Jaiwantrao Jagtap-Sharad Pawar Sarkarnama
विश्लेषण

Solapur Politics : जयवंतराव नेमके कुणाचे? शरद पवारांचे स्वागत अन्‌ विजयदादांशी चर्चा!

Madha Lok Sabha 2024 : पवार यांनी बाजार समितीच्या प्रांगणातील देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माजी आमदार जगताप यांनी शरद पवारांचे स्वागत केले. तत्पूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांंनीही जयवंतराव जगताप यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 27 April : माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या स्टेजवर उपस्थिती लावणारे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी करमाळ्याच्या दौऱ्यावर आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वागत केले. त्यानंतर जगताप यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, समर्थक माजी उपनगराध्यक्ष प्रशांत डहाळे, जयराज चिवटे यांनी पवारांच्या सभेला व्यासपीठावर हजेरी लावली. त्यामुळे जयवंतराव जगताप नेमके कुणाचे?, अशी चर्चा करमाळ्यात रंगली आहे.

करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशानिमित्त तसेच, माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळ्यात जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या सभेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे करमाळ्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवार यांनी बाजार समितीच्या प्रांगणातील देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप (Jaiwantrao Jagtap) यांनी शरद पवारांचे स्वागत केले. तत्पूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijayshinh Mohite Patil) यांंनीही जयवंतराव जगताप यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. जगताप यांनी पवारांचे केलेले स्वागत आणि मोहिते पाटील यांची घेतलेली भेट ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विशेष म्हणजे जगताप यांचा मुलगा शंभूराजे जगताप भाजप युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे.

जयवंतराव जगताप यांनी पवारांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, समर्थक माजी उपनगराध्यक्ष प्रशांत डहाळे, जयराज चिवटे यांनी तर पवारांच्या व्यासपीठावर हजेरी लावली. तसेच, जगताप समर्थक मोठ्या संख्येने शरद पवार यांच्या सभेला उपस्थित होते. त्यामुळे जगताप हे निंबाळकर यांच्यासोबत फिरत असले तरी समर्थक नेमके मोहिते पाटील यांच्या सभेला हजेरी लावत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, पवारांच्या सभेसाठी करमाळ्यात आलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सकाळी जगताप यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. त्या भेटीचा तपशील समजू शकला नाही. मात्र, निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय असणारे जगताप यांची भेट मोहिते पाटील यांनी घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

जयवंतराव 2009 मध्ये पवारांविरोधात होते

जयवंतराव जगताप यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेत भाजपचे सुभाष देशमुख यांचा प्रचार केला होता. तसेच ते गेली काही वर्षे सातत्याने भाजप समर्थनाची भूमिका घेत आले आहेत. तरीही पवार व मोहिते पाटील यांच्यासोबतची जगताप यांची भेट राजकीयदृष्टया महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT