Sambhaji Nilngekar, Amit deshmukh, Abhay Salunke  Sarkarnama
विश्लेषण

Nilanga Assembly Election Result 2024 : निलंगा मतदारसंघात पुन्हा 'निलंगेकर'; मताधिक्य घसरल्याने भाजपला करावे लागणार आत्मपरीक्षण

Political News : भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे चौथ्यांदा विजयी झाले मात्र काँग्रेसला पडलेले मताधिक्य पाहता भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. खरी तुल्यबळ लढत सरळ भाजपविरुद्ध काँग्रेस अशीच या मतदार संघात झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

राम काळगे

Latur News : निलंगा विधानसभा मतदारसंघातून सतत 'निलंगेकर विरुद्ध निलंगेकर' अशी होणारी लढत यावेळी मात्र निलंगेकर घराण्याला वगळून पहिल्यांदा काँग्रेसने उमेदवारी दिल्याने या मतदार संघात 'देशमुख विरुद्ध निलंगेकर' असा प्रचार झाला असला तरीही मतदारांनी पुन्हा निलंगेकरांना पसंदी दिली आहे. भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे चौथ्यांदा विजयी झाले मात्र काँग्रेसला पडलेले मताधिक्य पाहता भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. खरी तुल्यबळ लढत सरळ भाजपविरुद्ध काँग्रेस अशीच या मतदार संघात झाली आहे.

निलंगा मतदारसंघात विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilngekar) यांनी सुरुवातीच्या फेरीपासून आघाडी घेतली होती. अपेक्षेप्रमाणे देवणी व शिरुर-अनंतपाळ तालुक्यातून संभाजीराव पाटील निलंगेकर यांना मताधिक्य मिळत गेले. निलंगा तालुक्यात मात्र अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. तरीही तीन फेऱ्या वगळता बाकी सर्व फेऱ्यांमध्ये संभाजीरावांना लीड मिळत गेली.

निलंगा विधानसभा मतदारसंघात केलेली विकासकामे, जन सन्मान व आशिर्वाद पदयात्रेतून थेट जनतेशी साधलेला संवाद आणि भाजपचे (Bjp) युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी निवडणूकीच्या दरम्यान घेतलेले परिश्रम या बळावर त्यांनी विजयी खेचून आणला तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने अशोकराव पाटील निलंगेकर यांना डावलून अभय साळुंके यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत निलंगेकर नाराज त्यांनी निवडणूकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी थेट भाजपचा प्रचार केला.

त्याशिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्षानी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही तरीही काॅग्रेस उमेदवार अभय साळुंके यांना मतदान कमी होईल, असे वाटत असताना अनपेक्षितपणे त्यांनी 98 हजार 628 मते घेऊन चांगले आव्हान उभे केले. विजयी उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना 1 लाख 12 हजार 368 मते पडली. जवळपास 13 हजार 740 मताने संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विजय झाला.

औराद शहाजानी, निटूर, हलगरा या मोठ्या गावात भाजपला म्हणावे तसे मताधिक्य मिळाले नाही. त्याशिवाय देवणी व शिरुरअनंतपाळ तालुक्यातूनही फारसे मताधिक्य मिळाले नाही. निलंगा शहरातील स्थानिक उमेदवार म्हणून प्रचार केला गेला. मात्र, शहरातही मताधिक्य मिळण्याऐवजी कमी झाले आहे. निलंगा मतदारसंघात जवळपास तीन हजार पाचशे कोटीची विकासकामे केली. त्याशिवाय गेल्या तीन-चार महिन्यापासून थेट मतदार असे संपर्क जवळपास 100 गावात थेट पायी पदयात्रा काढून संभाजी पाटील यांनी संपर्क साधला होता.

चौथी टर्म असतानाही त्यांचा विजय झाला आहे. तरीही काँग्रेस उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले आहे. बाभळगावच्या देशमुखांनी निलंगातील निष्ठावंत काँग्रेसची फळी चांगलीच पोखरलेली दिसत आहे. आमदार निलंगेकर यांनी मागच्या दहा वर्षात निलंगा विधानसभा मतदारसंघाचा सर्वागिण विकास, 12 वर्षापासून बंद पडलेला अंबुलगा साखर कारखाना सुरू करुन शेतकऱ्यांना दिलेला दिलासा दिला.

निलंगा मतदारसंघात विक्रमी 96 हजार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला आहे. जन सन्मान पदयात्रेच्या माध्यमातून संभाजीराव निलंगेकर यांनी थेट जनतेमध्ये मिसळून साधलेला संवाद व अरविंद पाटील निलंगेकर यांचे नियोजन, जोरदार प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांची तगडी फळी यामुळे विजयश्री खेचण्यास मदत झाली तर काँग्रेसचे अभय साळुंके यांची कॉंग्रेस पक्षाने उशिरा जाहीर केलेली उमेदवारी त्यामुळे उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ कमी मिळाला होता.

त्याशिवाय अशोकराव पाटील निलंगेकर यांना उमेदवारी डावलल्याने निष्ठावंत निलंगेकर कार्यकर्त्यांनी प्रचाराकडे फिरवलेली पाठ व काही जणांनी भाजपच्या बाजूने प्रचार केला नाही. त्याशिवाय कॉंग्रेसची ऐनवेळी थंडावलेली बुथ यंत्रणा, कॉंग्रेस पक्षातील दुसर्‍या फळीतील काही नेत्यांनी विरोधात केलेला प्रचार, ओबीसी बहुल गावांमध्ये भाजपला मिळालेले मताधिक्य पाहता काँग्रेसचा पराभव झाला. नवखा उमेदवार असतानाही मोठे मताधिक्य मिळाले हे नाकारुन चालणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT