Mumbai News : राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि वाद असे नाते हे जुनेच आहे. तीन महिन्यापूर्वी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. मात्र, या विस्तारात पुन्हा त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली नाही. त्यानंतरही सावंतांमागील वाद काही केल्या पाठ सोडायला तयार नाही. याच वादाच्या पार्श्वभूमीमुळे या वजनदार नेत्याला मंत्रीपदावर पाणी सोडावे लागले. आता ही वादाचे मुद्दे त्यांना मंत्रीपद सोडल्यानंतरही अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत वाढतच आहेत.
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी यांत्रिकी साफसफाईच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी जी काम पूर्वी वार्षिक 70 कोटी रुपयांमध्ये होत होती, त्या कामासाठी तानाजी सावंत यांनी 3 हजार 190 कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचे उघड झाले. त्यामुळे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis ) यांनी राज्यातील सफाई रुग्णालयामध्ये सफाई करण्यासाठी 3 हजार 190 कोटी रुपयांच्या दिलेले कंत्राट रद्द केले असले तरी सावंत या निमित्ताने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सावंत यांनी यापूर्वी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करीत अनेकदा वाद अंगावर घेतला आहे. आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अशा वक्तव्याने ते अडचणीत आले आहेत.
तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर अनेकदा चर्चेत राहिले आहेत. तानाजी सावंत पहिल्यांदा वादात सापडले तेव्हा फडणवीस सरकारच्या शेवटच्या टप्यात ते जलसंधारण मंत्री होते. यादरम्यान कोकणात मुसळधार पाऊस झाल्याने चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती. त्या घटनेचं खापर त्यांनी खेकड्यांवर फोडलं होतं. ते म्हणाले होते."धरण फुटी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. काही गोष्टी कोणाच्याही हातात नसतात. काही ग्रामस्थ आणि अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर खेकड्यांच्या पोखरण्यामुळे हे धरण फुटल्याचं लक्षात येतयं." त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त करण्यात आला होता. विरोधकांनी या विधानावरून सावंतांना धारेवर धरले होते.
त्यासोबतच एकनाथ शिंदे सरकारमध्ये आरोग्य मंत्री असताना त्यांनी 'निवडणूक लढण्यात आपण हयात घालवली. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसल्यानं मळमळ होते,' असे विधान मंत्री सावंत यांनी केल्यानं महायुतीत ठिणगी पडण्याची वेळ आली होती. मात्र, त्यानंतर सारवासारव करण्यात आली होती. त्याशिवाय धाराशिव जिल्ह्यात एका कार्यक्रमावेळी तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याची लायकी काढल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्याला उद्देशून उगाच कोणाची तरी सुपारी घेऊन बोलायचे नाही. लायकीत राहून बोलायचे. ऐकून घेतो म्हणून काहीही बोलायचे नाही. औकातीत राहून विकास करून घ्यायचा' असे म्हटले होते.
धाराशिव जिल्ह्यात असताना त्यांनी 'संपूर्ण महाराष्ट्र भिकारी होईल, पण हा तानाजी सावंत कधी होणार नाही', असे वक्तव्य केले होते. नुकत्याच राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उद्धव ठाकरे सेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करताना त्यांचा बाप काढत त्यांनी रोष ओढून घेतला होता. त्याशिवाय सावंत हे धाराशिवचे पालकमंत्री असताना स्वतःच्या मतदारसंघात अधिक निधी घेण्यावरूनही वादाचे प्रसंग ओढवले होते.
पुण्यात ससून हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर कोण आहे हा हाफकिन त्याच्यावर बंदी घाला, असे आदेश आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना त्यांनीच दिले होते. तर एका नातेवाईकाचे बिल कमी केले नाही म्हणून एका रुग्णालयाच्या मागेही तपासणीची ससेमिरा त्यांनी लावला होता. त्यासोबतच आरोग्य खात्याच्या होणारा औषधाचा पुरवठा थांबवून एका विशिष्ट कंपनीला देण्यासाठी ते आग्रही होते. त्यामुळे एकंदरीत तानाजी सावंत यांची ही भूमिका वादग्रस्त ठरली होती.
त्यातच ताजा असलेला वाद म्हणजे तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज बँकॉकला निघाला होता. त्यावेळी ऋषिराजच्या अपहरणाची फिर्याद देणे, त्यासाठी सरकारच्या यंत्रणेचा वापर करणे, बँकॉकला चालले विमान अर्ध्या रस्त्यातून वळवून घेणे या सर्व प्रकारासाठी केलेला बळाचा वापर चर्चेत आला होता. या त्यांच्या मुलाच्या प्रवासावरून विरोधकांनी टीका केली होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.