Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड महापालिकेत शेकडो कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचा बॉम्ब नुकताच विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फोडला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद असून त्यात उद्योगनगरीतील 3 आमदार (भाजपचे भोसरीचे महेश लांडगे,चिंचवडच्या अश्विनी जगताप आणि पिंपरीचे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे) आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे सहभागी असल्याचा सनसनाटी आरोप महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारी (ता.१५) केला.
वाकड येथील दोन हेक्टरच्या भूखंडात हा दीड हजार कोटींचा टी़डीआर घोटाळा (TDR Scam) झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेनेचे (ठाकरे गट) पिंपरीचे माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केला. अशाप्रकारे इतर ११ टीडीआर घोटाळे झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला. या घोटाळ्यात एक बड्या स्थानिक राजकीय नेत्याचाही सहभाग असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, शेखर सिंह यांनी गुरुवारी या आरोपाचा इन्कार केला होता.
या टीडीआर घोटाळ्यावर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,असे आव्हान देत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न कामठेंनी यावेळी केला. महापालिका आयुक्त शेखर सिंह हे शहरातील तिन्ही आमदारांच्या घरचे घरगडी आहेत का,अशी विचारणा त्यांनी केली.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा भ्रष्टाचाराचा एक कलमी कार्यक्रम सुरू असून त्यातून जनतेच्या पैशाची लूट होत आहे,असा हल्लाबोल कदम यांनी केला. गरज पडली,तर न्यायालयात जाऊ, असा इशारा अॅड. भोसले यांनी दिला.
((राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा)
उद्योगनगरीतील तिन्ही आमदारांनी विधानसभेत या घोटाळ्यावर आवाज का उठवला नाही,ते गप्प का आहेत, अशी विचारणा अॅड.चाबूकस्वार यांनी केली. त्यांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून ते या घोटाळ्यात सहभागी आहेत का असा प्रश्न ती विचारत आहे,असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने हा घोटाळा झाला आहे,असा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी कारवाई झाली नाही,तर आघाडी आंदोलन करेल,असा इशारा त्यांनी दिला. (Mahavikas Aaghadi)
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.