Maharashtra Political News : कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची निवड करून त्या पदाला आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. या आयोगाने केलेली एकही शिफारस मान्य केली जात नाही, असा इतिहास आहे. आक्रमक भाषण करणाऱ्या पाशा पटेल यांनी आता फोडाफोडीचेही राजकारण शिकले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांची सोय लावण्यासाठी शोभेचे पद समजल्या जाणाऱ्या या आयोगाच्या अध्यक्षपदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळावा, यासाठी कृषिमूल्य आयोगाकडून केंद्र सरकारला शिफारस केली जाते. मात्र सरासरी दराचे कारण पुढे करत केंद्र सरकारने कायमच कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले आहे. या शिफारशींनुसार एकदाही दर जाहीर करण्यात आलेले नाहीत, हे गेल्या दहा वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली की लक्षात येते.
शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्याची ओरड जुनीच आहे. यातूनच शेतकरी संघटनेची स्थापना झाली होती. यासाठी शेतकरी संघटनेने अनेक लढे उभे केले. त्यानंतर शेतामालाचे दर ठरवण्यासाठी सरकारी पातळीवर एक पद्धत निर्धारित करण्यात आली. केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाकडून हे दर जाहीर केले जातात. कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोनच राज्यांत कृषिमूल्य आय़ोग स्थापन करण्यात आलेला आहे.
प्रत्येक राज्यातून पीकनिहाय दर किती असावे, याबाबत केंद्राकडून शिफारशी मागवल्या जातात. महाराष्ट्राने गेल्या दहा वर्षांत केलेल्या शिफारशी आणि केंद्राने जाहीर केलेले दर लक्षात घेतले तर राज्याचा कृषिमूल्य आयोगाकडून केल्या जाणाऱ्या शिफारशी केवळ औपचारिकता असल्याचे लक्षात येईल. राज्यांनी केलेल्या शिफारशींच्या तुलनेत निम्मेच दर जाहीर केले जातात. बाजारात अनेकदा यापेक्षाही कमी दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट नित्याचीच आहे. त्यामुळे राज्य कृषिमूल्य आयोग आणि त्याचे अध्यक्षपद हे केवळ शोभेचे ठरले आहे. कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी विविध महामंडळे असतात. कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्षपदही तसेच असल्याचे बोलले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पाशा पटेल (Pasha Patel) हे शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे एकेकाळचे झुंजार कार्यकर्ते, नेते. कालांतराने ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. १९९९ मध्ये राष्ट्रवादीकडून त्यांनी लातूर लोकसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरून ते भाजपमध्ये दाखल झाले. २०१४ मध्ये त्यांनी औसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. भाजपने विधानसभेच्या रिंगणात उतरवलेल्या दोन मुस्लिम उमेदवारांपैकी पटेल एक होते. मात्र लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांत पाशा पटेल यांचा पराभव झाला होता.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सखोल जाण असलेल्या पटेल यांची वक्तृत्वशैली काळजाला हात घालणारी आहे. त्यांनी अनेक राजकीय सभा गाजवल्या आहेत. हे गुण हेरून गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना भाजपमध्ये ओढले. त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ मध्ये त्यांनी कृषिमूल्य आय़ोगाची स्थापना केली. त्यानंतर दोन वर्षे अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली नाही. २०१७ मध्ये पाशा पटेल यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी ते पद राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे होते.
२०१९ ला विधानसभेची निवडणूक झाली. अध्यक्षपदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात पाशा पटेल यांना लक्षणीय कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता नुकतीच पाशा पटेल यांची अध्यक्षपदी निवडणूक करण्यात आली आहे. विधानसभेची निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. जेमतेम वर्षभराच्या कार्यकालात पाशा पटेल काय करून दाखवणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांचे ऊसदरासाठीचे आंदोलन पेटले आहे. ते इतक्यात शांत होईल, असे वाटत नाही. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी किंवा ते मोडीत काढण्यासाठी पाशा पटेल महत्वाची भूमिका निभावू शकतात, याची जाणाव फडणवीस यांना आहे. शिवाय आता लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्याच्या प्रचारासाठीही पाशा पटेल यांचा उपयोग होणार आहे. दरम्यान, पाशा पटेल यांनी आता फोडाफोडीचे राजकरणही शिकून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शरद पवार (Sharad Pawar) केंद्रीय कृषिमंत्री होते, तरीही गावागावांत शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता का आहे, असा प्रश्न पटेल यांनी उपस्थित केला होता. आता भाजप सरकार केंद्रात दहा वर्षांपासून आहे. तरीही शेतकऱ्यांची अस्वस्थता कायम का आहे, असा प्रश्न उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. याला पटेल हे आपल्या शैलीत उत्तर देतील, याची जाणीव भाजप नेतृत्वाला आहे. त्यामुळे कृषिमूल्य आय़ोगाचा पांढरा हत्ती पोसण्याचा आणि त्याची धुरा पाशा पटेल यांच्या हाती देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
पत्रकाराला केली होती शिवीगाळ
लातूर येथे सहा, सात वर्षांपूर्वी पाशा पटेल यांनी एका पत्रकाराला शिवीगाळ केली होती. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पाशा पटेल हे त्या पत्रकाराच्या अंगावर धावूनही गेले होते. त्यांना शेतकऱ्यांशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. त्यामुळे पटेल यांचा पारा चढला होता. त्यावेळी ते विधान परिषदेचे सदस्य होते. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला होता.
या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि काही शेतकरीही उपस्थित होते. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांवर त्याचा विपरित परिणाम होईल, शेती सोडून तो आता शहराकडे जायचा विचार करील. पट्रोलचे दर वाढवून सरकारने शेतकऱ्यांना उध्वस्त केले नाही का, असा प्रश्न त्या पत्रकाराने विचारला होता. शेतकरी संघटना ते भाजप प्रवासादरम्यान पाशा पटेल यांच्यात कसा बदल होत गेला, हे या प्रकारावरून लक्षात आले होते.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.