Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी जपली बाळासाहेबांची ‘लाईन’; टपरीचालकापासून ट्रक ड्रायव्हरपर्यंत संधी देणाऱ्या ठाकरे शैलीची दिसली झलक

Jyoti Waghmare Candidacy : उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी सोलापूरच्या प्रा. Jyoti Waghmare यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देत धक्कातंत्र वापरले. हा निर्णय Balasaheb Thackeray यांच्या सर्वसामान्यांना संधी देण्याच्या परंपरेची आठवण करून देणारा मानला जात आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 March : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून अनेक बडे नावे चर्चेत होती. मात्र, धक्कातंत्राचा वापर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या सोलापुरातील प्रा. ज्योती वाघमारे यांना संधी देत अनेकांना अचंबित केले आहे. माजी खासदार राहुल शेवाळे, रोहित टिळक यांची नावे चर्चेत असताना शिंदे यांनी प्रा. वाघमारे यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेऊन शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांची लाईन जपली आहे. बाळासाहेबांनी पानटपरी चालक, ट्रक ड्रायव्हर, भाजी विक्रेत्यांना आमदार, खासदार, मंत्री केले. त्यांची आठवण करून देणारा निर्णय ज्योती वाघमारे यांना खासदार करून शिंदेंनी घेतल्याचे मानले जात आहे.

राज्यसभेच्या सात जागांसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी महापौर तथा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या माजी सदस्य माया इनावते, महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवारीबाबत औत्सुक्य होते.

राज्यसभेच्या निवडणुकीतील इतर पक्षाचे उमेदवार पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केलेली प्रा. ज्योती वाघमारे यांची उमेदवारी वेगळी ठरते. राज्यसभा निवडणुकीबाबत असलेला ‘सधन’ समज शिंदेंनी सोलापुरातील मोची समाजातून पुढे आलेल्या आंबेडकरी चळवळीतील वाघमारे यांना संधी देऊन मोडीत काढला आहे.

एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या ज्योती वाघमारे यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे. प्रा. वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवून शिंदेंनी आपल्या निर्णयातून बाळासाहेबांच्या कामाची झलक दाखवून दिली आहे. पक्षीय राजकारणात या निर्णयामागे भले शिंदे यांचा सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न असेल. मात्र, एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या महिलेला खासदारकीची संधी देऊन एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी अनेक सर्वसामान्य, चेहरा नसलेल्या होतकरू तरुणांना जात, पात धर्म न पाहता मोठमोठ्या पदावर संधी दिली. अगदी परराज्यातून आलेले संजय निरूपम यांनाही बाळासाहेबांनी खासदारकी दिली होती. तसेच भाजप विक्रीचे काम करणारे छगन भुजबळ यांना मुंबईचे महापौर करण्याचे काम बाळासाहेबांनीच केले.

स्वतः रिक्षाचालक असलेले एकनाथ शिंदे यांनाही बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात संधी दिली. तसेच, मुंबईत भाजीपाला विकून गुजराण करणारे भुजबळ कुटुंबातील हरहुन्नरी छगन भुजबळ यांनाही बाळासाहेबांनी मुंबईचे महापौर, आमदार केले होते. त्याच भुजबळांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या विरोधात एक सर्व सामान्य शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देऊन भुजबळांना पराभूत करण्याची किमयाही बाळासाहेबांनी साधली होती.

यासोबतच आनंदाराव आडसूळ, संपूर्ण संभाजीनगरमध्ये अवघी काही हजार मते असणाऱ्या समाजातील चंद्रकांत खैरे यांना लोकसभा पाठविण्याचा करिश्माही बाळासाहेब ठाकरेंनी करून दाखवला होता. मराठवाड्यातील अनेकांना बाळासाहेबांनी राजकारणार उभे केले आहे.

मुस्लीम समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील साबीरभाई शेख यांना विधानसभा निवडणुकीत तिकिट देऊन निवडून आणत त्यांना कॅबिनेट मंत्री करण्याचे कामही बाळासाहेबांनी कोणालाही न जुमानता केले होते. महादेवराव देवळ यांना महापौर करण्याचा निर्णयही बळासाहेबांनी असाच घेतला होता.

उत्तर सोलापूर तालुक्यातील ट्रक ड्रायव्हिंग करणाऱ्या उत्तमप्रकाश खंदारे यांना विधानसभा निवडणुकीचे तिकिट देऊन आमदार आणि मंत्रीही बाळासाहेबांनी केले होते. पानाची टपरी चालवणारे गुलाबराव पाटील यांनाही बाळासाहेबांनी राजकारणात आणले आणि मंत्री, आमदार, खासदार केले. विद्यमान मंत्री संजय शिरसाट, माजी खासदार अनंत गुढे यांचीही नावे त्या धाटणीतील आहेत. त्यामुळेच अनपेक्षित आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमीवर नसलेल्या ज्योती वाघमारेंना संधी देऊन एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांची झलक आपल्या निर्णयातून दाखवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT