Maharashtra Politics  Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : वय झाले, इच्छाशक्ती कायम..! दोन नेत्यांनी फोडलाय शक्तिशाली सत्ताधाऱ्यांना घाम

Loksabha Election 2024 : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे वय झाले असेल, मात्र राजकारणातील त्यांची सक्रियता तरुणांना लाजवेल अशी आहे. पवार आणि मोहिते पाटील यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे, हालचालींमुळे माढा, सोलापूर, धाऱाशिवमध्ये सताधाऱ्यांना धडकी भरली आहे.

अय्यूब कादरी

Political News : राजकारणातील विपरित परिस्थितीवर मात करण्यात ज्या नेत्यांचा हातखंडा आहे, त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव शीर्षस्थानी आहे. राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो, राजकारणात कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. ज्याला हे कळते, तो हार मानत नाही. 84 वर्षीय शरद पवार आज ज्या पद्धतीने राजकारणात सक्रिय आहेत, त्यापासून नवोदित राजकारण्यांना बरेच शिकता येण्यासारखे आहे. विरोधकांना पूर्णपणे बेदखल केले गेलेल्या या काळात शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आहे.

शरद पवार यांच्या जागी आणखी एखादा नेता असता तर त्याने कदाचित पराभव पत्करला असता. पवार यांचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते पाटील हेही या संकटाच्या काळात त्यांच्यासोबतच आलेले आहेत. विजयदादा हे येत्या 12 जून रोजी वयाची 80 वर्षे पूर्ण करणार आहेत. (Madha Loksabha Election 2024)

2019 ची राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत पवार यांनी जी भूमिका वठवली तशीच भूमिका या निवडणुकीतही त्यांच्या वाट्याला आली आहे. त्या निवडणुकीच्या आधीही पवारांच्या अनेक दिग्गज शिलेदारांनी त्यांची साथ सोडली होती. या निवडणुकीत तर चित्र पूर्णपणे वेगळे आहे. त्यांच्या पक्षाचेच दोन तुकडे करण्यात आले आहेत. पण ते पुन्हा खंबीरपणे उभे राहिले आहेत.

राज्य, देशातील अनेक नेत्यांनी ईडीसमोर (ED) कशी नांगी टाकली, हे जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्याच ईडीला शरद पवार यांनी घाम फोडला होता. त्यांचा पक्ष फुटला असला तरी काही दुरावलेले दिग्गज नेते मात्र पुन्हा त्यांच्यासोबत येत आहेत. यात अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील हे प्रमुख नाव आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते कुटुंबीयांच्या सहकार्याशिवाय उमेदवार निवडून येऊ शकत नाही, असे सांगितले जाते. भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांच्या या ताकदीकडे दुर्लक्ष करून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली. मोहिते पाटील यांचा निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध होता. हा प्रश्न मोहिते पाटलांच्या प्रतिष्ठेचा बनला आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली. त्यानंतरही शरद पवार यांनी माढा मतदारसंघात बेरजेचे राजकारण सुरूच ठेवले आहे. त्याचा परिणाम मराठवाड्यातील उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माळशिरसमधील मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर (Uttam Jankar) हेही आता त्यांच्यासोबत आले आहेत. माढा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीसाठी जानकरही इच्छुक असल्याची चर्चा होती. त्यामुळे जानकरही नाराज होते आणि ते शरद पवार यांना भेटले होते. किमान हे डॅमेज तरी कंट्रोल करता येते का, हे पाहण्यासाठी फडणवीस यांनी खास विमान पाठवून जानकर यांना बोलावून घेतले होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

उत्तम जानकर यांनी आता धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या सर्व घडामोडींचा अंदाज आल्यामुळेच सोलापूरची जागा भाजपसाठी कठीण आणि माढ्याची जागा जरा जास्तच कठीण आहे, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतेच केले आहे. शरद पवार संपले, अशी हाकाटी सातत्याने पिटणाऱ्या भाजप नेत्यांसाठी ही मोठी चपराक समजली जात आहे.

मोहिते पाटलांनी त्यांच्या शिवरत्न बंगल्यावर शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी चांगला संदेश गेला. त्यानंतर त्यांनी माजी मंत्री, बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांची बार्शीला त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

बार्शीचे राजकारण हे दिलीप सोपल आणि आमदार राजेंद्र राऊत दोन नेत्यांभोवतीच फिरत असते. आमदार राऊत हे महायुतीसोबत आहेत. बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात आहे. मेहिते पाटील यांनी सोपल यांची भेट घेतल्यामुळे आता ते महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मदत करतील, हे राजकीय वर्तुळात निश्चित मानले जात आहे.

बार्शी येथून अकलूजला येताना विजयसिंह मोहिते पाटील (VijaySinh Mohite Patil) यांनी अनगर (ता. मोहोळ) येथे जाऊन माजी आमदार, सोलापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन पाटील अनगरकर यांची भेट घेतली. राजन पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजितदादा पवार गट) आहेत. अजितदादांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याकडून राजन पाटील यांच्या मागे प्रचंड आरोप करण्यात आले आहेत. विजयसिंहांची ही भेट कौटुंबिक होती, असे सांगितले जात आहे.

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा समावेश सोलापूर लोकसभा मतदरासंघात आहे. या मतदारसंघातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या या बेरजेच्या राजकारणामुळे माढा, सोलापूरसह उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना नक्कीच धडकी भरलेली असणार.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT