Narendra Modi, Hemant Godse  Sarkarnama
विश्लेषण

Nashik Lok Sabha Analysis : नरेंद्र मोदींची सभा हेमंत गोडसेंना पुन्हा खासदारकीपर्यंत पोहचवणार का ?

Nashik News : गेल्या दोन महिन्यात त्यांना महायुतीमध्ये नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाच्या पदरात पडून घेण्यापासून ते शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी गोडसेंना मोठी कसरत करावी लागली.

Sachin Waghmare

Special story : नाशिक लोकसभा मतदारसंघात खासदार हेमंत गोडसेंना सुरुवातीच्या काळात उमेदवारी मिळवताना शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला. त्यामुळे दोन वेळा विजयी झालेले गोडसेंना हॅट्ट्रिक करता येणार की नाही? याबाबत सांशकता होती. गेल्या दोन महिन्यात त्यांना महायुतीमध्ये नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाच्या पदरात पडून घेण्यापासून ते शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी गोडसेंना मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे आता सर्वांना नाशिकमध्ये पीएम नरेंद्र मोदींची झालेली सभा हेमंत गोडसेंना तारणार का ? याची उत्सुकता लागली आहे.

नाशिक मतदारसंघ हा हिंदुत्ववादी विचारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना मानणारा मतदारसंघ आहे. येथील मतदार मोठा प्रतिसाद देतील. यावेळी देखील मोठ्या मताधिक्यांनी शिवसेनेला (Shivsena) लोकसभा निवडणुकीत यश मिळेल, अशीच सर्वाना अपेक्षा होती. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच महायुतीमधील भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट यांनी नाशिकच्या जागेवर दावा सांगितला होता. त्यासोबतच उमेदवाराना तयारी सुरु करण्यास सांगितली होती. त्यामुळे गोडसे यांची धाकधूक काहीशी वाढली होती. (Nashik analysis)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाशिक मतदारसंघासाठी प्रमुख इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे खासदार गोडसे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे ते छातीठोकपणे सांगत होते. त्यामुळे महायुतीमधील तीनही घटक पक्षात नाशिकच्या जागेवरून मोठी रस्सीखेच पाहवयास मिळाली. उमेदवारी मिळवण्यासाठी व जागा सोडून घेण्यासाठी गोडसेना आठवड्यातून दोन ते तीनवेळा मुंबईची वारी करावी लागत होती. त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वारंवार भेट घ्यावी लागत होती.

अखेर या सर्व प्रयत्नानंतर निवडणूक रिंगणातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली. त्यामुळे हेमंत गोडसेंचा मार्ग मोकळा झाला. त्यासाठी महिनाभर महायुतीचे तीनही पक्ष आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नेते एकमेकांशी झुंजत होते. ही झुंज नाशिक मतदारसंघाच्या वीस लाख मतदारांना अस्वस्थ करत होती. त्यापेक्षाही अधिक विद्यमान खासदार असूनही आणि उमेदवारीचे कमिटमेंट घेऊन ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलेल्या गोडसे यांना मनस्ताप करणारी होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघातून भाजपने गेले वर्षभर अनेक इच्छुकांना मधाचे बोट लावून तयारी करण्यास सांगितले होते. खासदार गोडसे यांच्या उमेदवारीला भाजपच्या शहरातील तीन्ही आमदारांनी विरोध केला तेव्हा. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते गेले वर्षभर निवडणुकीसाठी परिश्रम घेत होते. त्यामुळे त्यांनाही ही जागा सहकारी पक्षाला सोडणे त्रासदायक होते. त्यामुळे भाजपने शेवटच्या टप्प्यात अतिशय आक्रमक भूमिका घेत नाशिकचा मतदारसंघ भाजपला सोडावा, असे प्रयत्न केले. त्यामुळे महायुतीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

अजित पवार गटाचे भुजबळ यांना पडद्याआडून मोठा विरोध झाला. त्यामुळे महिनाभर वाट पाहिल्यानंतर भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे गोडसेंचा मार्ग मोकळा झाला. गोडसे नाशिकमधून चौथ्यांदा उमेदवार आहेत. पहिल्यांदा मनसे दुसऱ्यांदा भाजप शिवसेना युतीतर्फे ठाकरे गटाचे आणि यंदा शिंदे गटाचे उमेदवार म्हणून ते मतदारांना सामोरे जात आहेत.

खासदार गोडसे यांचा सामना महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याशी आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्याकडून करण्यात आलेल्या उमेदवाराबद्दल भाजपला जागा सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी उमेदवार बदलला नसल्याने या जागेवरील विजयाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नेहमीच नाशिक दौरा करीत आहेत.

गोडसे यांच्या विजयासाठी महायुतीने सर्वच फलटण आता मैदानात उतरवली आहे. त्यासाठीच बुधवारी पीएम मोदी यांची सभा पार पडली. या सभेला मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे नाशिकमधील वातावरण काहीसे मोदीमय झाल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी मोदींनी त्यांच्या भाषणातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याची घोषणा केली. त्यामुळे कांद्याला भाव मिळत नसल्याने चिडलेल्या शेतकऱ्यांना काहीशी मदत होणार आहे.

त्यासोबतच मोदींच्या या सभेने जमलेले श्रोतेगण खुश झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात सभेला हजर असेलेले मतदार गोडसे यांच्या पाठीशी उभे राहणार का ? सभेला झालेली मोठी गर्दी ही मतात रूपांतरीत होणार का? हे समजण्यासाठी मतमोजणीची वाट पाहवी लागणार आहे.

दोनदा विजय मिळवणाऱ्या खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठी पीएम नरेंद्र मोदींची ही सभा मदतगार ठरेल, असेच वातावरण सर्वत्र पाहावयास मिळत असले तरी, आता सर्वांना नाशिकमध्ये पीएम नरेंद्र मोदींची झालेली सभा हेमंत गोडसेंना तारणार का ? याची उत्सुकता लागली असून हे समजण्यासाठी सर्वांना ४ जूनची वाट पहावी लागणार आहे.

SCROLL FOR NEXT