Eknath Shinde, Ravindra Waikar, Ajit pawar Sarkarnama
विश्लेषण

Ravindra Waikar News : स्टेटमेंट वायकरांचं, लढाई 'परसेप्शन'ची, धक्के एकनाथ शिंदे, अजितदादांना ?

अय्यूब कादरी

Election News : शिंदे गट शिवसेनेतून बाहेर का पडला, याचे परस्परविरोधी परसेप्सन ठाकरे गट आणि शिंदे गटाने तयार केले आहे. ती लढाई अद्यापही सुरूच आहे. अशातच शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यामुळे परसेप्शनच्या या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे. तसा तो अजितदादा पवार यांनाही बसला आहे. चौकशीच्या त्रासामुळेच शिंदे गटात गेल्याचे वायकर म्हणाले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे (MVA) सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये (BJP) राज्यापासून दिल्लीपर्यंत अस्वस्थता पसरली होती. अखेर अडीच वर्षांनंतर ते सरकार कोसळले. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह शिवसेनेतून (Shivsena) फुटले आणि भाजपला जाऊन मिळाले, मुख्यमंत्री बनले.

त्याच्या एक वर्षानंतर अजित पवारही राष्ट्रवादी काँग्रेसमधून (Ncp) 40 आमदारांसह फुटून भाजपला मिळाले. हे दोन्ही नेते का फुटले, याच्या कारणांची अजूनही चर्चा होतच असते. दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आजही करत असतात. (Ravindra Waikar News)

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांभोवती चौकशीचा फास आवळण्यात आला होता. तशा बातम्याही वेळोवेळी बाहेर आल्या होत्या. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर पुराव्यांसह आरोप केले होते.

त्यापैकी जे नेते शिंदे गटात, अजितदादा गटात गेले किंवा भाजपमध्ये गेले, त्यांच्यामागचा चौकशीचा ससेमिरा थांबला आहे. जे गेले नाहीत, त्यांची चौकशी सुरू आहे. काही जणांना कारागृहात जावे लागले आहे.

शिंदे गट आणि अजितदादा गट ईडीच्या कारवायांच्या भीतीपोटीच भाजपसोबत गेले आहेत, असे परसेप्शन तयार झाले आहे. लोकांचाही त्यावर चांगलाच विश्वास बसला आहे. हे परसेप्शन तोडण्यासाठी शिंदे गट, अजितदादा गटाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, त्यांनी हिंदुत्व सोडले, असे शिंदे गटाकडून केले जाणारे आरोप त्याचाच एक भाग आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला 50 खोके देण्यात आले आहेत, शिवसेनेशी त्यांनी गद्दारी केली आहे, हे परसेप्शनही समाजात घट्ट रुजले आहे. ते तोडण्यासाठी शिंदे गटाचे नेते, प्रवक्त्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर वेळोवेळी जहाल टीका करण्यात आली. अजितदादा गटाच्या बाबतीतही असेच झाले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वयाची 83 वर्षे पूर्ण केली आहेत. आतापर्यंत सत्तेची सर्व पदे देऊनही अजित पवार यांनी त्यांची साथ सोडली, चूक अजितदादांचीच असे परसेप्शन तयार झाले आहे. ते तोडण्यासाठी अजितदादांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत.

वय झाले आता बाजूला व्हावे, असे विधान त्यांनी शरद पवार यांच्याबाबत केले होते. त्यामुळे अजितदादांचे नुकसानच अधिक झाले. शिंदे गट आणि अजितदादा गट त्यांच्याबाबत निर्माण झालेले परसेप्शन तोडण्यासाठी अजूनही झगडत आहेत.

आता शिंदे आणि अजितदादांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा धक्का दिला आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी. वायकर हे जोगेश्वरी पूर्वचे आमदार आहेत.

शिवसेनेत फूट पडली त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. ते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्याभोवती फास आवळला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच ते शिंदे गटात दाखल झाले. त्यावेळी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती.

शिंदे गटात दाखल होताच त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. आता वायकर यांनी धक्कादायक विधान केले आहे. माझ्यासमोर दोन पर्याय होते, एक शिंदे गटात जाण्याचा आणि दुसरा कारागृहात जाण्याचा. त्यामुळे मला शिंदे गटाचा पर्याय निवडावा लागला, असे रवींद्र वायकर म्हणाले आहेत. वायकर यांची लढत ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्याशी होत आहे.

''मी भावूक आहे, माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले त्यावेळी मी खूप धावपळ केली. मी जाळ्यात अडकलो होतो. त्यामुळे मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. माझ्यासमोर आणखी एक पर्याय होता (कारागृहात जाण्याचा). मात्र माझ्या सहकाऱ्यांनी तो पर्याय निवडण्यासाठी विरोध दर्शवला. गेल्या 50 वर्षांपासून माझे 'मातोश्री'शी संबंध होते.

कुटुंबातील एखादी व्यक्ती दुरावली की जितका त्रास होतो तसा त्रास मला 'मातोश्री'पासून दूर झाल्यामुळे होत आहे. नियती ज्या वाटेवर नेत आहे, मी तिकडेच जात आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नव्हती, मात्र पक्षाने आदेश दिल्यामुळे मी निवडणूक लढवत आहे. आता दिल्लीला जाण्याची माझी मानसिक तयारी झाली आहे,'' असे रवींद्र वायकर म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार असताना रवींद्र वायकर असे का बोलले असतील, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. बोलताना त्यांनी आधीच सांगून टाकले होते की मी भावूक आहे. भावनेच्या भरात ते सत्य बोलून गेले असतील का?

त्यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादांची परसेप्शनची लढाई कमकुवत तर होणारच आहे, शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली म्हणत आहेत, त्यालाही उत्तर मिळणार आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी आहे, चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे शिंदे गट फुटला आहे, असा युक्तिवाद उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते आधीपासूनच करत आहेत. वायकरांच्या वक्तव्यानंतर हा युक्तिवाद आणखी जोरकसपणे केला जाईल.

वायकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी, यासाठीही ठाकरे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत, तशी नोटीस वायकर यांना बाजवण्यात आली आहे. परसेप्शनच्या लढाईत वायकरांमुळे बसलेल्या धक्क्यावर शिंदे, अजितदादा काय उपाय करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT