Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Manoj Jarange Sarkarnama
विश्लेषण

Manoj Jarange Rally News : जरांगे पाटलांनी घराचा उंबरा शिवला नाही तर सरकारवर सत्तेचा उंबरा सोडण्याची वेळ येणार ?

अय्यूब कादरी

Maratha Reservation News : काहीतरी वेगळे करावे, आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे, यासाठी ती घराचा उंबरा (उंबरठा) ओलांडते. समाजाच्या जडणघडणीत योगदान मिळेल, असे मोठे काम ती आपल्या खांद्यावर घेते. समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित, अत्याचार सहन केलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ती एका महिला सुधारगृहात अधीक्षक म्हणून काम सुरू करते.

घरापासून, आपल्या प्रियजनांपासून दूर फेकले जाण्याचा धोका पत्करून ती आपले काम करते. विजय तेडुलकर यांची पटकथा आणि जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन असलेला १९८२ मधील उंबरठा चित्रपट बऱ्याच लोकांना आठवत असेल. काहीतरी करून दाखवण्यासाठी उंबऱ्याबाहेर बाहेर पडणारी अभिनेत्री स्मिता पाटीलही आठवत असेल. घराच्या उंबरठ्याला या अर्थाने खूप मोठे महत्व आहे.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत आहे. काही वर्षांपूर्वी या मागणीसाठी मराठा समाजाने काढलेले मूक मोर्चे जगभरात चर्चेचा विषय ठरले. लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला, मोर्चे काढण्यात आले. संख्या लाखोंची असली तरी कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

एवढे करूनही मराठा समाजाची मागणी पूर्णत्वाला गेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आता निर्णायक लढा सुरू झाला आहे. अंतरवाली सराटी (जि.जालना) येथे जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण केले. यादरम्यान पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर अमानुष लाठीमार केला. त्यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झाला. त्यानंतर राज्यभरात बंद पाळण्यात आला.

मराठा समाज आक्रमक झाला. त्यांची वज्रमूठ आणखी घट्ट झाली. विधायक मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन आणखी तीव्र झाले. एक महिन्यात आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन सरकारने दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्याला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १४ ऑक्टोबर रोजी जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा झाली.

लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या जनसागरासमोर जरांगे पाटलांनी घोषणा केली, 'मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी घराचा उंबरा शिवणार नाही...!' जरांगे पाटील यांनी लवकर उंबरा नाही शिवला तर सरकारवर मात्र सत्तेचा उंबरा सोडण्याची वेळ येऊ शकते, अशी परिस्थिती आहे.

भारतीय संस्कृतीत उंबरठ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. उंबरा म्हणजे घराची सीमारेषा, मर्यादा. उंबरा ओलांडूनच घराच्या बाहेर पडावे लागते. ग्रामीण भागात जुन्या धाटणीने केल्या घरांच्या बांधकामात उंबरा स्पष्टपणे दिसतो. फ्लॅट संस्कृतीमध्ये तो ठळकपणे दिसत नाही. वास्तुशास्त्रातही उंबरठ्याला धार्मिक दृष्टीने खूप महत्व दिले जाते. तो कसा असायला हवा, कधी बसवायला हवा आणि तो कोणत्या लाकडापासून बनवला पाहिजे, हे विस्ताराने सांगितलेले आहे.

धार्मिकदृष्ट्या उंबरठा म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराची चौकट. ज्याला फ्रेम असेही म्हटले जाते. घर म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे स्त्रोत, केंद्र समजले जाते. बाहेरून घरात प्रवेश करताना बाहेरच्या ज्या नकारात्मक शक्ती, नकारात्मक विचार असतात, त्यांचे विसर्जन उंबरठ्याच्या बाहेरच व्हायला पाहिजे. उंबरठ्याच्या बाहेर पडताना घरातील सकारात्मक ऊर्जा समाजात गेली पाहिजे, असाही उद्देश असतो.

इस्लाममध्येही उंबरठ्याला खूप महत्व आहे. उंबरठ्याच्या आत येण्यापूर्वीच प्रत्येकाने घरातील लहान, मोठ्यांना सलाम (नमस्कार) करण्याचा प्रघात आहे. असे केल्याने वाईट विचार, वाईट शक्ती घरात येत येत नाहीत, असे इस्लाम सांगतो. उंबरठ्यावर ठेवलेले तांदळाचे माप पायाने लवंडूनच नववधू लग्नानंतर पहिल्यांदा घरात प्रवेश करते.

उंबरठा ओलांडून आत आले म्हणजे मी या घरची झाले, अशी भावना त्याद्वारे नववधूच्या मनात निर्माण केली जाते. या घरची झाले म्हणजे या घरच्या मान-मर्यांदांचे मी पालन करीन, असाही संदेश त्याद्वारे दिला जातो. या झाल्या धार्मिक बाबी. त्याव्यतिरिक्तही उंबरठ्याला महत्व आहे.

घरचा कर्ता माणूस बाहेर असतो. घरी येताना त्याच्यासोबत बाहेरील किडे, मुंग्या, सरपटणारे प्राणी यांना घरात प्रवेश मिळू नये, यासाठीही उंबरठा असतो. महसूल व्यवस्थेतही उंबरठा या शब्दाचा वापर केला जातो. गाव किती उंबऱ्यांचे आहे, असे म्हटले जाते. म्हणजेच घरांची संख्या मोजण्याचे ढोबळ मानाने हे एककच.

स्मिता पाटील यांचे उंबरठा (उंबरठा चित्रपटात) ओलांडणे हा सांकेतिक संदेश होता. स्वकर्तृत्व दाखवण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या. नंतर काय झाले किंवा त्या घरी परत आल्यानंतर काय परिस्थिती होती हा स्वतंत्र विषय आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही उंबरठ्याचे महत्व, पावित्र्य जपत थेट मराठा समाजाच्या मनाला शिवले आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मी घराचा उंबरा शिवणार नाही, हे वाक्य त्यामुळेच मराठा आरक्षण आंदोलनाची वज्रमूठ आणखी घट्ट करू शकणारे ठरेल.

त्यांची ही घोषणा समाजाच्या मनात घर करून राहणारी आहे. एक माणूस आपल्यासाठी किती मोठा त्याग करतो आहे, हा संदेश मराठा समाजामध्ये गेला आहे. मराठा आरक्षण कधी मिळेल, हे लवकरच स्पष्ट होईल. ते मिळाल्याशिवाय घराच्या उंबऱ्याला शिवणार नाही, ही त्यांची घोषणा अनेक अर्थांनी महत्वाची ठरली आहे. एखादा उद्देश पूर्ण होईपर्यंत माझा मुलगा, माझे पती, माझे वडिल घराच्या उंबऱ्याला शिवणार नाहीत, ही भावना समाजाशी, सत्कार्याशी नाते घट्ट करणारी आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT