Sambhaji Bhide Sarkarnama
विश्लेषण

Sambhaji Bhide: 'आधी कुंकू लाव..., 15 ऑगस्ट काळा दिवस...'; वादग्रस्त वक्तव्यांसाठी भिडेंना जणू मुभाच !

अय्यूब कादरी

Political News: आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी साम वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना गेल्यावर्षी केले होते. त्यावेळी त्यांच्यावर विविध स्तरांतून टीका झाली होती. महिला आयोगाने याबाबत त्यांना दोन नोटिशी बजावल्या होत्या.

मात्र, ती केवळ औपचारिकताच ठरली. त्यानंतरही भिडे यांनी देशाचा स्वातंत्र्यलढा, थोर व्यक्तींबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्ये केली. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. याद्वारे सरकार भिडे यांच्यासोबत आहे, असाच संदेश देण्यात आला.

पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान आहे, याची जाणीव संभाजी भिडे यांनी त्या महिला पत्रकाराशी बोलताना करून दिली होती. महिलांनी टिकली लावावी की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. मुद्दा धार्मिक असेल तर त्याबाबतही स्वातंत्र्य असायला हवे, पण सर्वच धर्मांतील कट्टर लोक हे मान्य करत नाहीत. भिडे यांनी एक नव्हे तर अशी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भिडे यांनी मंत्रालयात जाऊन भेट घेतली होती. भेट घेऊन परत येताना साम वाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांना प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर भिडे यांनी ते विधान केले होते. आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाही. कुंकू लावून या मग बोलेन, असे भिडे म्हणाले होते.

हे बोलताना त्यांनी विधवांना समाजात दुय्यम स्थान असल्याचे अधोरेखित केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने दखल घेतली होती. भूमिका मांडण्यासाठी त्यांना दोन नोटिशी बजावण्यात आल्या. उत्तर न दिल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, पुढील कार्यवाही काय झाली, हे समोर आले नाही.

त्यानंतरही भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच राहिली. त्यापूर्वी 2008 मध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि अन्य काही संघटनांनी जोधा अकबर या चित्रपटाला विरोध केला होता. हा चित्रपट हिंदूविरोधी आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावेळी सांगलीत दंगल उसळली होती. याप्रकरणी भिडे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाले होते. नंतर ते न्यायालयाने रद्द केले. भगवंताच्या कृपेने मला एक कोय मिळाली होती. त्यापासून मी माझ्या बागेत झाड लावले.

त्या झाडाचे आंबे खाल्ले की लग्नानंतर अनेक वर्षे मुले न होणाऱ्यांना मुले होतील, हे भिडे यांचे सर्वात वादग्रस्त वक्तव्य ठरले. आतापर्यंत 180 जोडप्यांनी या झाडाचे आंबे खाल्ले आहेत, त्यापैकी दीडशे जोडप्यांना मुले झाली आहेत. नपुंसकत्व, वंध्यत्वावर हा आंबा उपाय आहे, असेही ते म्हणाले, होते.

एक जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीशीही त्यांचे नाव जोडले गेले. भारत हा निर्लज्ज माणसांचा देश आहे, कोरोना थोतांड आहे, अशीही बाष्कळ विधाने त्यांनी केली. महात्मा गांधी यांच्याबद्दलही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनाला (15 ऑगस्ट) भिडे यांनी काळा दिवस म्हटले होते. राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीतावरही त्यांनी आक्षेप घेतला होता.

त्यांच्या या आक्षेपाला काही जणांकडून मोठी दाद मिळाली होती, हे भिडे यांच्या वक्तव्यापेक्षा गंभीर म्हणावे लागेल. यासह अलीकडच्या काळात त्यांनी शिर्डीचे साईबाबा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयीही आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. यापैकी एकाही प्रकरणात सरकारने त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलली नाहीत. सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी, समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी सरकारचा त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा आहे की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे.

Edited By - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT