Amit Shah, Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray On Amit Shah: ठाकरेच ते..! अमित शाह यांनी महाराष्ट्रात येऊन 'औरंगजेब फॅन क्लब'चे अध्यक्ष म्हटल्यावर थोडंच शांत बसणार...

Shivsena Vs Bjp Political News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुण्यात केली होती. उद्धव ठाकरे यांनाही पुण्यातूनच या टीकेची परतफेड करत शाह यांचा उल्लेख अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज असा केला आहे.

अय्यूब कादरी

Shivsena News : उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुण्यात केली होती. उद्धव ठाकरे यांनाही पुण्यातूनच या टीकेची परतफेड करत अमित शाहा यांचा उल्लेख अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज असा केला आहे.

अफगाणिस्तानच्या अहमदशाह अब्दालीने 1747 ते 1767 दरम्यान भारतावर आठ वेळा आक्रमण केले होते. पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अमित शाह हे अमहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत, अशी टीका केली आहे. अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्रावर आक्रमण करत आहेत, असा हल्ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. (Amit Shah Vs Uddhav Thackeray News )

शिवसैनिकांना आक्रमकता आवडते. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव तसा मवाळच, मात्र शिवसेना (Shivsena) फुटल्यानंतर त्यांच्या आवाजाला, वक्तृत्वाला धार चढली आहे. गेल्या महिन्यात पुण्यात भाजपचे अधिवेशन झाले होते. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असा केला होता. उद्धव ठाकरे यांनी त्याची परतफेड केली आहे.

शहीद झालेल्या औरंगजेबचा आम्हाला अभिमान आहे, अशा आशयाचे विधान उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी केले होते. भाजपच्या आयटी सेलने त्याचा भलताच अर्थ काढत तसे व्हिडीओ व्हायरल केले होते. ते व्हिडीओ अद्यापही व्हयरल केले जात आहेत. अमित शाह यांचाही उद्देश तसाच असावा किंवा लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची मते उद्धव ठाकरे यांना मिळाली, असा समज झाल्याने ते तसे बोलले असतील.

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरममध्ये 2018 च्या जुलै महिन्यात अतिरेक्यांनी भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या औरंगजेब यांचे अपहरण करून गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता. ते रमजान ईदसाठी गावी निघाले होते. हिज्बुलचा अतिरेकी समीर याचा 30 एप्रिल 2018 रोजी मेजर रोहित शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खात्मा केला होता. त्या पथकात औरंगजेब यांचा समावेश होता. त्यामुळे अतिरेक्यांनी औरंगजेब यांचे अपहरण करून त्यांचा खून केला होता. या शहीद औरंगजेबचा आम्हाला अभिमान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

अमित शाह यांनी केलेल्या टीकेची परतफेड उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अमित शाह हे अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. शाहिस्तेखान हुशार होता, त्याचे बोटावर निभावले, तो पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. पण हे (अमित शाह) परत आले, महाराष्ट्राने दिलेल्या फटक्यांचे वळ कुठे कुठे उठले आहेत, हे पाहण्यासाठी ते परत आले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तो अहमदशाह होता आणि हे अमित शाह आहेत.

पाकिस्तानला जाऊन नवाझ शरीफ यांचा केक खाणाऱ्यांकडून आम्ही हिंदुत्व शिकायचे का, अशी टीकाही त्यांनी केली. पुण्याच्या अधिवेशनात अमित शाह यांच्यासह भाजपचे अन्य नेते उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर तुटून पडले होते. त्या टीकेला शरद पवार यांच्या पक्षाने लागलीच प्रत्युत्तर दिले होते. उद्धव ठाकरे यांनी शिवसंकल्प मेळाव्याचे निमित्त साधून हिशेब चुकता केला.

लोकसभा निवडणुकासाठी भाजपने महाराष्ट्रात मिशन 45 निश्चित केले होते, म्हणजे भाजपला राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकायच्या होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक पक्ष फोडल्यामुळे भाजप मिशन 45 बाबत निश्चिंत होता. आपले मिशन 'फेल' होऊ होऊ नये, यासाठी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही उमेदवार ठरवण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला होता. त्यातून शिंदे यांना जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागला होता, काही इच्छुकांचे पत्ते कट करावे लागले होते.

इतके सारे करूनही भाजपला उद्दीष्ट गाठता आले नाही. आमदार, खासदार सोबत नसताना, पक्षाचे नाव, चिन्ह नसतानाही उद्धव ठाकरे यांनी चांगले यश मिळवले. ठाकरे यांच्या शिवसेनाला नऊ आणि महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. भाजपलाही नऊ जागा मिळाल्या, महायुतीला 17 जागा मिळाल्या.

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ्या संख्येने मतदान केल्याची चर्चा झाली. दलित आणि मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या मागे एकवटला होता, असे निष्कर्ष निकालानंतर काढले गेले. भाजपची सारी गणिते बिघडली. केंद्रात भाजपची सत्ता आली मात्र त्यांना स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. यासाठी उत्तर प्रदेशापाठोपाठ महाराष्ट्रातील घटलेल्या जागा कारणीभूत ठरल्या.

अविभाजित शिवसेना-भाजप युतीला 2019 मध्ये 41 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 2024 मध्ये 24 जागांचा फटका बसला. मुस्लिम आणि दलित मतांमुळे, मराठा आरक्षण आंदोलनामुळे भाजपला हा फटका बसला, असे असतानाही उद्धव ठाकरे यांना केवळ मुस्लिमांचीच मते मिळाली, असे भासवण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून झाला.

याद्वारे हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पुण्यातील अधिवेशनात अमित शाह यांनीही तसाच प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असा केला. उद्धव ठाकरे यांनी कोणत्या औरंगजेबाबद्दल अभिमान व्यक्त केला होता, हे आपण वर पाहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT