Shriram Patil-Raksha Khadse Sarkarnama
विश्लेषण

Raver Lok Sabha : भाजपला एकतर्फी वाटणारे रावेर श्रीराम पाटलांच्या झंझावातामुळे रंगतदार बनले

Vijaykumar Dudhale

Jalgaon, 14 May : रावेर लोकसभा मतदारसंघात गेल्या २०१९ मधील निवडणुकीच्या तुलनेत २०२४ च्या निवडणुकीत एकूण मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. विशेषतः भाजपचे वरिष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर आणि भुसावळमध्ये सरासरी ६० टक्क्यांपर्यंतच मतदान झाले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसेंची भाजपमधील एन्ट्री फायदेशीर ठरणार असली तरी मराठा, दलित, मुस्लिम मतांचे समीकरण आणि ॲन्टी इन्कम्बन्सी हे भाजपच्या उमेदवार रक्षा खडसेंसाठी अडचणीची ठरू शकते. त्या तुलनेत शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी स्थानिक प्रश्नांना हात घालून निवडणूक अधिक रंगतदार केली आहे, त्यामुळे २०१४ व २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे आमूक एकाच्या विजयाची खात्री देता येत नाही.

रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Loksabha Constituency ) विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील (shriram Patil) यांनी आव्हान दिले. वंचितचे संजय ब्राम्हणे हे एक उमेदवार होते. मात्र, रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांच्यात सरळ लढत झाल्याचे दिसून आले. खडसे यांच्या घरवापसीमुळे रक्षा खडसे यांना फायदा होणार असला तरी पाटील यांनी उभा केलेले आव्हान दुर्लक्षून चालणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रावेर लोकसभा मदारसंघावर गेल्या तीस वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. गेली दोन निवडणुकांमध्ये म्हणजेच २०१४ व २०१९ मध्ये रक्षा खडसे ह्या तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. पुढे एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत भाजपला जय श्रीराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडवर खडसेंनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

भारतीय जनता पक्षाने अंतर्गत विरोध असूनही रक्षा खडसे यांना २०२४ मध्ये पुन्हा उमेदवारी दिली. त्यानंतर खडसेंनी भाजपत येण्याचे जाहीर करून रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले. दुसरीकडे, शरद पवार यांनीही नव्या दमाचे उद्योजक श्रीराम पाटील यांना रक्षा खडसेंच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली. भाजपकडून मोदींच्या योजनांवर प्रचारात भर देण्यात आला. श्रीराम पाटील यांनी स्थानिक मुद्दे, केळी उत्पादकांच्या समस्या, रोजगार, बेरोजगारी यांसारखे जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे अधिक प्रभावीपणे मांडले. त्यातून त्यांनी रक्षा खडसे यांच्यासमोर आव्हान उभे केले. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात प्रचंड चुरशीची झाल्याचे दिसून आले.

रावेरमध्ये मराठा, मुस्लिम, दलित मतांचे समीकरण आणि काही प्रमाणात ॲन्टी इन्कम्बन्सी भाजपसाठी अडचणीची ठरू शकते. पण जिल्ह्यातील प्रभावी असलेले लेवा पाटीदार, गुजर, ओबीसी, आदिवासी-कोळी आणि इतर जात समूह कोणाकडे झुकतात, यावर रावेरच्या खासदाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे. खडसेंचे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटील हेही अंतिम टप्प्यात रक्षा खडसेंच्या प्रचारात उतरले. तसेच, एकनाथ खडसेंची घरवापसी रक्षा खडसेंसाठी जमेची ठरल्याचे दिसून आले.

रावेर लोकसभा मतदारसंघातील मलकापूर, रावेर आणि चोपडा या विधानसभा मतदारसंघात ६० टक्क्यांपेक्षा जादा मतदान झाले आहे. मात्र, जामनेर आणि भुसावळमध्ये कमी झालेला टक्का कोणाला अडचणीत आणणार, हेही पाहावे लागणार आहे. विशेष म्हणजे सहा मतदासंघापैकी फक्त दोनच ठिकाणी भाजपचे आमदार आहे, इतर ठिकाणी दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळे रावेरमध्ये मागील दोन निवडणुकींप्रमाणे निकाल लागेल, याची शाश्वती नाही.

रावेर मतदारसंघ २०१९ आणि २०२४ चे मतदान

विधानसभा क्षेत्र--- २०१९----२०२४ (५ पर्यंतचे)

चोपडा------- ६४.७८-----५५.९१

रावेर--------६६.७४------५६.८५

भुसावळ-----५५.४३------५३.२०

जामनेर------६४.२३------५३.७०

मुक्ताईनगर----६६.८३-----५४.६३

मलकापूर----६३.४२------५९.१०

एकूण -------६३.५७ .......५५.३६

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT