Balasaheb Thackeray and Uddhav Thackeray Sarkarnama Bureau
विश्लेषण

Shivsena Foundation Day 2024 : मुंबई, मराठवाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा, दरारा कायम

Sachin Waghmare

Shivsena Anniversary : नव्वदच्या दशकात प्रत्येक मराठी मनावर हिंदुत्वाचे मोठे गारुड होते. त्यामुळेच प्रत्येक जण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित झाला होता. त्या काळात आलेल्या बाळासाहेब नावाच्या वादळाने विरोधकांची नौका किनाऱ्यावर लावली. अनेक वर्षांपासून असलेले काँग्रेसचे बालेकिल्ले मात्र बाळासाहेबांच्या झंझावतापुढे सुपडासाफ झाले.

बाळासाहेबांनी 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण राज्याचा परिसर पिंजून काढला होता. त्याचा फायदा शिवसेना-भाजप युतीला झाला अन युतीचे सरकार पहिल्यांदा सत्तेत आले. त्यामुळे राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याकडेच होता. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा 'मातोश्री'वरून घेतला जात होता. त्यासोबतच केंद्रातील भाजप सरकारमध्ये शिवसेनाचा मोठा वाटा राहत होता. त्यामुळे मातोश्रीचा दरारा कायम होता.

2012 साली बाळासाहेबांचे निधन झाले. त्यानंतर सर्वांना वाटत होते की 'मातोश्री'चा दरारा कमी होईल. त्यानंतर पुढे उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर वर्चस्व कायम ठेवले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अचानक युती तोडली. त्यानंतर राज्यातील चारही पक्ष वेगवेगळे लढले. त्यावेळी पुन्हा राज्यात 63 जागा जिंकत शिवसेनेने सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ठेवल्या.

त्यानंतर सत्तेत येण्यासाठी भाजपला शिवसेनेसोबत तडजोड करावी लागली. त्यानंतर 2019 मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाली. मात्र, निवडणुकीनंतर भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दर्शवल्याने मतभेद झाले. त्यानंतर शिवसेनेने वेगळी चूल मांडत आघाडीसोबत जात मुख्यमंत्रिपद संभाळले. त्यामुळे सत्तेतील सहभाग यामुळे ही सर्व सत्ताकेंद्र 'मातोश्री'वरूनच संभाळली अन दरारा कायम ठेवला.

गेल्या दोन वर्षापूर्वी शिवसेनेत (Shivsena) पडलेली उभी फूट त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट यामुळे जून 2022 मध्ये उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 40 आमदार, 13 खासदार, नगरसेवक सोडून गेल्याने त्यांच्याकडे केवळ 15 आमदार व 5 खासदार उरले होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिले नसल्याच्या वावड्या उठवल्या होत्या. त्यामुळे मातोश्रीचा दबदबा कमी झाला अशी अफवा काही जणांनी पसरवली, मात्र ठाकरेंनी हार मानली नाही.

1990 च्या दशकात मराठवाड्यात शिवसेनेची मोठी क्रेझ होती. त्यामुळे एकेकाळी मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघावर भाजप-शिवसेनेचे प्रभुत्व होत. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, हिंगोलीत शिवसेनेचा दबदबा कायम होता. मराठवाडयात गद्दारी झाली. छत्रपती संभाजीनगरमधील पाच आमदार व हिंगोलीच्या खासदारांनी एकनाथ शिंदेसोबत जाणे पसंत केले. मात्र, मराठवाड्यात ठाकरे सोबत केलेली गद्दारी नागरिक सहन करीत नाहीत हे चित्र आहे, ते कायमच राहिले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव, परभणी व हिंगोली मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर, उर्वरित नांदेड, लातूर, जालना मतदारसंघात काँग्रेसने तर राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये विजय मिळवत भाजपचा सुपडासाफ केला. केवळ शिंदे गटाला छत्रपती संभाजीनगरची एक जागा जिंकत आली. मूळ पक्षाशी गद्दारी करणाऱ्या मंडळींना मतदारांनी घरी बसवले. विशेषतः लोकसभा निवडणुकीत आठ पैकी सात लोकसभा सात जागी विजय मिळवत उद्धव ठाकरेंने बाजी पालटावत मराठवाड्यात ठाकरेंचा दरारा कायम असल्याचे दाखवून दिले.

त्यासोबतच मुंबईतील बाल्लेकिल्ल्यात सहा जागापैकी चार जागा जिंकत महाविकास आघाडीने महायुतीला चारी मुंड्या चित केले. एका जागेवर ठाकरे गटाला केवळ 48 मताने पराभव स्वीकारावा लागला. अन्यथा था ठिकाणचे चित्र वेगळेच आले असते. महायुतीला केवळ दोन जागेवर विजय मिळवता आला.

उद्धव ठाकरेंच्या चालीपुढे शिंदे-फडणवीसांची दमछाक झाली. मुंबईतील 6 पैकी 4 जागांवर ठाकरेंनी ताकद दिलेले उमेदवार विजयी झाले. मुंबईसह राज्यातील बहुतांश मतदारसंघातही ठाकरेंचा डंका दिसला. ठाकरेंसोबत पवार आणि काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून ठाकरेंनी मुंबई शहरात दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कामाचा झपाटा दाखवून दिला. आजारी असतांनाही त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले. त्यांनी सोबत महाविकास आघाडीला हाताशी धरत लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवला. तीन महिन्यात प्रचाराची सूत्रे हातात घेत सभा गाजवल्या. त्यांच्या सभेला मिळणारा प्रतिसाद पाहून त्याचवेळी राज्यात महाविकास आघाडी (MVA) बाजी मारणार हे दिसत होते.

निवडणुकीत मिळणारा प्रतिसाद सत्यात उतरला आणि महाविकास आघाडीने मोठी बाजी मारली. या विजयाचे शिल्पकार उद्धव ठाकरे ठरले. राज्यात काँग्रेसला 13, शिवसेना ठाकरे गटाला 9 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाला 8 जागा अशा महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा मिळाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच खासदारांनी विजयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आनंदोत्सव साजरा केला.

निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीच्या सर्वच विजयी खासदारासह सर्वच पक्षाच्या दिगग्ज नेत्यांनी 'मातोश्री'वर रांग लावली होती. हे राज्यातील बदलले चित्र पाहता मातोश्रीचा दरारा संपला म्हणणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे दृश्य होते. त्यातून कोणी काहीही सांगत असले तरी 'मातोश्री'चा आजही कायम असल्याचे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले.

SCROLL FOR NEXT