Pune, 13 May : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चुरशीची लढाई होत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांसोबत राहिलेले शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी कोल्हे यांची खिंड एकाकीपणे लढवली आहे. आता त्याच अशोक पवार यांनी मतदानाला दीड तास बाकी असताना कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे. अशोक पवारांनी ही सूचना शेवटच्या टप्प्यात मतदान आले असताना का केली असावी, अशी चर्चा रंगली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात सकाळी सातपासून शांततेत मतदान सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत 43.89 टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदान हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात झाले असून ते 53.71टक्के होते. त्या खालोखाल जुन्नर मतदारसंघात 47.31 टक्के, खेड मतदारसंघात 48.07 टक्के, शिरूरमध्ये 41.16 टक्के, भोसरी 42.24 टक्के, तर हडपसर मध्ये 38.04 टक्के मतदान झाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency) सर्वत्र शांततेत मतदान होत असताना शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी मात्र मतदानाला दीड तासाचा कालावधी शिल्लक असताना कार्यकर्त्यांना दक्षतेची सूचना केली आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना : मतदान प्रक्रियेचा शेवटचा तास-दीड तास बाकी आहे...सतर्क रहा!! या वेळेत कोणताही गैरप्रकार होणार नाही, यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अतिशय काळजी घ्यावी.. विशेषतः पुढील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे.
१) प्रत्येक बूथवरील प्रत्येक पोलिंग एजंट व कार्यकर्त्यांनी यापुढे प्रत्येक मतदाराचे ओळखपत्र स्वतः तपासावे. ज्याचे ओळखपत्र आहे, तीच व्यक्ती मतदान करतेय की नाही, याची खात्री करावी.
२) कोणत्याही प्रकारची गडबड वाटली तर तातडीने पावले उचलून योग्य ती कार्यवाही करा.
३) आपल्या हक्काच्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्वांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न करावेत.
४) मतदान प्रक्रिया संपल्यानंतर EVM मशीन सील होईपर्यंत पोलिंग एजंट व बूथ एजंट यांनी अतिशय दक्ष राहावे.
दरम्यान, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. हा मतदार संघ आढळराव पाटील यांचे होम ग्राउंड असून येथील आमदार राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. जुन्नर हा अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांचा मतदारसंघ असून अमोल कोल्हे यांचे गावही याच तालुक्यात येते.
शहरी भाग पिछाडीवर
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागात चांगले मतदान होत असताना शहरी भाग असलेल्या भोसरी आणि हडपसर भागात दुपारी तीनपर्यंंत मात्र जेमतेम मतदान होताना दिसत आहे. याच मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंघ असूनसुद्धा जेवढ्या प्रमाणात मतदानाचा टक्का व्हायला पाहिजे होता, तेवढा होताना दिसत नाही. भोसरीमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे असून हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे हे आमदार आहेत. सायंकाळी पाचनंतर भोसरीत टक्का वाढला, मात्र, हडपसरमध्ये कमीच मतदान झाल्याचे दिसून आले
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.