Nagpur Flood Sarkarnama
विश्लेषण

Marathwada floods: नेत्यांचा दौरा, घोषणांचा पाऊस... पण मदत कधी? मराठवाड्यातील पूरग्रस्त हवालदिल!

Flood victims in Marathwada News : या सर्व प्रकारानंतर प्रशासकीय यंत्रणा सध्या अतिवृष्टीग्रस्त भागात दौरे करीत आहे. प्रशासनातील अधिकारी पंचनाम्याच्या कामात व्यस्त आहे. तर दुसरीकडे पाहणी दौरा करीत असलेल्या नेतेमंडळींकडून घोषणांचा पाऊस पडत आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील जनता अतिवृष्टीने त्रस्त झाली आहे. गेल्या काही दिवसात राज्यात झालेला पाऊस गेल्या अनेक वर्षातील विक्रमी पाऊस आहे. त्याचा मोठा फटका मराठवाड्यला बसला आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील जवळपास आठ जिल्ह्यतील व लगतच्या सोलापूर जिल्ह्यात मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामुळे शेतीमध्ये तर काहीच शिल्लक राहिले नाही. उभे असलेले सर्वच पीक वाहून गेले आहे. तर या पुरामुळे शेतातील माती देखील खरडून गेली आहे. त्यासोबतच गोठ्यात असलेली जनावरे देखील वाहून गेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या सर्व प्रकारानंतर खडबडून जागे झालेली प्रशासकीय यंत्रणा सध्या अतिवृष्टीग्रस्त भागात दौरे करीत आहे. प्रशासनातील अधिकारी पंचनाम्याच्या कामात व्यस्त आहे. तर दुसरीकडे पाहणी दौरा करीत असलेल्या नेतेमंडळींकडून घोषणांचा पाऊस पडत आहे तर शेतीचे पंचनामे झाल्याशिवाय नुकसानीच्या मद्तीचे वाटप करण्यात अडचणी येणार असल्याने सर्वांचे लक्ष मदत कधी मिळणार? याकडे लागले असून यामुळे मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे.

मराठवाड्यात पुराचा फटका मोठ्याप्रमाणात बसला आहे. त्यामुळे या मुसळधार पावसाने व त्यानंतर आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून आता नेत्यांचे पाहणी दौरे सुरु झाले आहेत. त्यामुळे आता घोषणांची मालिका सुरू झाली आहे. पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नेते मोठमोठी आश्वासने देत आहेत, पण प्रत्यक्षात मदतीची प्रतीक्षा दुसरीकडे कायम आहे.

राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे सर्वच स्थरातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त अडीच हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी आहे. संपूर्ण मराठवाड्यात शेतकऱ्यांना हेक्टरी फक्त साडे आठ हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांचे पीक सडून गेले आहे. शेत साफ करण्याचा खर्च, कर्जाचा खर्च फार आहे. जमिनीची वाताहत झाली आहे, ती नीट करण्याचा खर्च आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे आहे.

ज्या शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले, ज्यांच्या घरात पाणी शिरून संसार उद्ध्वस्त झाला, त्यांच्या डोळ्यांत फक्त मदतीची आस आहे. 'आम्ही पाहणी करत आहोत, पंचनामे सुरू झाले आहेत', अशा शब्दांनी त्यांना तात्पुरता दिलासा मिळतो, पण खरी गरज आहे ती तातडीच्या मदतीची.

केवळ राजकीय घोषणा आणि फोटोसेशनपेक्षा सरकारने मदतीचे हात पुढे करावेत, अशी आर्त हाक आता पीडित नागरिक देत आहेत. नेत्यांचे दौरे महत्त्वाचे आहेत, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, शेतकऱ्यांच्या आणि पूरग्रस्तांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष मदत जमा होणे. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या दोन दिवसात राज्यातील सत्ताधारी व विरोधकांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. विशेष म्हणजे पाहणी करताना थेट शेतकऱ्यांच्या बांधावरील परिस्थिती बघितली आहे. त्यामुळे त्यांना नुकसानीचा अंदाज आला आहे. त्यामुळे आता पंचनामे, पाहण्या आणि बैठका पुरे झाल्या आहेत. आता नुसती आश्वासने देऊन भागणार नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करावी लागणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे.

राज्यातील शेतकरी (Farmer) वर्गातून तातडीने आर्थिक मदत हवी आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्याला तातडीने प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत जाहीर करा, अशी मागणी केली जात आहे. त्यासोबतच राज्यातील शेतकरी वर्ग गेल्या अनेक दिवसापासून बिनशर्त कर्जमाफी करण्याची मागणी करीत आहे. त्यामुळे कमीत कमी नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे थकीत कर्ज तात्काळ माफ करण्याची गरज आहे.

त्यासोबतच पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी कोणतीही अट व निकष न ठेवता, मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची गरज आहे. शेतकरी वर्गातून व विरोधी पक्षाकडून केल्या जात असलेल्या या मागण्यांमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, राज्यातील महायुतीचे (Mahayuti) सरकार आता यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT