Mahavikas Aaghadi News Sarkarnama
विश्लेषण

Mahavikas Aaghadi News : 'महाविकास आघाडी'ने हुरळून जावे,त्याबरोबरच कामालाही लागावे; कारण...

अय्यूब कादरी

Mahavikas Aaghadi News : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या अडीच वर्षांनंतर कोसळले. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना राज्यात प्रचंड सहानुभूती मिळाली. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मिळालेली सहानुभूती टिकू नये, यासाठी भाजप आणि शिंदे गटाने नेटाने प्रयत्न केले, आताही ते सुरू आहेत, मात्र सहानुभूती कायम असल्याचे चित्र एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

एबीपी-सी व्होटरने नुकतेच एक सर्वेक्षण केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी होईल, असे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत. महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) लोकसभेच्या 26 ते 28 आणि महायुतीला 19 ते 21 जागा मिळतील, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला 48 पैकी 41 जागा मिळाल्या होत्या. त्या यशाची पुनरावृत्ती महायुतीतील भाजप आणि मित्र पक्षांना करता येईल का, याबाबत या सर्वेक्षणामुळे शंका निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून 45 जागा जिंकून देण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले आहे. त्या दिशेने भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे.

सर्वेक्षणातील बाबी अनुकूल असल्याने महाविकास आघाडीने हुरळून जाणे साहजिक आहे. मात्र फक्त हुरळून न जाता आता कामाला लागण्याचीही वेळ आहे. अद्याप तरी महाविकास आघाडीची जमिनीवरील तयारी फारशी दिसत नाही. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती अजूनही टिकून असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांनाही सहानुभूती मिळू शकते. मात्र फक्त सहानुभूती असून चालत नाही. ती मतांमध्ये रुपांतरित करण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. महाविकास आघाडीला या लोकांपर्यंत पोहोचावे लागणार आहे, त्यांच्याशी संवाद साधावा लागणार आहे. ही सहानुभूती टिकू नये यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर एकेकळचे त्यांचेच शिलेदार सातत्याने टीका करत असतात. मात्र त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फूट पडल्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष कमकुवत झाले आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये त्यांना सक्षम उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. या दोन्ही पक्षांच्या तुलनेत काँग्रेस कागदावर तुल्यबळ दिसत आहे. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी अद्याप मरगळ झटकल्याचे दिसत नाही.

काँग्रेसच्या 138 व्या स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबर रोजी नागपूर येथे हैं तय्यार हम... रॅली आय़ोजित करण्यात आली. त्या रॅलीतून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मरगळ झटकली तर महायुतीची अडचण वाढू शकते. प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि आता त्यात दुष्काळी स्थितीची भर पडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काँग्रेसने (Congress) खरेच हैं तय्यार हम... असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण केला तर नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष खरे ठरण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणाचे निष्कर्ष भाजपने फेटाळून लावले आहेत. निवडणुकीत फक्त मोदींचीच जादू चालणार आणि भाजप 40 पेक्षा अधिक जागा जिंकणार, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी ते दावा उगाच करावा म्हणून केलेला नाही. भाजपने तशी तयारी सुरू केली आहे.

निवडणूक असो की नसो, भाजपची यंत्रणा कायम कार्यरत असते. गावागावांत पेजप्रमुख. बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, सर्कल प्रमुख अशी ही रचना करण्यात आली आहे. पेजप्रमुख हा त्याच्या भागातील ३० ते ४० घरांच्या सतत संपर्कात राहतो. त्यांच्या अडीअडचणी समजू घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या ठिकाणी भाजपला कमी मतदान मिळाले आहे, तेथे भाजपने वॉरियर्सची नियुक्ती केली आहे. पक्षाला झालेल्या कमी मतदानाच्या कारणांचा शोध घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. भाजपच्या या तयारीला तोंड द्यायचे असेल तर महाविकास आघाडीला आता रस्त्यावर उतरून लोकांपर्यंत पोहोचण्याशिवाय पर्याय नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT