Dhairyasheel Mohite Patil-Uttam Jankar-Ranjitshinh Naik Nimbalkar Sarkarnama
विश्लेषण

Mohite Patil-Jankar Yuti : माळशिरसमधील घटलेल्या लीडने मोहिते पाटील-जानकर युतीचे वाढविले टेन्शन...

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 June : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे एक लाख वीस हजार मतांनी निवडून आले असले तरी त्यांच्या हक्काच्या माळशिरस तालुक्यात घटलेले मताधिक्क्य हे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर युतीचे टेन्शन वाढविणारे आहे. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 64 हजार 145 मते पडली आहेत. निंबाळकरांना मिळालेली मते आणि घटलेले मताधिक्क्य आगामी विधानसभा निवडणूक मोहिते पाटील आणि जानकर यांच्यासाठी सोपी नसल्याचे दर्शवित आहे

लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे सुमारे सव्वा लाख मतांच्या फरकाने खासदार झाले आहेत. विशेषतः कट्टर राजकीय विरोधक शिंदे बंधूंच्या मतदासंघात मिळालेले मताधिक्क्य हे मोहिते पाटील यांना सुखावणारे असले तरी माळशिरसमधील घटलेली मते आणि मताधिक्क्य तो आनंद हिरावून घेणारे आहे. त्यामुळे हक्काच्या माळशिरस (Malshiras) तालुक्यातील घटलेले मतदान हे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने धाकधूक वाढविणारे ठरले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरसमध्ये एक लाख 43 हजार 22 मते पडली होती, तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांना 42 हजार 395 मते मिळाली होती. आता खुद्द मोहिते पाटील उमेदवार असतानाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरसमधून 64 हजार 145 मते घेतली आहेत. माळशिरसमधून निंबाळकर यांनी घेतलेली ही मते जानकर-मोहिते पाटील युतीसाठी धक्कादायक आहे. उत्तम जानकर सोबत येऊनही निंबाळकरांना मिळालेली मते पाहता ते मोहिते पाटीलविरोधातील मतदान कायम असल्याचे स्पष्ट हेाते.

माळशिरसमधून धैर्यशील मोहिते पाटील यांना एक लाख 34 हजार 279 मध्ये पडले आहेत. निंबाळकर यांना 64 हजार 145 मते पडली आहेत. मोहिते पाटील स्वतः उमेदवार असूनही बालेकिल्ल्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे उमेदवार निंबाळकर यांच्यापेक्षा धैर्यशील मोहिते पाटील यांना या निवडणुकीत 8743 मते कमी पडली आहेत. तालुक्यातील उमेदवार असूनही मोहिते पाटलांना मते देताना माळशिरसकरांनी हात आखडता घेतल्याचे स्पष्ट हेाते.

मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोहिते पाटील यांनी माळशिरस मधून एक लाख 627 चे मताधिक्क्य दिले होते. मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत जानकर आणि मोहिते पाटील एकत्र होते. जानकरांनीही आपली ताकद मोहिते पाटील यांच्या पाठीशी लावली होती, तरीही मोहिते पाटील यांना 70 हजार 134 मतांची आघाडी माळशिरमसधून घेता आली आहे. म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत ही आघाडी तब्बल 30 हजार 493 मतांनी घटली आहे.

लोकसभेला मोहिते पाटील यांना मदत करायची, तर विधानसभेला माळशिरसमधून उत्तम जानकर यांना मदत करायची असं या दोन्ही गटात ठरल्याचे मानले जत आहे. त्यानुसार माळशिरसमधून विधानसभेला उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांच्या मर्जीतील राम सातपुते पुन्हा एकदा माळशिरसमधून निवडणूक लढवू शकतात. भाजप उमेदवाराला माळशिरसमध्ये मिळालेली मते भाजपला विधानसभेसाठी टॉनिक ठरण्याची शक्यता आहे. राम सातपुते यांनी माळशिरसमध्ये केलेल्या कामाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे विधानसभेला सातपुते पुन्हा उमेदवार असतील तर माळशिरसमध्ये पुन्हा एकदा टफ फाईट बघायला मिळू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT