Mahayuti News : असे म्हटले जाते, की सवय वेळ, अवेळ पाहत नाही. माणूस सवयीचा गुलाम झाला की त्याला आपण कुठे आहोत, काय बोलत आहोत, याचे भान राहत नाही. वाचाळ, वाह्यात लोकांचेही असेच असते. राजकीय पक्षांमध्ये अशा वाचाळांची, वाह्यातांची कमी राहिलेली नाही. अशा काही लोकप्रतिनिधींना आता स्थळ, काळ तर सोडाच, प्रसंग किती गंभीर आहे किती संवेदनशील आहे, याचेही भान राहिलेले नाही. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या बसमध्ये एका तरुणीवर दुष्कर्म झाला आणि त्याबाबत असंवेदनशीलतेने बोलणाऱ्या या लोकप्रतिनिधींची काय पात्रता आहे, हे लोकांच्या लक्षात आले.
दुष्कर्मासारखा मानवतेला काळिमा फासणारा गुन्हा घडला की सरकारच्या, गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होतच असतात. अशा प्रसंगी सत्ताधाऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. ती न बाळगता भान हरपल्यासारखे बरळले की सरकार अडचणीत येते. दुष्कर्म होत असताना पीडित तरुणीने आरडाओरड केली नाही, असा प्रश्न गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांना पडला. स्वारगेट येथील या दुर्घटनेत संघर्ष झाला नाही. ज्या शिवशाही बसमध्ये दुष्कर्म झाला. त्या बसच्या बाजूला 10 ते 15 जण उभे होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा संशय आला नाही, असेही गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) म्हणाले आहेत.
योगेश कदम हे शिवसेनेचे आहेत. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे आमदार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. अशा घटना घडत असतात, कारवाई होत असते, असे मंत्री सावकारे म्हणाले आहेत. दुष्कर्म प्रकरणातील आरोपीला अटक कधी होणार, या माध्यमांच्या प्रश्नाला सावकारे यांनी दिलेले ते उत्तर आहे. महाराष्ट्राला समृद्ध अशी राजकीय परंपरा होती. ती आता लयाला गेली आहे. 2019 नंतर राज्यात वाचाळ नेत्यांचे पीक आले. त्या पिकाची कापणी अद्यापही सुरूच आहे. पक्षांच्या वाट्याला भरभरून राशी आल्या, मात्र महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा दुष्काळ पडला.
योगेश कदम हे शिवसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आहेत. शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली, त्यावेळी रामदास कदम हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. अर्थात योगेश कदमही वडिलांसोबत शिंदे गटात गेले. शिवसेनेतील या फुटीनंतर दोन्ही गटांतील आरोप-प्रत्यारोप कोणत्या टोकाला गेले आहेत, हे येथे पुन्हा सांगण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप, टीका करण्यात रामदास कदम हे नेहमीच आघाडीवर असतात. त्यांचे पुत्र योगेश कदमही यात मागे नाहीत. संधी मिळेल तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेले आहेत.
आरोप करण्याची, वाचाळपणा करण्याची सवय लागली की माणूस त्याचा गुलाम होतो, त्या सवयीच्या आहारी जातो. याच सवयीमुळे योगेश कदम यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. आपण मंत्री आहोत आणि अत्यंत संवेदनशील अशा प्रकरणाबाबात बोलत आहोत, याचे भान त्यांनी ठेवायला हवे होते. मात्र तसे झाले नाही. नेहमीच वाचाळपणा करण्याची सवय त्यांच्या अंगलट आली. प्रत्यक्षात, राजकीय नेत्यांनी बोलताना संयम पाळणे अत्यंत गरजेचे असते. काही राजकीय नेत्यांचा संयम गेल्या 5-6 वर्षांत पूर्णपणे ढळलेला आहे. त्याचा परिणाम आपण सर्वजण पाहतो आहोत.
अन्य एक मंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) यांचेही भान हरवले. हल्ली वादग्रस्त विधाने करणाऱ्या आमदार, मंत्र्यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी महायुतीत अशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी एखाद्या धर्मीयांच्या विरोधात काही मंत्र्यांकडून, आमदारांकडून सातत्याने वादग्रस्त विधाने केली जात आहेत. मुख्यमंत्री अथवा पक्षाच्या अन्य वरिष्ठांनी अशा मंत्र्यांचे, आमदारांचे कान पिळलेले ऐकिवात नाही. त्यामुळेच मंत्री असलेल्या संजय सावकारे यांचाही तोल ढळला असावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी योगेश कदम, संजय सावकारे यांना समज दिली आहे. मात्र प्रश्न असा आहे, की ही समज पुरेशी आहे का? अन्य मंत्री ज्यावेळी ध्रुवीकरणासाठी वादग्रस्त विधाने करत होते, त्यावेळीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना कठोर शब्दांत समज दिली असती, त्यांच्यावर कारवाई केली असती तर...? आताही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जी कानउघडणी केली आहे, ती लोकांचा राग शांत करण्यासाठी. यापेक्षा अधिक त्यात काहीही नाही, हे लोकांनाही माहित आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला धडा शिकवला. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला प्रचंड असे बहुमत दिले. विरोधक अत्यंत कमकुवत झाले. मतदारांनी टाकलेल्या या विश्वासाचा महायुतीच्या काही नेत्यांनी चुकीचा अर्थ घेतला आहे का, किंवा मतदारांनी यासाठीच प्रचंड बहुमत दिले का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मंत्र्यांची ही इतकी घसरण परवडणारी आहे का, याचा विचार मतदारांनी, समाजाने जरूर करायला हवा. आग लागली की मग ती घर कोणाचे आहे, हे पाहत नाही, हे समाजाने वेळीच लक्षात घ्यायला हवे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.