

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागेसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता या सातपैकी सहा जागा महायुतीच्या वाट्याला येत आहेत तर एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. त्यातच आता आघाडीकडे येत असलेल्या एका जागेसाठी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.
त्यातच आता या जागेवरून आघाडीत एकमत न झाल्यास एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने डाव टाकणार का याची उत्सुकता लागली आहे. शिंदेंनी उमेदवार दिल्यास 2022 ची पुनरावृती होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडून 'या' नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे. त्यानुसार महायुतीमधील भाजपचे 4, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा (Shivsena) एक तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे सहा खासदार निवडून येऊ शकतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षाचे संख्याबळ 46 इतके आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आहेत. विशेष म्हणजे तिन्ही पक्षांचा राज्यसभेच्या वाट्याला येत असलेल्या एका जागेवर दावा आहे. त्यामुळे या तीन पक्षांमधील पेच कायम आहे.
दुसरीकडे आघाडीत बिघाडी झाल्यास 2022 ची पुनरावृती होण्याची शक्यता आहे. 10 जून 2022 रोजी झालेल्या निवडणुकीत सहा जागा असताना शिवसेनेने 2, भाजपने 3 तर काँग्रेसने 1, राष्ट्रवादी काँग्रेसने 1 असे एकूण सात उमेदवार दिले होते. एक उमेदवार अतिरिक्त असल्याने त्यावेळी निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेकडे संख्याबळ असतानाही महाविकास आघाडीतील काही मते भाजपच्या (BJP) उमेदवाराला पडली. त्यावेळी शेवटच्या फेरीत भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले तर निसटत्या मताने शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले होते. संख्याबळ कमी असताना सातवा उमेदवार देणे त्यावेळी शिवसेनेच्या अंगलट आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी तेव्हा शिवसेना एकसंध होती.
त्यामुळे आता होत असलेल्या राज्यसभेच्या या निवडणुकीत महायुतीने आठवा उमेदवार रिंगणात उतरवल्यास महाविकास आघाडीच्या अडचणीत भर पडणार आहे. ही निवडणूक ज्येष्ठ नेते शरद पवार लढवणार असतील, तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. किंबहुना निवडणूक बिनविरोध होणार असेल तरच शरद पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंनी प्रयत्नशील आहेत. दिल्लीत त्या काँग्रेस नेतृत्त्वाशी चर्चा करणार आहेत.
महाविकास आघाडीत एकमत झाले नाही तर या संधीचा फायदा घेण्याची तयारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अथवा काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरणार असेल तर समीकरण बदलू शकते. त्यावेळी शरद पवार यांच्य्या पक्षाचे १० आमदार काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच ठाकरेंचा उमेदवार असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरा उमेदवार देऊ शकतात. शिंदे यांच्या शिवसेनेकडे ५७ आमदार आहेत. पहिला उमेदवार निवडून आणल्यावरही त्यांच्याकडे २० मते शिल्लक राहतात. त्यांना भाजप, अजित पवार यांच्या राष्ट्र्वादीने अतिरिक्त मते दिल्यास त्यांचे गणित जुळण्याची शक्यता आहे.
ठाकरे सेनेपुढील अडचणी वाढणार
एकनाथ शिंदे ठाकरेंच्या सेनेला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे शिंदेंच्या साथीने ठाकरेंची कोंडी करायला भाजपही मदत करेल. त्यामुळे ठाकरेंनी उमेदवार दिल्यास शिंदेंकडून दुसरा उमेदवार दिला जाईल. त्या माध्यमातून दुसरा उमेदवार देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोरील अडचणी वाढवू शकतात.
शिंदेंच्या शिवसेनेकडून 'ही' नावे चर्चेत
राज्यसभेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. यासोबतच माजी खासदार गजानन कीर्तीकर, संजय निरुपम आणि शायना एनसी यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी निरुपम आणि शायना एनसी यांनी वर्षभरापूर्वी पक्षात प्रवेश केला आहे. तर कीर्तीकर आधीपासूनच सेनेत कार्यरत आहेत. पण त्यांचे वय अधिक आहे. त्यामुळे दुसरी जागा लढायचे ठरल्यास संजय निरुपम आणि शायना एनसी यांच्या पैकी एकास उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीत 2022 ची पुनरावृती होणार? का याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.