Prashant Jagtap 
विश्लेषण

Prashant Jagtap: महापालिकेची धुरा स्थानिक नेत्यांकडंच! मग प्रशांत जगतापांना अपमानित करुन राष्ट्रवादीनं नेमकं काय साधलं?

Prashant Jagtap Resign: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नुकताच आपल्या पदाचा तसंच राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.

Amit Ujagare

Prashant Jagtap Resign: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नुकताच आपल्या पदाचा तसंच राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. हा राजीनामा देण्यामागची पार्श्वभूमी म्हणजे पुणे महापालिकेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार ही आहे. जर हे एकत्र येणार असतील तर आपण पक्षात राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जाहीर करुन प्रशांत जगताप यांनी आज त्यावर अंमल केला. पण राष्ट्रवादीचा राजीनामा देण्यापूर्वी प्रशांत जगताप यांना राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांकडून अपमानित व्हावं लागलं. २६ वर्षांपासून शरद पवारांच्यासोबत असलेल्या नेत्यानं फक्त नाराजी व्यक्त केल्यामुळं अपमानित होऊन बाहेर पडायला लागलं याची चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय सामाजिक वर्तुळात सुरु आहे. पण हे करुन राष्ट्रवादी काँग्रेसनं नेमकं काय साधलं? असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.

अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी आपल्या ४० आमदारांना घेऊन सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेसोबत घरोबा केला. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आदी लोकांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. यानंतर पहिल्या फळीतले सर्व नेते गेल्यानं शरद पवारांसोबत जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, फौजिया खान, अमोल कोल्हे असे काही मोजकेच नेते राहिले. तसंच काही स्थानिक नेत्यांनीही या अडचणीच्या काळात शरद पवारांची साथ सोडली नाही. त्यात पुण्यातून प्रशांत जगताप यांचंही नाव घेता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून गेल्या २६ वर्षांपासून ते पक्षात होते. पुण्याचे महापौरही झाले. राष्ट्रवादीची फूट झाली तेव्हा पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष होते, नंतर शरद पवारांच्या पक्षाचेही शहराध्यक्ष म्हणूनच त्यांनी काम पाहिलं. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून त्यांना १ लाख २७ हजार ६६८ मतदारांनी मतदान केलं. अजित पवारांच्या वेगळ्या पक्षाविरोधात या मतदारांनी आपल्याला मतदान केलं. त्यामुळं त्यांची आपण फसवणूक कशी करणार? असं केलं तर तो द्रोह ठरेल असं प्रशांत जगताप यांचं म्हणणं आहे. याचं कारण म्हणजे पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची आणि यासंदर्भात प्राथमिक स्तरावर बोलणी सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. ही चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीही नाकारलेली नाही. उलट या युतीसाठी त्या उत्साहीच आहेत, या निर्णयासाठी त्यांनी पत्रकार परिषदांमध्ये कायमच शरद पवार हेच आमचे सर्वोच्च नेते असून त्यांच्या शब्दापलिकडे आम्ही नाही अशी भूमिका मांडली आहे.

"आज भूमितीय वेगाने वाढत चाललेल्या बहुसंख्याकवाद, धार्मिक उन्माद आणि द्वेषाच्या राजकारणाला माझ्या गणितात अजिबात जागा नाही," हाच आपल्या निर्णयातील प्रमुख गाभा असल्याचंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. म्हणजेच अजित पवारांचं भाजपसोबत जाणं आपल्याला मान्य नाही ही विचारांची लढाई आहे, असं ते सांगतात. त्यामुळं याचसाठी ज्या अजित पवारांच्या पक्षाविरोधात आपण विधानसभा निवडणूक लढलो आणि त्यासाठी जनतेनं लाखभर मत आपल्या पारड्यात टाकली. त्यामुळं त्याच अजित पवारांसोबत युती आपल्याकडून होणार नाही असा पवित्रा प्रशांत जगताप यांनी घेतला. याबाबतची नाराजी त्यांनी जाहीररित्या व्यक्तही केली, आपलं म्हणणं ऐकलं जाणार नाही याची कदाचित खात्री असल्यामुळेच जर ही युती झाली तर आपण पक्षातून बाहेर पडू असा इशाराही त्यांनी दिला.

शहराध्यक्ष म्हणूनही शहरातील इतर मतदारांच्या मतालाही नाकारल्याचं ठरु शकतं. त्यानंतर आज बुधवारी पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रशांत जगतापांची नाराजी दूर झाली का? हा प्रश्न विचारताच आपण त्यांच्याशी सहा तास चर्चा केल्याचं सुळेंनी सांगितलं. तसंच काहीसं संतापूनच त्यांनी एक विधान केलं, "खरं सांगू का हा नाराजी वैगरे शब्द आहे ना हा घरी वापरायचा असतो" याचा अर्थ असा होतो की, नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी आपलं म्हणणं मांडायचंच नाही. पण मग २६ वर्षे एखाद्या कार्यकर्त्यानं जर पक्षालाच घर मानून पक्षाला पुढे नेण्याचं काम केलं असेल तर त्यानं कुठल्या घरी नाराजी व्यक्त करायची? एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये युती-आघाडीचे निर्णय स्थानिक नेत्यांवरच आम्ही सोपवलं असं माध्यमांसमोर सांगायचं आणि दुसरीकडं त्याच स्थानिक नेत्यांना मात्र अपमानित करुन घऱचा रस्ता धरायला भाग पाडायचं हे कसलं राजकारण आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे?

तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विरोध केला म्हणून या पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रशांत जगताप यांना सुनावलं. "अजितदादांच्या पुण्याईने विविध पदांवर पुण्यात शेखी मिरवणाऱ्या पुण्याच्या माजी महापौराला कोअर कमिटी व ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाने चांगलाच जुलाब लागलाय. मागच्या काळात राजकीय संन्यास घेणार, राजीनामा देणार अशा वल्गना करत निष्ठावंत वगैरे बिरुदावली चढवत भावी खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या उपटसुंभाचा पीळ स्वभावाप्रमाणे कायम राहणार यात शंका नाही. खरंच पुण्यात स्वतःच अस्तित्व दाखवायची खुमखुमी असेल तर स्वत:चा एखादा पक्ष काढ की बाबा, अशा शब्दांत मिटकरी यांनी जगताप यांच्यावर अपमानास्पद शब्दांत टीका केली.

एकूणच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रशांत जगताप यांना अशा प्रकारे अपमानित करुन नेमकं काय साधलं? हा सवाल उपस्थित होत आहे. अजित पवारांच्या पक्षाला यानं काहीही फरक पडणार नसला तरी शरद पवारांच्या पक्षासाठी मात्र हा मोठा फटका ठरू शकतो. कारण पुण्याच्या पूर्व भागातील हडपसर मतदारसंघात शरद पवारांना मानणारा मतदार मोठा आहे. याच मतदारसंघाचा अमोल कोल्हे या शरद पवारांसोबत राहिलेल्या शिलेदाराला खासदार म्हणून निवडून येण्यात मोठा वाटा आहे. त्यामुळं अनेक वर्षे या भागातून राष्ट्रवादीची ताकद वाढवणाऱ्या प्रशांत जगताप यांचं पक्षातून बाहेर पडणं हे शरद पवारांच्या पक्षासाठी मोठं नुकसानकारक ठरु शकतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT