबीबाबतचा जीआर रद्द करण्याची मागणी उचलून धरली आहे. यामधील पडळकर, मुंडे व भुजबळ हे सत्ताधारी महायुतीमधील नेते आहेत. त्यामुळेच या सत्तेत असलेल्या मंडळीनेच राज्य सरकारला अडचणीत आणले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

राज्य सरकारने कुणबीबाबतचा जीआर 2 सप्टेंबरला काढल्यापासून ओबीसी समाजात असंतोष पसरला आहे. त्यासाठीच गेल्या काही दिवसापासून ओबीसी समाज बांधव रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या महिना-दीड महिन्याच्या काळात ओबीसी समाजात या आरक्षणावरून नाराजी पसरली आहे. ओबीसीचे आरक्षण संपल्याने राज्यात 15 जणांनी आत्महत्या केल्या असल्याचे सांगत भुजबळ यांनी भावना स्पष्ट केली आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. त्यांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, आता ते ओबीसीतून आरक्षण मागत आहेत. आमच्या हक्काचे आरक्षण मागितले जात असल्याने आम्ही त्याला विरोध केला असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट करीत आमच्या ताटातले आरक्षण देणार नसल्याचे स्पष्ट केले.

आरक्षण म्हणजे गरिबी हटाव मोहीम नव्हे. आरक्षण हे समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी असते. मात्र एक व्यक्ती आणि समाजातील काही चोरांना सोबत घेऊन शासनावर दबाव टाकत मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील ‘जीआर’ काढण्यात आला. ‘जीआर’ वर आरक्षण मिळत नसते. त्यामुळे शासनाने काढलेला ‘जीआर’ तत्काळ रद्द करून ओबीसींवर होणारा अन्याय, अत्याचार बंद करावा, असे सांगत भुजबळ यांनी राज्य सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली.

विशेष म्हणजे भाजपचा डीएनए ओबीसी असे सांगणाऱ्यांनी हा ‘जीआर’ काढला आणि ओबीसींशी दगाफटका केला, असा आरोपही त्यांनी सीएम फडणवीस यांचे नाव न घेता केला. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, सरकारने त्यांना त्यांचे वेगळे आरक्षण द्यावे. ओबीसी आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. त्यामुळे या मेळाव्याच्या निमित्ताने 'ओबीसी डीएनए’ म्हणणाऱ्याकडूनच दगाफटका होण्याची शक्यता व्यक्त करीत छगन भुजबळ यांनी भाजप नेत्यांना एकप्रकारे इशारा दिला आहे.

या मुद्यावरूनच येत्या काळात राज्यातील वातावरण तापणार आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्ताधारी महायुतीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे येत्या काळात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून या सत्ताधारी दोन पक्षातच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना टार्गेट करीत भुजबळ यांनी जोरदार टीका केली. त्यामुळे येत्या काळात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र, हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा घाट घातला जात असल्याने मंत्री भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करीत सरकारच्या विरोधात पंगा घेतला आहे.

गेल्या काही दिवसापासून ओबीसी समाजात दिसत असलेली खदखद पाहून व समाजातील नेत्यांच्या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर, भुजबळ यांनी आता थेट सीएम फडणवीस यांनाच लक्ष्य करण्याची आक्रमक रणनीती अवलंबली आहे. यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढून, त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या व्होटबँकेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात याबाबत आता भाजपकडून काय रणनीती आखली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर भुजबळांनी घेतलेला हा 'पंगा' महायुतीसाठी मोठा 'धक्का' मानला जात असून, येत्या काळात राज्यातील महायुती सरकारसाठी ही नवी डोकेदुखी ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT