Solapur, 19 April : माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांनी शुक्रवारी (ता. १९ एप्रिल) बहुजन समाज पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. घराणेशाहीला महादेव जानकर यांचा विरोध होता, त्यामुळे मला चुलत्याच्या (काका) पक्षाकडून उमेदवारी मिळू शकली नाही. पण, आजोबांच्या (कांशीराम) पक्षाकडून माढ्याच्या रणांगणांत उतरलो आहे, असे स्वरूप जानकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
बहुजन समाज पक्षाकडून (BSP) स्वरूप जानकर ( Swaroop Jankar) यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha constituency) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते म्हणाले, जानकर यांची राजकीय वाटचाल ही कांशीराम यांच्या प्रेरणेतूनच झाली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ते शाहू-फुले-आंबेडकर वादीच आहेत. त्यामुळे आमचा वैचारिक वारसा एकच आहे. त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
जानकर यांची गेल्या वर्षभरातील टीका हे भाजपवरच होती. सध्या त्यांची भूमिका ही राजकीय तोडजोड आहे. सभांमधून ते माझ्यावर टीका करणे सहाजिकच आहे. पण त्यांची दीड ते दोन वर्षांतील विधान पाहिली तर कोणाला मतदान करायचं, हे मतदारांना कळून चुकेल. त्यांचा घराणेशाहीला विरोध आहे. पण मला राजकीय भूमिका घ्यायची होती म्हणून मी ही भूमिका घेतली आहे,असेही स्वरूप जानकर यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाने राज्यघटनेवर चालवलेले अतिक्रमण रोखण्याची क्षमता बहुजन समाज पक्षाच्या विचारधारेत आहे. बहुजनांना सत्तेपर्यंत पोचविणारा बहुजन समाज पक्ष माढ्यात निश्चितपणे परिवर्तन करेल आणि भाजपमुक्त माढा सर्वांना दिसेल, असा विश्वासही स्वरूप जानकर यांनी व्यक्त केला.
जानकर म्हणाले, मतदारसंघातील प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच बहुजन समाजाला मान-सम्मान देण्याचे काम प्राधान्याने करणार आहे. भाजपमुळे लोकशाहीला धोका पोहचतोय, असे वातावरण आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करणे ही काळाची गरज आहे. ती सुरूवात माढ्यातून निश्चितपणे होईल. माढ्यात आता बहुजन पर्व दिसेल.
या वेळी बसपाचे पुणे झोन प्रभारी आप्पासाहेब लोकरे, जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे, जिल्हा प्रभारी योगेश गायकवाड, विक्रम ढोणे, प्रसाद ओंबासे, किरण सावंत, राजेंद्र बोडरे, बाळराजे विरकर, तिपन्ना लोहार, अशोक ताकतोडे, प्राशिक माने, राहुल सर्वगोड, विलास शेरखाने आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.