Narendra Modi And mahayuti  Sarkarnama
विश्लेषण

BJP Politics: भाजपची झोळी फाटकी...मोदींची पुण्याई 'वाचाळवीर' पुन्हा वाया घालवणार..?

अय्यूब कादरी

Maharashtra Politics : राजकारणाचा नूर पार बदलून गेला आहे. टीव्ही उघडला की कोणता नेता येईल आणि काय गरळ ओकून जाईल, याचा नेम राहिलेला नाही. राज्यात महायुतीची सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांनी अधिक जबाबदारीने वागायचे असते, मात्र नेमके याच्या उलट होताना दिसत आहे. विरोधात असलेले नेते, विशिष्ट समुदायाबाबत सत्ताधारी पक्षांतील काही वाचाळ नेते आक्षेपार्ह भाषेत विधाने करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या, त्यात भाजपचा वाटा 9 जागांचा. भाजपला 2019 च्या निवडणुकीत 23 जागा मिळाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या निवडणुकीत राज्यात 18 प्रचारसभा घेतल्या, तरीही भाजप आणि महायुतीचा धुव्वा उडाला.

काहीजणांनी याला मोदींचे अपयश मानले, मात्र मोदींनी सभा घेतल्या नसत्या, त्यांचे पाठबळ नसते तर महायुतीची अवस्था आणखी बिकट झाली असती. भाजप आणि महायुतीला ज्या काही जागा मिळाल्या, त्या मोदींनी केलेल्या प्रचारामुळे आणि त्यांच्या चेहऱ्यामुळे. आता काय होत आहे? मोदींनी वेळोवेळी दिलेले पाठबळ भाजप आणि महायुतीचे नेते वाचाळ बडबड करून वाया घालवत आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतरच्या घडामोडी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या, म्हणजे विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पाठिंब्याविना घडल्या, असे समजणे हा निव्वळ भाबडेपणा ठरेल. राजकारण हे सत्तेसाठी केले जाते. त्यामुळे त्यावेळी जे घडले ते चूक की बरोबर, हा भाग वेगळा. त्याचा निर्णय मतदारांनी लोकसभा निवडणुकीत देऊन टाकला आहे. \

पण आपल्या पक्षाची सत्ता राहावी, राज्यातील नेते, कार्यकर्त्यांना पाठबळ मिळावे, पक्षाचा विस्तार व्हावा, हा मोदी यांचा उद्देश असावा. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे मोदींची पुण्याईच होती, मोदींच्या चेहऱ्यामुळेच ते यश मिळाले होते.

लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपला (BJP) स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे मोदी काहीसे अडचणीत असल्याचे दिसत असले तरी त्यांचा करिष्मा संपला, असे म्हणणे घाईचे ठरू शकते. मात्र मोदींचा करिष्मा संपवण्यासाठी भाजप आणि महायुतीतील काही नेत्यांना घाई झाली आहे, असे चित्र दिसत आहे.

भाजपचे नितेश राणे, गोपीचंद पडळकर, अनिल बोंडे, प्रवीण दरेकर, आशिष शेलार.... यादी आणखी लांबू शकते. या नेत्यांची नावे टाकून गूगलवर सर्च केले की त्यांनी कशी आणि कोणत्या प्रकारची वादग्रस्त विधाने केली आहेत, याचा 'खजिना'च हाती लागेल.

नारायण राणे यांना शिवसेनेने मुख्यमंत्री केले होते. शिवसेनेच्या वाढीत राणेंचाही मोठा हातभार लागलेला आहे. काही कारणांमुळे त्यांना शिवसेना सोडावी लागली, मात्र त्यांच्या आणि त्यांच्या पुत्रांच्या मनात ठाकरे कुटुंबीयांविषयीची अढी अद्यापही कायम आहे. नितेश राणे हे उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांसाठीही अरेतुरेची भाषा वापरतात.

विशिष्ट समुदायाच्या प्रार्थनास्थळात घुसून मारण्याची भाषा करतात, विशिष्ट समुदायातील व्यक्तीच्या घरातील गॅस सिलींडरच्या स्फोटाला ते बॉम्बस्फोट म्हणतात...! आशिष शेलार हे जाहिरपणे हिरवी पिळावल असा शब्दप्रयोग करतात.

गोपीचंद पडळकर यांच्यावर शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सातत्याने लक्ष्य करण्याची जणू जबाबदारीच सोपवण्यात आली आहे. शरद पवार हे वयाने आणि अनुभवानेही जेष्ठ आहेत. ज्येष्ठांचा आदर करण्याची आपली परंपरा. त्यातून राजकीय नेत्यांना सूट देण्यात आलेली नाही, मात्र पवार कुटुंबीयांवर टीका करताना पडळकर यांना भान राहत नाही. त्याचा परिणाम थेट भाजपच्या कामगिरीवर होतो, असा अनुभव आहे.

प्रवीण दरेकर, अनिल बोंडे यांचा सरंजामी बाणा थक्क करणारा असतो. विरोधकांवर टीका करताना दरेकर यांच्या भाषेतील मग्रुरी स्पष्टपणे जाणवते. अनिल बोंडे बोलायला तोंड उघडतात तेव्हा ते जणू आगच ओकत असतात. राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत, असे विधान त्यांनी नुकतेच केले आहे. राहुल गांधी काय बोलले होते, हे त्यांनी आणि अन्य भाजप नेत्यांनी ऐकले होते का, हा आणखी वेगळाच प्रश्न आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि विरोधकांनी त्यांच्यावर भाषेची मर्यादा न पाळता टीका सुरू केली. त्याचा मोदी यांना फायदाच झाला होता. अनेक वर्षे विरोधकांच्या हे लक्षातच आले नाही, भाजपने दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आणि मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्यानंतरही विरोधक त्यांच्यावर आक्षेपार्ह टीका करतच होते. आता ते प्रकार बंद झाले आहेत. मोदींवर वैयक्तिक टीका करणे विरोधक टाळत आहेत. त्यांच्या धोरणांवर टीका केली जात आहे. यापासून राज्यातील भाजपच्या या वाचाळ नेत्यांनी धडा घेतलेला दिसत नाही.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मर्यादा सोडून केलेली टीका लोकांना आवडत नाही, हे समोर आलेले आहे. एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून राजकारण करता येते, असा भाजपच्या या वाचाळवीरांचा समज झालेला आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका बसला आहे. त्यामुळे मोदींनी दिलेले पाठबळ, प्रचारासाठी त्यांनी केलेली धावपळ वाया गेली आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटलेले आमदारही भाजपसोबत होते. भाजपकडे आमदार, खासदार आणि मोदींचे पाठबळ अशी अमर्याद शक्ती होती, मात्र त्याचा उपयोग शून्य झाला, यासाठी कारण ठरले ते भाजपचे हे वाह्यात बडबड करणारे नेते.

या वाचाळवीरांमुळे लोकांच्या मनात भाजपची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. अशा नेत्यांना उमपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे, असा संदेशही लोकांमध्ये गेला आहे. फडणवीस यांनी अशा नेत्यांना कधी समज दिली आहे का, याचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपकडून केल्या जाणाऱ्या बहुचर्चित सूक्ष्म नियोजनाचा बोजवारा उडाला. मोदींची पुण्याई वाया गेली. लोकसभा निवडणुकीनंतर तर बदल होईल असे वाटत असताना विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना हे वाचाळ नेते आणखी बेलगाम झाल्याचे चित्र दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT