Maharashtra Floods: महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळं आलेल्या महापुराचा मोठा फटका बसला असून खरिपाच्या १ कोटी ४६ लाख हेक्टरपैकी ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. इथला शेतकरी उद्ध्वस्त झाला असून त्याच्या शेतातली उभी पिकं, घरसंसार आणि पशुधन वाहून गेलं आहे. या संपूर्ण परिस्थिचीचा परिणाम पाऊस थांबल्यानंतरही जाणवणार असून राज्यातील सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका बसणार आहे. हा फटका किंवा परिणाम कशा स्वरुपाचा असेल हे सविस्तर जाणून घेऊयात.
राज्यात अतिवृष्टीमुळं ४७ टक्के खरिप क्षेत्र बाधित झालं आहे. यामुळं खरिपाचा निम्मा हंगाम वाया गेला आहे. यामध्येही धाराशीव, जालना, बीड, लातूर, सोलापूर, अहिल्यानगर या भागातील मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. राज्यातील या महापुराचे परिणाम अवघ्या महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत. याचा अर्थ असा की, मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झाल्यानं सहाजिकच येत्या काळात भाज्या आणि धनधान्याचे भाव वाढणार आहेत. मोठ्या प्रमाणावर गाई-म्हशींचा मृत्यू झाल्यानं तसंच शेतात लावलेला चाराही वाहून गेल्यानं त्याचा दुधाच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. म्हणजेच भाजीपाला, धान्य याबरोबरच दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन याच्या किंमती भरमसाठ वाढण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्यात सोयाबीनंचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, काही भागात कापसासह अन्य पीकं घेतली जातात. सोयाबीनचं पीक नगदी आणि भरवश्याचं पीक असतं. पण यंदा सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं सोयाबीन आणि इतर पिकांची वाढ झाली, पण पाच दिवस वाफ्यात पाणी राहिलं आणि ही पीकं कुजून गेली. तर दुसरीकडं ज्वारी आणि बाजरी त्याचबरोबर फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. उत्तर महाराष्ट्र, सोलापूर भागात केळी बागा भुईसपाट झाल्या आहेत. तसंच नाशिक भागात द्राक्षांचंही मोठं नुकसान झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाच्या पिकालाही फटका बसला आहे. खरिप हंगामातील इतर पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, भात, मका, भाजीपाला, कांदा, डाळी, मूग यांसारख्या खरिप पिकांचंही या अतिवृष्टीमुळं प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या सर्व पिकांच्या मागणीनुसार पुरवठा न झाल्यास त्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
एका रिपोर्टनुसार, अतिवृष्टी आणि पुरामुळं ३९ मोठी दुधाळ जनावरे आणि ३० दुधाळ लहान जनावरं तसंच १७ ओढकाम करणारी लहान-मोठी जनावरं मृत्युमुखी पडली आहेत. पण अनेक जनावरं वाहून गेल्याचंही सांगितलं जात आहे. याची अधिकृत आकडेवारी अद्याप पंचनामे झालेले नसल्यानं समोर आलेली नाही. पण ज्या गाई-म्हशी सध्या सुरक्षित आहेत पण त्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे, त्यांच्यामध्ये रोगराईचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या कुकुट्टपालनालाही मोठा फटका बसला आहे. कोंबड्यांमध्येही आजार पसरून त्यांच्या मृत्यूचं प्रमाणं वाढू शकतं त्यामुळं चिकन आणि अंड्यांच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनतेला जगण्यासाठी जो भाजीपाला, डाळी, फळं, धान्य, दुध, अंडी, चिकन याची गरज आहे त्याची मागणी वाढलेली असेल पण त्या प्रमाणात पुरवठा होऊ न शकल्यास या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
यंद्या अतिवृष्टी आणि महापुरामुळं ८६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं काही वृत्तपत्रांनी आपल्या बातम्यांमध्ये म्हटलं आहे. पण अद्याप याची अधिकृत आकडेवारी सरकारनं जाहीर केलेली नाही. पण मृत्यूमुखी पडेलल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिलेचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाचा जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. तसंच मुलांच्या शाळांची दप्तरं वाहून गेली अथवा पाण्यात भिजल्यानं ते वापरता येणार नाहीत. तर अनेक शाळांचही पडझड तसंच साहित्य भिजल्यानं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यासमोर जगण्यासह त्यांच्या मुलांचा शिक्षणाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतीच्या नुकसानीमुळं शेतकऱ्यांवर जसा अतिवृष्टीचा परिणाम झाला आहे. तसाच परिणाम ग्रामीण भागात ज्यांची शेती नाही पण जे शेतमजूर म्हणून काम करतात अशांवरही होणार आहे. शेतीच्या कामामध्ये खुरपणी असेल किंवा पिक काढणीला आल्यानंतर शेतात कामासाठी मजुरांची मोठी गरज भासते. ऊसाच्या पिकासाठी ऊततोड मजूर म्हणून काम करणाऱ्यांसाठीही या अतिवृष्टीचा मोठा फटका बसणार आहे. शेतात उभी पिकचं राहिली नसल्यानं शेतमजुरांच्या हाताला काम नसणार त्यामुळं त्यांच्याही उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण त्यांच्यासाठी शासनानं अद्याप मदत जाहीर केलेली नाही.
नेहमीच्या नुकसान भरपाईच्या निकषांनुसार, पावसाच्या कारणामुळं मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत केली जात आहे. जनावरांसाठी ३७ हजार ५०० रुपयांची भरपाई दिली जात आहे. त्याचबरोबर शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या आणि डुक्करं दगावल्यास प्रत्येकी ४ हजार रुपयांची मदत दिली सरकारं जाहीर कली आहे. यामध्ये मोठ्या जनावरांची मर्यादा ३, तर छोट्या जनावरांची मर्यादा ३० इतकी निश्चित करण्यात आली आहे. कुक्कुटपालनात कोंबड्याही दगावल्यानं प्रत्येक कोंबडीसाठी १०० रुपये मदत शासनानं जाहीर केली आहे. त्यामुळं कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाला किमान १०,००० रुपयांची मदत मिळणार आहे. तसंच पावसामुळं शेतकऱ्याचं कच्च घरं पडलेलं असल्यास प्रत्येकी ८ हजार रुपये तर पक्क्या घराच्या पडझडीसाठी प्रत्येकी १२ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. तसंच कोरडवाहून पिकांसाठी प्रतिहेक्टरी साडेआठ हजार रुपये तर बागायची पिकांसाठी १७ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसंच शेतजमीनीतील माती वाहून गेल्यास किमान ५ ते कमाल ४७ हजार रुपये मदत शासनाकडून देण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.